where is papachi tickati | Sarkarnama

व्हेअर इज गॉंगॉवेस ऍण्ड पॉपॉची तिकटी? 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 13 एप्रिल 2017

या स्पर्धकांकडे प्रवास खर्चासाठी पैसे दिलेले नसतात. त्यांनी नियोजित मार्गावर जाताना लिफ्ट मागायची असते. वेळ पडली तर त्यांना ट्रॅक्‍टर ट्रॉली, ट्रक, टेम्पो, रिक्षा यात बसून मार्गक्रमण करावे लागते. हे स्पर्धक कसे जातात, हे पाहण्यासाठी त्यांच्या मागे संयोजकांचे वाहन असते. पण त्यात बसण्याची स्पर्धकांना परवानगी नसते. 

कोल्हापूर : हे सहा जण सातासमुद्रापार असलेल्या बेल्जियमचे. त्यांना कोल्हापूर, रंकाळा स्टॅंड, गंगावेस, पापाची तिकटी माहीत असायचं कारणच नाही. गंगावेस हा शब्द तर त्यांना म्हणायलाही जमायचा नाही. पण ते सहा जण मोबाईल ट्रॅकरचा आधार घेत रंकाळ्यावर पोहोचले. तेथून थोडं लेफ्ट, थोडं राइट, थोडं स्ट्रेट असं करत करत ते गंगावेशीत, पुढे पापाची तिकटी आणि शेवटी टाऊन हॉल उद्यानात पोहोचले. तेथे पोहोचताच आनंदाने उड्या मारू लागले. तिथली हिरवाई, गारवा पाहून तेथे काही काळ विसावले आणि टाऊन हॉलमध्ये पोहोचल्याची नोंद करून ते त्यांच्या मोहिमेच्या पुढच्या तयारीला लागले. 

"एझिया एक्‍स्प्रेस'या एका लोकप्रिय साहस स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापुरात हे परदेशी पाहुणे पोहोचले. श्रीलंकेतून सुरू झालेल्या या स्पर्धेत ते केरळ, तमिळनाडू, बंगळूर, हंपी, बदामीमार्गे आज कोल्हापुरात आले. फक्त ट्रॅकरवरून मार्ग काढत, लिफ्ट मागत ते स्पर्धेत सुचवलेल्या जागेवर पोहोचले. लिफ्ट म्हणून त्यांनी ट्रॅक्‍टर, टेम्पो, रिक्षा यांचाही आधार घेतला. 

पहिल्यांदा रंकाळा तलावाचा काठ व तेथे ठेवलेल्या एका टोपलीत टाऊन हॉल या स्थळाची चिठ्ठी होती. ही चिठ्ठी घेऊन स्पर्धक ट्रॅकरवरून टाऊन हॉलचा मार्ग
शोधत निघाले. वाटेत ट्रॅकरवर जाऊळाचा गणपती, रंकाळा स्टॅंड, गंगावेस, पापाची तिकटी, महापालिका, भाऊसिंगजी रोड असा माग काढत "व्हेअर इज गॉंगॉवेस' असे विचारत ते टाऊन हॉलमध्ये पोहोचले. त्यानंतर ब्रह्मपुरी टेकडी, पंचगंगा नदी या ठिकाणी स्पर्धकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हा मार्ग शोधताना त्यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात रेकॉर्ड करून घेण्यात आले. 

या स्पर्धेतील पुढचा प्रवास शुक्रवारी सकाळी दहानंतर सुरू होणार आहे. शुक्रवारी खासबाग मैदानात त्यांना कुस्ती करावी लागणार आहे. केवळ प्रवास असे या शोचे स्वरूप नाही. प्रवास करतानाच त्या त्या प्रांतातील सांस्कृतिक, नैसर्गिक, धार्मिक स्थानांचे दर्शन व्हावे, ते जगातील लोकांनाही शोच्या निमित्ताने पाहता यावे हा या स्पर्धेचा हेतू आहे. त्याला खूप मोठा प्रतिसाद आहे. ही स्पर्धा श्रीलंकेतून सुरू झाली. मार्गात केरळ, तमिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्रातील कोल्हापूर, अलिबाग व मुंबई या तीन स्थानांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला.  

या स्पर्धेचे नियोजन बेल्जियमच्या वृंदा थापा (कंट्री प्रोड्युसर), निनाद बत्तीन (लोकल प्रोड्युसर) हे करत आहेत. त्यांना कोल्हापुरात मिलिंद अष्टेकर, पुरातत्त्व विभागाचे अमृत पाटील यांनी सहकार्य केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख