संघर्ष की सामोपचार: आता पंकजा मुंडेंचे पुढचे पाऊल काय  ?

भाजप सोडण्याची घोषणा केली नसली तरी राज्यभरातील दौरे आणि औरंगाबादचे एक दिवसीय उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्या सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणासाधत आहेत. भाजपमध्येच राहायचे पण कोणाची भीड न बाळगता राज्यभर आपले नेतृत्वप्रस्थापित करण्याचा त्यांचा निर्धार दिसत आहे.
pankaja_munde
pankaja_munde

बीड : भाजप सोडण्याची थेट घोषणा टाळली असली तरी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन आणि राज्यभरातील दौरे करण्याची घोषणा करत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष भाजपला बायपासच करण्याचे धोरण स्वीकारलेले दिसत आहे.   दोन दिवसांत विविध मुलाखतींत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका  सुरु केली आहे. त्यामुळे या बायपास रस्त्याने चालताना पंकजा मुंडेंच्या साथीने कोण कोण चालणार असा प्रश्न आहे. पंकजा मुंडे संघर्षाचा मार्ग स्वीकारतात की सामोपचाराचा याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे . 


मास लिडर असल्याने पंकजा मुंडेंना बेदखल करणे भाजपलाही परवडणारे नाही. पण भाजपची सध्याची बांधणी आणि वाटचाल पाहता राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र आणि शहा असेच व्यक्तीकेंद्रीत चित्र आहे. मोदी - शहांनी राज्यात भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांवर सोपविली आहे. त्यामुळे फडणवीसांना जसे हवे तशी भाजपची वाटचाल सुरु आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांची फडणवीसांवरील नाराजी आता लपून राहीलेली नाही. पण केवळ नाराजी व्यक्त करून भागणार नाही तर त्यांना पक्षात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी  मोदी- शहांच्या दरबारात आपले वजन निर्माण करावे लागेल. 


पंकजाताईंनी  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून नाराजी उघड करतानाच आपण पक्ष सोडणार नसून पक्षाने आपल्याला काढायचे असेल तर निर्णय घ्यावा, असे सांगत पुढची दिशा ठरवून टाकली आहे. भाजप कोअर समितीतून मुक्त होण्याची घोषणा करतानाच आपण आता मोकळी असल्याचे सांगत आता फक्त परळीची नसून राज्याची झाल्याचे सांगत त्यांनी पक्षांतर्गत दडपण झुगारून लावले आहे.  

 राज्यभरातील दौरे आणि औरंगाबाद येथे होणारे एक दिवसीय उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचे जाहीर करत त्यांनी भाजपचे तत्व आणि विचारधारा पाळणार पण  पक्षशिस्तीची चौकट जुमानणार नाही आणि असे धोरण स्वीकारलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचा आपल्या भाषणात गौरव करायचा पण देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व मान्य  करायचे नाही . राज्यस्तरावर ओबीसींच्या नेत्या अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.  त्यामुळे आता त्यांच्या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण - कोण राहणार असा प्रश्न आहे. 


मागच्या सत्तेच्या काळात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यांना बीडसह नगर, बुलढाणा, नाशिक, पुणे, परभणी जिल्ह्यातील आमदार हजेरी लावत. विशेष म्हणजे शिवसेनेसह इतर पक्षाचे नेतेही हजेरी लावत. परवाच्या मेळाव्यालाही भाजपच्या अनेक आमदारांनी हजेरी लावली. त्या माध्यमातून त्या या आमदारांना त्यांच्या मागील ताकद दाखऊन देत असत आणि आणि पक्षालाही आपल्या सामर्थ्याची जाणिव करुन देत. चार दिवसापूर्वी झालेल्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमास मराठवाडा, नगर आणि राज्यातूनही भाजपचे  आजी माजी आमदार आणि नेते आलेले होते . या मेळाव्याचा निमित्ताने पंकजा मुंडे यांच्या सामर्थ्याचा अंदाज पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना आला असेलच . 

आपल्या बरोबरसलेल्या भाजपच्या आमदारांची अडचण होऊ नये आणि खासदार प्रीतम मुंडे यांचीही कोंडी होऊ नये यासाठी त्या सध्या  संयमित भूमिका घेत आहेत. नाथाभाऊ यांच्या प्रमाणे थेट पक्षातील नेत्यांवर हल्ले न चढवता त्या पक्षात आपले स्थान कायम राखण्याचाही प्रयत्न करीत आहेत . देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीला विरोध असलेले भाजप मधील काही नेते  उघड तर काहीजण पडद्याआडून पंकजा मुंडे यांना बळ देताना दिसत आहेत . 


पंकजा मुंडे  आता कै . गोपीनाथ मुंडे यांचा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. पक्ष नेतृत्वावर टीका टाळून त्यांनी राज्यात आपला  जनाधार वाढवला तर त्याचा लाभ पंकजा मुंडेंना आणि पक्षाला होऊ शकतो . राज्यात ओबीसींच्या  एकमुखी नेत्या अशी स्वतःची प्रतिमा उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न असणे स्वाभाविक आहे. 


त्याबरोबरच त्यांना ग्राम पंचायत आणि नगरपालिका स्तरावर आपल्या कार्यकर्त्यांना बळ देत आपला मतदारसंघ बांधण्याचीही आवश्यकता आहे. आज कार्यकर्त्यांना बळ देत ग्रामपंचायती , पंचायत  समिती, नगर पालिका , सहकारी संस्था  पण त्यांनी ताब्यात घेतल्या तर या संस्थातील त्यांचे कार्यकर्ते विधानसभेला त्यानं बळ देऊ शकतील.  पक्षात संघर्षाचेच धोरण ठेवले तर त्याचा अर्थ त्यांच्या समोर अन्य पर्याय देखील खुले आहेत असा काढला जाईल. त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे पक्षाचे काही प्रमाणात निश्चित नुकसान  होईल पण त्यातून पंकजा मुंडे यांना कितपत लाभ होईल हा प्रश्न महत्वाचा ठरतो . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com