where are you going asks nagpur guardian minister nitin raut | Sarkarnama

`आपण कुठे जात आहात ?  काही अत्यावश्‍यक काम आहे काय?'

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वेगवेगळ्या भागांत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, राष्ट्रीय कॉंग्रेस अनुसूचित विभागाचे समन्वयक राजेंद्र करवाडे होते.

नागपूर ः कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वेगवेगळ्या भागांत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, राष्ट्रीय कॉंग्रेस अनुसूचित विभागाचे समन्वयक राजेंद्र करवाडे होते.

डॉ. नितीन राऊत यांनी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना "आपण कुठे जात आहात? काही अत्यावश्‍यक काम आहे काय?' अशी आस्थेने विचारपूस केली. तर, किराणा दुकान, भाजीबाजार, दुकानदार, फळविक्रेते यांच्याशीही संवाद साधला. काही अडचणी असल्यास सांगा, असे म्हटले. त्यानंतर बर्डी उड्डाणपुलाखालील गरीब-निराधार व्यक्तींना जेवणाची व्यवस्था होत आहे काय, अशी विचारपूस केली.

संविधान चौक, इंदोरा चौक, जरीपटका मार्केट, ऑटोमोटिव्ह चौक, कळमना मार्ग, पारडी, वर्धमाननगर, सेंट्रल एव्हेन्यू रोड, गांधीबाग, इतवारी, चितारओळ, मोमिनपुरा, मेयो, सीताबर्डी, छत्रपती चौक, जयताळा रोड, बजाजनगर, शंकरनगर, गोकुळपेठ फळ-भाजी मार्केट, लॉ कॉलेज इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिक, दुकानदार, विक्रेत्यांशी संवाद साधला व सद्य:स्थिती जाणून घेतली.

लॉकडाउनच्या काळात किराणा, दूध, भाजी, फळे, औषधी अशा सर्व जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा आणि अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. माफक दरात जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा डॉ. राऊत यांनी दिला आहे.

देशव्यापी लॉकडाउनमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जीवनावश्‍यक वस्तू, आरोग्यसेवा व अत्यावश्‍यक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करू नये. जिल्हा प्रशासनाचे काम उत्तम सुरू असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी शासनपातळीवर योग्य प्रकारचे नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी संयम बाळगावा आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख