what will happen to ganesh bidkar`s dream? | Sarkarnama

कसबा मतदारसंघात मुक्ता टिळक इच्छुक मग बिडकरांच्या आमदारकीच्या स्वप्नाचे काय?

उमेश घोंगडे
बुधवार, 23 जानेवारी 2019

कसबा मतदारसंघात आतापासूनच अनेक नावे चर्चेत...

पुणे : आमदारकीची संधी मिळाली तर कुणाला आवडणार नाही, या शब्दांत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी आमदार होण्याची इच्छा दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली. पालकमंत्री गिरीश बापट यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली तर महापौर टिळक यांची आमदारकीसाठीचा दावा अधिक मजबूत होणार आहे. मात्र, या स्थितीत या मतदारसंघातून आमदार होण्याची स्वप्ने गेल्या अनेक वर्षापासून उराशी बाळगून बसलेल्या नगरसेवक गणेश बिडकर यांचे काय होणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

बिडकर गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून केंद्र व राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. आमदार होण्यासाठी गेल्या दोन निवडणुकांपासून तयारी करीत असलेल्या बिडकर यांना अडीच वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत पराभूत व्हावे लागले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडून कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या रवींद्र धंगेकर यांनी बिडकर यांचा दारूण पराभव केला होता. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेत पुन्हा प्रवेश केला. मात्र पराभव झाल्यापासून ते राजकीय पटलावर शांतच आहेत.

पालकमंत्री बापट यांना खरोखरच लोकसभेची उमेदवारी मिळाली तर आपल्याला संधी मिळेल, अशी बिडकर यांना आशा आहे. मात्र, महापौर टिळक यांचे नाव चर्चेत आल्याचे बिडकर यांचीही काहीशी पंचाईत झाली आहे. कारण महापौर टिळक यानींही महापालिकेत प्रदीर्घ काळ काम केले आहे. भाजपाची सत्ता आल्यानंतर पक्षाच्यावतीने पहिल्या महापौर म्हणून त्यांची निवड झाली. कसबा विधानसभा मतदारंसंघात मोडणाऱ्या प्रभागातूनच सलच चारवेळा त्या नगरसेवक झाल्या आहेत. शिवाय महिला उमेदवार, स्वच्छ प्रतिमा व टिळक आडनाव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळेच अनेक वर्षे आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या बिडकर यांचे काय होणार हा प्रश्न त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सतावू लागला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख