`माळेगाव`च्या निकालाचे पडसाद `सोमेश्वर` व `छत्रपती`तही

...
`माळेगाव`च्या निकालाचे पडसाद `सोमेश्वर` व `छत्रपती`तही

सोमेश्वरनगर ः माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विजयाने सोमेश्वर व छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह तर विरोधी गोटात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान `माळेगाव`च्या निकालानंतरही 'छत्रपती'चे रण निश्चितपणे पेटणार आहे .पण 'सोमेश्वर'ला मात्र बिनविरोध करायचे की लढायचे यातच विरोधकांचे तळ्यात- मळ्यात चालले आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत माळेगावच्या पराभवापासून बोध घेऊन अजित पवार यांनी सोमेश्वर व छत्रपती निवडणुकीत कुठलाही धोका न पत्करता संपूर्ण सूत्रे आपल्या हाती ठेवत सोमेश्वरला काकडे गटाला तर छत्रपतीवर पृथ्वीराज जाचक यांच्या पॅनेलला धूळ चारली होती. आता मात्र, आधीच राज्याची सत्ता गेल्याने खचलेल्या भाजपामध्ये 
`माळेगाव`च्या पराभवाने चिंतेत भरच पडली आहे. त्यात शिवसेनाही, स्वाभीमानी शेतकरी संघटना हेही सोबत नाहीत. अशात मागच्या निवडणुकीतील विरोधक सतीश काकडे यांनी अजित पवारांशी सलगी केली आहे. 'सोमेश्वरला पॅनेल उभे करणार नाही' अशी भूमिकाही बोलून दाखवत आहेत.

`सोमेश्वर`ची मतदारसंख्या माळेगावच्या दुप्पट म्हणजे 25500 इतकी प्रचंड असल्याने उमेदवारांची शक्ती पणाला लागणार आहे. त्यामुळे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचे बळ मिळाले तरच सोमेश्वरवर पॅनेल होणार आहे. तर `छत्रपती`मध्ये 
सत्ताधारी गटाचे काम समाधानकारक नसले तरी 'माळेगाव'मुळे सत्ताधाऱ्यांना हुरूप आला आहे. पण 'छत्रपती'वर पॅनेल टाकून लढाई जिंकणारच असा विश्वासही पृथ्वीराज जाचक व्यक्त करत आहेत.

भाजपाचे नेते दिलीप खैरे यांनी, माळेगावला उपमुख्यमंत्र्यांच्या पॅनेलला घरच्या मैदानावर विजयासाठी जबरदस्त संघर्ष करायला लागला आहे. अशातही गुरू-शिष्याला ते पराभूत करू न शकल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. म्हणून पक्षाचे पाठबळ घेऊन पॅनेल उभा करण्याची तयारी सुरू आहे असे सांगितले आहे.

सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी, माळेगावचा निकालाचा फायदा होणारच. अजितदादांवर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास असल्याचे सिध्द झाले आहे. सोमेश्वरलाही अजितदादांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाल्याने विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यांना कुठलीच संधी नसल्यामुळे त्यांनी निवडणूक बिनविरोध सोडावी, असे आवाहन केले आहे.

छत्रपतीवर शेतकरी कृती समितीचा पॅनेल निश्चित 
कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील म्हणाले, माळेगावमुळे उत्साह नक्कीच वाढलाय. अडचणींवर मात करण्यासाठी राज्याच्या सत्तेतील अजितदादाच आवश्यक असल्याची शेतकऱ्यांचीही भूमिका आहे. तसेच इंदापूरमध्ये मागे असायचो पण आता राज्यमंत्री दत्ता भरणेंच्या कामाने 'राष्ट्रवादी पुन्हा' हे निश्चित आहे. तर पृथ्वीराज जाचक यांनी, 
छत्रपतीची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. 28 हजार 210 मतदार आणि 53 गावे आहेत. सतरा वर्षाचा खराब कारभार सगळ्यांनी बघीतलाय. त्यांच्या पक्षश्रेष्ठींनीही अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे माळेगावला काही झाले तरी शेतकरी कृती समिती निश्चितपणे पॅनेल टाकणार. शेतकरी पुढचं ठरवतील, असे स्पष्ट केले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com