When Supriya Sule became journalist | Sarkarnama

आणि सुप्रिया सुळे झाल्या टिव्ही जर्नलिस्ट  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 मार्च 2017

महिलांच्या विविध प्रश्‍नांवर हे पत्रकार सुळे यांची मुलाखत घेत होत्या. अचानक सुळे यांनीच तो माइक हातात घेतला आणि इतर महिलांची मुलाखत घेण्यास सुरवात केली.

पुणे: विविध क्षेत्रांत आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या पुण्यातील महिलांची चक्क खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलाखती घेतल्या. पुण्यातील महापौरपदासाठीच्या भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक, उपजिल्हाधिकारी सुप्रिया दातार, पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांना महिलांच्या विविध प्रश्‍नांवर सुप्रियाताईंनी बोलते केले.

 महिलांचे आणि बालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महिलांनी पक्षविरहित काम करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष या मुलाखतींतून निघाला. आपल्या कामगिरीची पताका उंचावणाऱ्या महिलांशी गप्पागोष्टी करण्यासाठी आज त्यांना "वाडेश्‍वर कट्ट्या'वर एकत्रित बोलविण्यात आले होते. येथे टिव्ही पत्रकारांचीही गर्दी होती. 

महिलांच्या विविध प्रश्‍नांवर हे पत्रकार सुळे यांची मुलाखत घेत होत्या. अचानक सुळे यांनीच तो माइक हातात घेतला आणि इतर महिलांची मुलाखत घेण्यास सुरवात केली. "तुम्ही राजकारणात नसता तर कोण बनल्या असत्या, असा प्रश्‍न त्यांनी टिळक यांना केला. मी राजकारणात नसते तर मुलांची आई म्हणूनच जबाबदारी पार पाडली असते, असे टिळक यांनी सांगितले. हाच प्रश्‍न उपजिल्हाधिकारी दातार यांना विचारला असता त्यांनी मला नृत्याची आवड होती. ती आवड मी सरकारी नोकरीत नसते तर नक्कीच पूर्ण केली असती, असे त्यांनी सांगितले. पण सध्या सरकारी नोकरीत असल्याने सरकारच्या तालावर नाचावे लागतेच, अशी मिश्‍किल टिप्पणीही त्यांनी केली. उज्ज्वला पवार यांनी मी वकील झाले नसते तर स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून डॉक्‍टर होण्याची इच्छा पूर्ण केली असती, अशी भावना व्यक्त केली. 

तुम्ही महापौर झाल्यानंतर हरवलेल्या मुलांच्या किंवा बालकामगारांच्या प्रश्‍नावर लक्ष देणार का, असा प्रश्‍न सुळे यांनी मुक्ता टिळक यांनी केला. त्यावर टिळक म्हणाल्या,"आमच्या रोशनी नावाच्या संस्थेमार्फत हरवलेल्या मुलांसाठी आम्ही काम करतच आहोत. मात्र महापौर झाल्यानंतर याबाबत जागृती करण्यासाठी नक्की प्रयत्न करेल. हरवलेल्या मुलांना तातडीने आसरा आणि त्यांच्या शोधासाठी पोलिसांना पालकेतर्फे सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

राजकारण असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र तेथे कार्यरत राहण्यासाठी घरातील मंडळींचा पाठिंबा महिलांसाठी महत्त्वाचा असतो, अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली. महिलांच्या प्रश्‍नावर राजकीय भूमिका सोडून सर्व महिला नेत्यांनी एकत्र येण्याची गरजही सुळे व टिळक यांनी व्यक्त केली. पुण्याच्या कारभारावर महापौर म्हणून तुमचा ठसा उमटवा, अशा शुभेच्छाही टिळक यांना सुळे यांनी दिल्या.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख