what is the stance about khadase tawade and munde from bjp | Sarkarnama

खडसे, तावडे, पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाबाबत भाजपमध्ये पेच 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

.....

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याशिवाय, मुंबईचे अध्यक्ष म्हणून भाजपने आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी या दोन नियुक्‍त्यांची घोषणा केली. चंद्रकांत पाटील यांच्या फेरनिवडीमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचा पेच भाजपात निर्माण झाला आहे. 

 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष ठरूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपदावर भाजपमधील अनेक नेत्यांचा डोळा होता. भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन आदींची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाने गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याआधी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. 

दरम्यान, मुंबईच्या अध्यक्षपदासाठी आशिष शेलार, खासदार मनोज कोटक यांची नावे चर्चेत होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला अंगावर घेणारा अध्यक्ष द्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र, पक्षाने मुंबईची जबाबदारी पुन्हा लोढा यांच्याकडे दिली. दरम्यान, चंद्रकांत पाटील हे परवा (रविवारी) भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख