राजकारणाचे तरुण खेळाडू कदम-पवार खेळण्याच्या दुकानात का रमले ?  - What Vishwajit kadm - rohit Pawar doing in toy shop ? | Politics Marathi News - Sarkarnama

राजकारणाचे तरुण खेळाडू कदम-पवार खेळण्याच्या दुकानात का रमले ? 

सरकारनामा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अटीतटीच्या सामन्यात आपला सहभाग नोंदवून गावाकडे निघालेले आमदार चक्क खेळण्याच्या दुकानात रंगलेले दिसले . 

मुंबई : महाराष्ट्र  विधानसभेत सत्ता स्थापनेचा अत्यंत उत्कंठावर्धक खेळ अखेर संपला . या अटीतटीच्या सामन्यात आपला सहभाग नोंदवून गावाकडे निघालेले आमदार चक्क खेळण्याच्या दुकानात रंगलेले दिसले . 

मुंबईतील एका नावाजलेल्या खेळण्याच्या दुकानात काँग्रेसचे आमदार डॉ . विश्वजीत कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चक्क हातात खेळणी घेऊन पहातानाचे चित्र दिसले .  गंमत म्हणजे हे छायाचित्र विश्वजित कदम यांनीच ट्विटरवर शेयर केले आहे . 

डॉ. कदम आपल्या ट्विटमध्ये खेळण्याच्या दुकानात का याबाबत रहस्यभेद करताना म्हणतात , राजकारणाचा हळवा कोपरा... मुंबईतील अविरत राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यावर विधानसभेत बहुमताची मोहोर देखील उमटली. आता सर्वांनाच घरचे वेध लागले. डॅडीची वाट पाहणाऱ्या चिमुकल्यांसाठी वाटेत खेळणी घेण्याचा मोह आवरला नाही. सोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ! 

आमदार म्हणून आपली भूमिका बजावल्यानंतर घरी परतताना आपल्या मुलामुलींसाठी हे दोघेही खेळणी खरेदी करीत होते . घरी गेल्यावर ' माझ्यासाठी काय आणले ?' या प्रश्नाचे उत्तर देताना तयारीत असावे म्हणूनच या दोघांनी ही खरेदी केली असावी . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख