होय, कसाबचे नाव समीर चौधरीच होते... : मारीया म्हणाले ते खरेच!

मुंबईचे निवृत्त पोलिस अधिकारी राकेश मारीय यांचे आत्मचरित्र भलतेच चर्चेत आले असून त्यांच्या एका दाव्याने राजकीय पटलावर खळबळ उडाली होती. मात्र त्यांचा हा दावा खरा आहे.
Rakesh Maria Claim of Kasab Fake ID is True Say Ramesh Mahale
Rakesh Maria Claim of Kasab Fake ID is True Say Ramesh Mahale

पुणे : मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेल्या एका उल्लेखाने सध्या गदारोळ उठला आहे.  मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांनी केला होता, हे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय' ला भासवायचं होतं आणि त्यांनी तशी तयारीही केली होती. त्यामुळेच हैदराबादच्या एका महाविद्यालयाची हिंदू नावे असलेली बनावट ओळखपत्रं अतिरेक्यांना तयार करुन देण्यात आली होती. मुंबईत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या खिशात ही ओळखपत्रे सापडली. जिंवत पकडण्यात आलेल्या अजमल कसाबच्या खिशातही त्याला दिलेलं ओळखपत्रं होतं. त्यावर नांव होतं समीर दिनेश चौधरी'

मारियांनी आपल्या Let, I tell it now या आत्मचरित्रात ज्या ओळखपत्रांचा उल्लेख केला आहे, त्याचा विस्तृत तपास मुंबई पोलिसांनी केला होता. २६/११ च्या हल्ला प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले (वरिष्ठ पोलिस निरिक्षक, निवृत्त) यांनी २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या '26/11 कसाब आणि मी' या पुस्तकात याची सविस्तर माहिती दिली आहे. तपासात कसाबने महालेंना जी माहिती दिली ती त्याच्याच शब्दांत पुस्तकात देण्यात आली आहे.

`हिंदू दहशतवादा`चा कथित मुद्दा मारीया यांच्या पुस्तकामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. काॅंग्रेस सरकारने हिंदू दहशतवाद हा शब्द निर्माण करून हिंदूंना बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला. मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनीही या मुद्यावरून हिंदू दहशतवाद हे काॅंग्रेसचे कारस्थान असल्याची टीका केली आहे. 

महाले यांनी कसाबची कसून चौकशी केली होती. कसाबने त्यांना सांगितलेली माहिती त्याच्याच शब्दात पुढीलप्रमाणे :

``.....मुंबईत जर दुर्दैवानं कुणी पोलिसांच्या हाती सापडलंच तर त्यांची खरी ओळख पटू नये आणि हल्ल्याचा कट नक्की कुठं शिजला याचा थांग भारतीय यंत्रणांना लागू नये, यासाठी आम्हा दहाही जणांना नवी ओळख देणं गरजेचं होतं. त्यामुळे काही दिवस अगोदर आमची छायाचित्रे घेण्यात आली. अरुणोदय डिग्री अँड पी.जी महाविद्यालय, वेद्रे काँप्लेक्स, दिलखूश नगर, हैदराबाद, पिनकोड – 500060, असे नांव छापलेली ओळखपत्रं बनवून त्यावर ही छायाचित्रं चिकटवण्यात आली. आमच्या पैकी प्रत्येकाला एक नवं भारतीय नांव देण्यात आलं.

मी महंमद अजमल आमीर कसाब (अबू मुजाहिद)....मला नांव देण्यात आलं समीर दिनेश चौधरी, रा. 254, टिचर्स काॅलनी, नागराभावी बंगळूरु....
.
माझ्या इतर साथिदारांनाही नवी नावं मिळाली.....ती अशी होती.....
इस्माईल खान (अबू इस्माईल) नरेश विलास शर्मा, रा. घर क्र. 28/बी ममता नगर, निगोल, हैदराबाद
इम्रान बाबर (अबू आकाशा) अर्जुनकुमार वीरकुमार, रा. 13/2 एस.के अपार्टमेंट, इंदिरा नगर, हैदराबाद
नासीर (अबू उमर) दिनेशकुमार रविकुमार, रा. 781, हुडा काँलनी, सरुर नगर, हैदराबाद 5000035
हाफीज अर्शद (अब्दुल रहेमान बडा उर्फ हयाजी) रघुबीरसिंग रणजितसिंग, रा. प्लाँट क्रमांक 673-4 व्ही, इलिसब्रिज, अहमदाबाद
अब्दुल रहेमान छोटा (साकीब) अरुण विक्रम शर्मा, रा. प्लाँट क्र. 36-ए, गंगा काँलनी, नवी दिल्ली.
फहादउल्ला (फहादउल्ला) रोहित दीपक पाटील, रा. 313, एस.के. अपार्टमेंट, इंदिरा नगर, विजयनगर काँलनी, हैदराबाद
सोहेब (अबू सोहेब) सुधाकन नायर. ओळखपत्र जळून गेल्यानं पत्ता मात्र समजू शकला नाही.
जावेद  (अबू अली) किशोर नायडू. ओळखपत्र न सापडल्यानं पत्ता समजला नाही.
नझीर अहमद (अबू उमेर) प्रकाश कुमार. ओळखपत्र न सापडल्यानं पत्ता समजला नाही.
(यापैकी शेवटची तीन ओळखपत्रे हल्ल्याच्या वेळी गहाळ झाली किंवा जळून गेली होती)

ही ओळखपत्रं सध्या अटकेत असलेला अबू जुंदाल यानं बनवली होती असा पोलिसांचा आरोप आहे. जुंदालवरील खटला सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबतची महाले यांनी आपल्या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. महाले लिहितात....

``....मधल्या काळात झरार शाहनं अबू जुंदालला मुंबईपासून लांब असलेल्या एखाद्या महाविद्यालयाचं नांव सांगण्यास सांगितलं. तसंच दहा मुजाहिद्दीनांसाठी राहण्याचे पत्तेही मिळवायला सांगितलं. अबू जुंदाल जी नावं सांगेल त्या नावांनी या मुजाहिदिनांची बनावट ओळखपत्र बनविण्यात येणार होती. ते विद्यार्थी आहेत असं वाटण्यासाठी एखाद्या महाविद्यालयाच्या नांवाचा वापर करण्यात येणार होता. अबू जुंदालनं लॅपटाॅवर इंटरनेटच्या सहाय्यानं शोध घेतला. त्यात त्यानं हैदराबादच्या अरुणोदय पी.जी. अँड डिग्री काॅलेजची निवड केली. इंटरनेटवरुन या महाविद्यालयाच्या ओळखपत्राचा नमुनाही डाऊनलोड करुन घेतला. हीच ओळखपत्र पुढं कसाबकडं आणि मारल्या गेलेल्या अन्य अतिरेक्यांकडं मिळाली.

पोलिसांनी या ओळखपत्राबाबत दोन साक्षीही कसाबच्या सुनावणीच्या वेळी नोंदवल्या होत्या. कसाबच्या ओळखपत्रावर '254, टिचर्स काॅलनी, नागराभावी बंगळूरु.....' असा पत्ता होता. तो पत्ता होता उषा श्री. शिवकुमार यांच्या घराचा. त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. तसंच ज्या अरुणोदय डिग्री अँड पी.जी महाविद्यालयाची ही कथित ओळखपत्रं होती, त्या महाविद्यालयाच्या वतीनं जी. राधाकृष्णन यांनीही न्यायालयात येऊन साक्ष दिली. त्यावेळी त्यांनी खऱ्या व बनावट ओळखपत्रांतला फरकही समजावून सांगितला होता...``

मुंबईवरील हल्ल्यात 'रेकी' करण्याची महत्त्वाची भूमिका सध्या अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीने निभावली होती. २६/११ च्या प्रकरणात हेडलीला अमेरिकेत अटक झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे हेडलीचा जबाब नोंदवला होता. याबाबत रमेश महाले सांगतात....

हेडलीच्या त्या जबाबातून आम्हाला अनेक बाबींचा उलगडा झाला. मुंबईत पकडला गेलेला कसाब आणि मारले गेलेले उर्वरित नऊही अतिरेकी यांच्या मनगटांवर हिंदू बांधतात त्याप्रमाणे लाल धागे बांधेलेले होते. हे धागे हेडलीनं मुंबईतल्या सिद्धी विनायक मंदीराला दिलेल्या भेटी दरम्यान तिथल्याच एका दुकानातून खरेदी केले होते. हे धागेही त्याने साजीद मीर उर्फ वशी याला दिले होते. मुंबईवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांनी हे धागे आपल्या मनगटावर बांधल्यास ते हिंदू आहेत असं भारतीय तपास यंत्रणांना वाटेल आणि त्यांची दिशाभूल होईल, असं हेडलीनं साजीद मीरला सांगितलं होतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com