सोलापूर जिल्ह्यातील खासदार-आमदार गायब? खर्चाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन कुठे गेलेत!! 

राज्य कोरोनाशी संघर्ष करत असताना या कठीण काळात लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील लोकांच्या मदतीला नेटाने पुढे येणे अपेक्षित आहे. मात्र, काही अपवाद वगळता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून निराशा होत असल्याचे चित्र आहे. आमदार निधी खर्च करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, या पलीकडे लोकप्रतिनिधी मदत कार्यात नसल्याचेच चित्र आहे. काहींनी स्वखर्चातून मदत केली आहे. मात्र, या संकटापुढे ती पुरेशी नाही. त्याचा घेतलेला आढावा...
where are mp and mla from solapur districts in this crucial period of corona crisis
where are mp and mla from solapur districts in this crucial period of corona crisis

सोलापूर : राज्य कोरोनाशी संघर्ष करत असताना या कठीण काळात लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील लोकांच्या मदतीला नेटाने पुढे येणे अपेक्षित आहे. मात्र, काही अपवाद वगळता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून निराशा होत असल्याचे चित्र आहे. आमदार निधी खर्च करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, या पलीकडे लोकप्रतिनिधी मदत कार्यात नसल्याचेच चित्र आहे. काहींनी स्वखर्चातून मदत केली आहे. मात्र, या संकटापुढे ती पुरेशी नाही. त्याचा घेतलेला आढावा...

आरोग्य केंद्रांसाठी 50 लाखांचा निधी
बबनराव शिंदे, आमदार, माढा : आमदार फंडातून माढा व करकंब येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 50 लाखांचा निधी तर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर परराज्यातून आलेल्या सुमारे 60 लेबर लोकांना किराणा माल, सात क्विंटल गहू, चार क्विंटल तांदूळ व जीवनावश्‍यक वस्तू दिल्या आहेत तसेच लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या ऊसतोडणी कामगारांनाही गहू, तांदूळ व जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले आहे. आमदार शिंदेंनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2019-20 व 2020-21 अंतर्गत सध्या कोव्हिड 19 या विषाणूंमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माढा व करकंब येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये आयसीयू व्हेंटिलेटर खरेदी तसेच कोव्हिड 19 संदर्भात आवश्‍यक साधनसामग्री खरेदी करणे, माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्‍यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता कोव्हिड 19 संदर्भात आवश्‍यक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी 50 लाख निधी मंजूर करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

आमदार निधीतून एक कोटी तर स्वतः दिले एक लाख
सुभाष देशमुख, आमदार तथा माजी सहकारमंत्री : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपला एक कोटी रुपयांचा आमदार निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहेत. त्याबाबतचे पत्रही नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. याशिवाय स्वतः एक लाख रुपये पीएम केअर निधीसाठी दिले आहेत. ही रक्कम प्रदेश भाजपकडून केंद्राकडे दिली जाणार आहे. याशिवाय लोकमंगल समूहातील वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळ्या माध्यमातून कोरोनासाठी मदत करणे सुरू ठेवले आहे. अनेकांना जेवण देण्याचे काम सुरू आहे. लोकमंगल कारखान्याच्यावतीने सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. त्याचे वाटपही सरकारी कार्यालये, डॉक्‍टर, पोलिस यांना देण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी आपल्या उद्योग समूहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पीएम केअरसाठी मदत करण्याचे आवाहनही केले आहे. त्याचबरोबर बॅंक, पतसंस्थेलाही मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गरजुंपर्यंत मदत केली जातेय पोच
भारत भालके, आमदार, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ : कोरोनाच्या संकटामुळे पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघातील अनेक गोरगरीब कुटुंबे अडचणीत आली आहेत. मंगळवेढा तालुक्‍यातील अनेक गावांत अशा कुटुंबांना त्या त्या भागातील सधन लोकांच्या माध्यमातून आवश्‍यक ती अन्नधान्याची मदत पोचवण्यात येत आहे. पंढरपूर शहरातही काही भागात अशीच मदत केली जात आहे. नागरिकांच्या रेशन कार्डच्या अडचणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी सातत्याने संपर्क साधून सद्य परिस्थितीत निर्माण झालेल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवत आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाखेरीज अन्य आजारांवर देखील नियमितपणे उपचार झाले पाहिजेत. प्रसूतीसाठी तेथून महिलांना अन्य रुग्णालयात पाठवले जाऊ नये याविषयी सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने आवश्‍यक आरोग्य सुविधांसाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी आमदार फंडातून देण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

एक महिन्याचे वेतन दिले
राजेंद्र राऊत, आमदार, बार्शी :
एक महिन्याच्या एक लाख 82 हजार 200 रुपये वेतनाचा धनादेश महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधीकडे दिला आहे. आमदार फंडातून बार्शी ग्रामीण रुग्णालय व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल येथे पाच व्हेंटिलेटर, मास्क व इतर साहित्य खरेदीसाठी 50 लाख रुपये निधी देण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्‍यातील मोलमजुरी करणाऱ्या दोन हजार सामान्य कुटुंबांना ज्वारी, तांदूळ, गोडेतेल, साखर, डाळ, साबण अशा उपजीविकेच्या व जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. "कोरोना' संकटामुळे देशावर व महाराष्ट्रावर येणारा आर्थिक ताण व भार कमी करण्यास मदत होईल.

40 लाख रुपये खर्चासाठी दिले पत्र
संजय शिंदे, आमदार, करमाळा :
शासनाने जाहीर करण्यापूर्वीच आपले एक महिन्याचे वेतन कोरोना रोगासाठी दिले आहे. करमाळा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राला औषधे व इतर साहित्याचा पुरवठा व्हावा म्हणून 25 लाख तर माढा तालुक्‍यासाठी 15 लाख असे 40 लाख रुपये आमदार फंडातून खर्च करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना शिफारसपत्र दिले आहे. याशिवाय करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्‍यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्‍यात कोरोना रोगाविषयी योग्य ती दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशनच्या वतीने सॅनिटायझर उत्पादित करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

50 लाखांच्या निधीसाठी दिले पत्र
शहाजीबापू पाटील, आमदार, सांगोला :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व त्यावर विविध उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनास आपले एक महिन्याचे मानधन दिले आहे. तसेच विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय व विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्‍यक वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2020- 21 निधीतून 50 लाख रुपये आमदार निधी मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही या अगोदरच दिले आहे. सांगोल्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बैठका तर घेतल्या, परंतु संपूर्ण राज्यात संचारबंदीच्या काळात घराबाहेर न पडता शहराच्या नगरसेवकासह गावपातळीवरील सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, तलाठी अशा विविध पदाधिकाऱ्यांना स्वतः फोन करून गावातील सद्यःस्थिती तसेच परजिल्हा, परराज्यातून आलेल्या नागरिकांची माहिती व त्याबाबत केलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेत आहेत. गावपातळीवरील माहिती संकलित करून तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणेलाही याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी सूचना देत आहे.

गरजूंच्या घरी किराणा मालाची सोय
प्रशांत परिचारक, विधान परिषद सदस्य :
पंढरपूर शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांची बैठक घेऊन मदतीचे नियोजन केले आणि त्यानुसार कार्यवाही देखील सुरू केली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरीब, गरजू लोकांची यादी तयार करून संबंधितांच्या घरी किमान आठ ते दहा दिवस पुरेल इतका किराणा माल घरपोच केला जात आहे. आपल्यासह अनेक नगरसेवक त्यासाठी आवश्‍यक ते सर्व आर्थिक सहकार्य करीत आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून बेघर निवाऱ्यामध्ये लोकांची जेवणाची व्यवस्था केली आहे. शहरातील दानशूर लोकांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने शहरातील गरजू लोक, बांधकामांवर काम करणारे परप्रांतीय लोक तसेच बेघर निवाऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांना जेवण देण्यात येत आहे. कोरोनामुळे मतदारसंघातील लोकांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी सोडवण्यासाठी देखील प्रयत्नशील आहे. प्रशासनाकडून प्रस्ताव आल्यास व्हेंटिलेटरसारख्या यंत्रांच्या खरेदीसाठी तसेच अन्य आरोग्य सुविधांसाठी आमदार निधीतून तातडीने निधी उपलब्ध करून देणार आहे.

शाळांमध्ये सॅनिटायझर, मास्कचे वाटप करणार
दत्तात्रय सावंत, शिक्षक आमदार :
लॉकडाउनमुळे विनाअनुदानित शिक्षकांना आहे त्या ठिकाणी अडकून पडावे लागले आहे. ज्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्यांना जीवनावश्‍यक किराणा माल भरून देण्याचा छोटासा प्रयत्न सुरू आहे. संबंधित तालुक्‍यातील जवळच्या शिक्षकांशी संपर्क साधून गरजू विनाअनुदानित शिक्षकांकडे किराणा माल पोच केला जात आहे. गरजू शिक्षकांच्या अन्य काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आमचे मुख्य मदतीचे काम शाळा नियमितपणे सुरू झाल्यावर असणार आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सुरक्षेसाठी जे उपाय (सॅनिटायझर व मास्क) तसेच इतर आवश्‍यक गोष्टींचे वाटप करावे लागेल. हे स्वतःच्या खिशातून तसेच आमदार निधीमधून करणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे 50 लाखांची मागणी
यशवंत माने, आमदार :
विधानसभा मतदारसंघातील 12 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कोरोनासंदर्भात विविध उपाययोजनांसाठी तसेच साहित्य खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे 50 लाखांची मागणी केली आहे. मी प्रत्यक्षात मतदारसंघात आलो नाही, कारण मी आलो तर नागरिक जमा होतात व सोशल डिस्टन्स राहत नाही. म्हणून व्हॉट्‌सऍपवर व्हिडिओ तयार करून त्या माध्यमातून मदत देण्याचा, लोकांना आवाहन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दररोज 1200 जणांपर्यंत जेवण पोच
सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट :
आरोग्य व पोलिस खात्यावर अत्यावश्‍यक सेवेचा ताण आहे. यामुळे आपल्या प्रशिक्षण केंद्रावर अन्न बनवून त्याचे पॅकिंग करून कार्यकर्त्यांमार्फत दररोज एक हजार ते एक हजार 200 जणांपर्यंत जेवण पोचविले जात आहे. याशिवाय अक्कलकोट नगरपरिषद स्वच्छता विभागातील 70 कर्मचाऱ्यांना लॉकडाउन काळात पुरेल एवढे धान्य देण्यात आले आहे. आमदार म्हणून प्रशासनास सहकार्य करणे, नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविणे, हे तर सुरूच आहे. याशिवाय गरीब व गरजू लोक ज्यांच्या हाताला काम नाही, त्यांना अन्नपुरवठा करण्यात येत आहे. हे सर्व करत असताना प्रसिद्धीपासून सदर उपक्रम मात्र मुद्दामहून दूर ठेवण्यात आला आहे. नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी यावर लक्ष ठेवले असून मागील 10-12 दिवसांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

50 लाखांचा निधी मंजूर करून दिला
राम सातपुते, आमदार, माळशिरस :
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर माळशिरस तालुक्‍यातील आरोग्य विभागाला योग्य ती साधनसामग्री मिळावी यासाठी आमदार निधीतील स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 50 लाखांचा निधी या लॉकडाउन काळात मंजूर करून दिला आहे. तालुक्‍यातील एक तरुण लष्करी सेवेत आहे. घरी त्याची एकटी आई असते. या काळात त्या बाहेर जाऊ शकत नसल्यामुळे जवानाच्या फोनवरून त्यांच्या घरी किराणा व अन्य वस्तू पोच केल्या आहेत. तसेच तालुक्‍यातील अनेक लोक समूहाने अन्य राज्यांत अडकले आहेत. त्यांना इकडे न आणता ते जेथे आहेत तेथे त्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. शालेय कामासाठी दिल्लीत गेलेल्या एका तरुणाची तेथे सोय केली आहे. तसेच, माळशिरस तालुक्‍यात ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांची खाण्याची गैरसोय होत आहे. त्या ऊसतोड कामगारांना धान्य, किराणा पोच केला आहे व केला जात आहे.

विधान परिषद सदस्य ऍड. रामहरी रूपनवर यांचा कार्यकाल जूनमध्ये संपत असल्यामुळे व त्यांनी यापूर्वीच सर्व आमदार निधी खर्च केल्यामुळे सध्या त्यांच्याकडे निधी शिल्लक नाही. त्या कारणास्तव ते कोरोनाच्या मोहिमेत योगदान देऊ शकले नाहीत.

दोन लाख 22 हजार 111 रुपये देणार
डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, खासदार, सोलापूर :
भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी कोरोनाच्या संकटासाठी पीएम केअरला दोन लाख 22 हजार 111 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक-दोन दिवसात त्याबाबतचा धनादेश दिला जाणार आहे. यापूर्वी एवढ्याच रकमेचा धनादेश दिला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सध्याच्या परिस्थितीत हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब कामगार जनतेला कसा धीर मिळेल हा विचार करून उपाशीपोटी बांधव झोपू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात धान्य संकलन करून गरजूंना देण्याचे काम सुरू केले आहे. सुरवातीला माजे जन्मगाव असलेल्या गौडगावापासून त्याची सुरवात केली. कडबगाव, अक्कलकोट स्टेशन अशा रीतीने मागणी असणाऱ्या गरजूंपर्यंत धान्य वाटप चालू आहे. आतापर्यंत 70 गावांपर्यंत जाऊन धान्य वाटप गेले. त्याचबरोबर मास्कचेही वाटप केले आहे.

वैयक्तिक उद्योगातून 50 लाखांचा खर्च
रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार :
माढा मतदारसंघासाठी प्रत्येक तालुक्‍यासाठी पाच लाख असे एकूण 30 लाख रुपये खासदार निधीतून कोरोनासाठी तातडीची मदत म्हणून दिले आहेत. तसेच, त्यांच्या वैयक्तिक उद्योग व व्यवसायातून 50 लाख रुपयांचा निधी सॅनिटायझर व मास्कसाठी दिला आहे. याशिवाय मतदार संघातील 70 हजार लोकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले जाणार आहे. आजपर्यंत 12 हजार गरजू लोकांना जेवण दिले आहे. केंद्राच्या आवाहनानुसार यापुढील दोन वर्षांचा खासदार निधी आरोग्यसेवेसाठी देण्याचे जाहीर केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मतदारसंघातील अधिकाऱ्यांशी बैठका घेत आहे व मदतीसाठी पाठपुरावा करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com