शरद पवार जेव्हा विनोद तावडे यांचे कौतुक करतात! 

शरद पवार जेव्हा विनोद तावडे यांचे कौतुक करतात! 

पुणे : देशातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यातील विविध पैलू अनेकांना प्रभावित करतात. त्यांचे विरोधकही हे मोठ्या दिलाने मान्यही करतात. पवार यांच्या माणूस जोडण्याच्या कलेबद्दल जसे भरभरून बोलले जाते, तितकेच त्यांच्या अभ्यास, वाचनाबद्दलही आवजुर्न बोलले जाते. कला, साहित्य व सांस्कृतिक चळवळीला ऊर्जितावस्था देण्याचे काम करणाऱ्या पवार यांच्या पुस्तकावरील प्रेमाबद्दल विरोधकही त्यांचे भरभरून कौतुक करतात. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पवार यांच्या पुस्तकप्रेमाबद्दल आणि त्यांनी केलेल्या प्रशंसेबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले. 

मराठी भाषा व साहित्याविषयीचे प्रेम नागरिकांमध्ये वाढावे, नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागावी, यासाठी राज्य सरकारने महाबळेश्वर येथील भिलार गावाला "पुस्तकांचे गाव' या संकल्पनेअंतर्गत उभे केले. काही महिन्यांपूर्वी या "पुस्तकाच्या गावाचे' उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी तावडे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, साहित्यिक, साहित्य संस्थांचे पदाधिकारी, प्रकाशक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या आनंदोत्साहात या उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. मात्र दुसऱ्या दिवसानंतर तिकडे लेखक, साहित्यिक, प्रकाशक किंवा वाचक यांचे जाण्याचे प्रमाण घसरले. नेमका हाच धागा पकडून तावडे यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या "प्रकाशक लेखक संवाद' या कार्यक्रमात लेखक, प्रकाशकांवर टीका केली. त्याचवेळी तावडे यांनी शरद पवार यांचे कौतुकही केले. 

तावडे म्हणाले, ""महाबळेश्वरमधील भिलार, या "पुस्तकाच्या गाव' उपक्रमाचे उद्‌घाटन झाल्यानंतर किती लेखक, प्रकाशक गेले? याउलट शरद पवार यांनी दुसऱ्याच दिवशी पुस्तकाच्या गावाला भेट दिली. तेथील सुविधा पाहून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी आणखी काही हवे असल्यास जरूर सांगावे, अशी सूचनाही त्यांनी केली. केवळ तेवढ्यावरच न थांबता, पवार यांनी मला फोन करून खास अभिनंदन केले. राज्य सरकारने राबविलेला हा उपक्रम खरोखरच चांगला असल्याचे सांगितले. तावडे यांनी सांगितलेल्या या आठवणीनंतर उपस्थित प्रेक्षकांमध्ये पवार यांच्या पुस्तकप्रेमाबद्दल  चर्चा झाली आणि त्यातही तावडे यांनी आपल्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दलची ही मौलिक आठवण सांगितल्याबद्दल  त्याचीही चर्चा बराच काळ सुरू होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com