हर्षवर्धन यांनी राष्ट्रवादीचे काम केले..आता इंदापुरातील राष्ट्रवादीचे नेते काय करणार?

हर्षवर्धन यांनी राष्ट्रवादीचे काम केले..आता इंदापुरातील राष्ट्रवादीचे नेते काय करणार?

वालचंदनगर : लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मनोमिलन झाल्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे,पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे काय भूमिका घेणार, याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विळ्या -भोपळ्याचे वैर राज्याला माहित होते. राज्याच्या राजकारणामध्ये दोघांनी १३ वर्ष एकत्र काम करीत असताना एकमेकांवरती टीकेची झोड उडवली होती. ३० एप्रिल २०१८ साली अंथुर्णेमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाटेल ते झाले तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीची सोडली जाणार नाही, भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर. हा अजित पवार यांचा शब्द असल्याचे वक्तव्य करुन इंदापूरच्या जागेचा पेच निर्माण केला होता.

इंदापूरच्या जागेचा विषय राज्यामध्ये गाजला. लोकसभेच्या निवडणूकीमध्ये राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाची आघाडी झाली. मात्र सुरवातीच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शांततेची भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार ,खासदार सुळे यांनी  पाटील यांची भेट घेवून प्रचारामध्ये सक्रिय होण्याचे आवाहन केले. शेवटी पवार कुटुंब व पाटील यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर तोडगा निघाला. पाटील यांनी खासदार सुळे यांचा प्रचारास सुरवात केली.

गेल्या २४ वर्षामध्ये अपवाद वगळता एकाच व्यासपीठावर कधीही न आलेले अजित पवार व हर्षवर्धन पाटलांनी एकत्रित येवून तालुक्यात चार ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पवार कुटुंब व पाटील यांच्या मनोमिलनामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते दुखावले आहेत.

राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी साडेचार वर्षामध्ये तालुक्यामध्ये विरोधी पक्षाचे आमदार असतानाही जिल्हामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणला आहे. तर झेडपीचे सभातपी प्रवीण माने यांनी ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन १२५ कोटी पेक्षा जास्त निधी तालुक्यासाठी आणला आहे. २०१९ च्या विधानसभा लढविण्यासाठी दोघेही इच्छुक आहेत. बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनीही गेल्या आठ महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रवादीमधून तिघेही तीव्र इच्छुक आहेत. मात्र तालुक्यातील सध्याच्या राजकीय गणितानूसार इंदापूरची विधानसभेची जागा कॉग्रेस पक्षाकडे जाण्याची दाट शक्यता असून याची चर्चा जोरदार आहे. काॅंग्रेसकडे जागा गेल्यास राष्ट्रवादी भरणे, माने व जगदाळे काय भूमिका घेणार, याकडे इंदापूर तालुक्यासह राज्याचे लक्ष लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com