प्रश्न शाहरूख खानचे उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची !

शाहरूख खान यांनी आपण स्वत: शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. मुंबईतील जुन्या वस्तू, ठिकाणे, संस्कृती जपून ठेवण्यासाठी संग्रह केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेणार असून मुंबईला 'मॅजिकल मुंबई' बनवायचे आहे. मुंबईतील सांस्कृतिक, कला, नेपथ्य आदींसह सर्व क्षेत्रातील कल्पक व्यक्तींना घेऊन मुंबईला 'क्रिएटिव्ह हब' बनवायचा संकल्प शाहरूख खान यांनी बोलून दाखविला.
Shaharukh-khan-interviews CM
Shaharukh-khan-interviews CM

मुंबई : चित्रपट अभिनेता शाहरुख खान चक्क पत्रकाराच्या भूमिकेत जाऊन   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिक्षण , मुंबई महानगराचा विकास , वाहतुकीची समस्या आदी विषयावर प्रश्न विचारीत आहे आणि श्री . फडणवीस गांभीर्याने त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत असे चित्र आज मुंबईत एका कार्यक्रमात दिसले !

महाराष्ट्र शासन आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मुंबई2.0' या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले. त्यांनतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची जाहीर मुलाखत चित्रपट अभिनेता शाहरुख खान याने घेतली . 

यावेळी अभिनेते शाहरुख खान यांनी मुंबईतील पायाभूत सुविधा, विविध विकास प्रकल्प, बॉलिवूडच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना बोलते केले.

मुंबईबद्दलच्या व्हिजनवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले," पूर्वी अनेकजण मुंबईला शांघाय करण्याचे बोलत होते. पण मुंबई ही मुंबई आहे. त्याचे एक वेगळे कल्चर,स्पिरीट आहे. मुंबईचे एक वेगळे फ्लेवर आहे. मुंबईने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहे. मात्र, अजूनही अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. अशा लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे माझे व्हिजन/मिशन आहे."

मुंबईत बदल कसा घडवून आणणार याबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,"गेल्या 20 वर्षांपासून मुंबईकर झालोय. मुंबईत क्षमता आहे. मुंबई ही ग्लोबल सिटी असून इथे 45 टक्के जनता झोपडपट्टीत राहते, शहराला झोपडपट्टीमुक्त करायचे आहे. त्यामुळे पदावर आल्यानंतर प्रथम मुंबईतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आहे."

शासनाच्या योजना व धोरणाबाबत नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत, यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, " मुंबई ही सांस्कृतिक राजधानी आहे. वाहतूक समस्या आहे, मात्र मेट्रो आल्यानंतर ही समस्या सुटणार असल्याने मुंबईकर तक्रार करीत नाहीत. जनतेच्या सहभागानेच राज्याचा विकास होत असल्याने अनेक योजनात व धोरणात जनतेला सामावून घेतले जात आहे. जनतेने आपल्या समस्यां मांडाव्यात म्हणजे आम्हाला आत्मसंतुष्ट न राहता अधिक काम करता येईल ."

व्यावसायिक शिक्षणाविषयी मुख्यमंत्री म्हणाले, " सध्या कौशल्य विकासावर आधारित शिक्षण देण्यावर भर आहे. यासाठी केंद्र शासनाने नियमातही बदल केले असून व्यावसायिक शिक्षण देणारी परदेशी विद्यापीठे राज्यात येत आहेत. नवीन नोकऱ्या, मानवी संसाधने तयार करणारे शिक्षण देण्यासाठी परदेशी संस्था व विद्यापीठे यांच्यात सहकार्य होत आहे."

"मुंबईमध्ये जगातली सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिज्युअल व स्पेशल इफेक्ट च्या  अभ्यासासाठी मुंबईत संस्था उभारण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीने ब्ल्यू प्रिंट तयार करावी, याला शासन सहकार्य करेल," असेही मुख्यमंत्री म्हणाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र व उद्योगासाठी शासनाने धोरणात बदल केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com