अजित पवारांची कसोटी लागणाऱ्या पुणे जिल्ह्याचे काय आहे राजकीय चित्र?

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येथे मांड होती. 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ओहोटी लागली. 2019 च्या निवडणुकीत निवडणूक अर्ज भरण्यासाठी दोन दिवस बाकि असतानाचे हे राजकीयचित्र... जुन्नरपासून ते इंदापूरपर्यंतचा हा आढावा.
अजित पवारांची कसोटी लागणाऱ्या पुणे जिल्ह्याचे काय आहे राजकीय चित्र?

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बारामती, पुरंदर व भोर या मतदारसंघातील महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली असून, येथील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, उर्वरित सात मतदारसंघात लढती नक्की कशा होणार, याची उत्सुकता बुधवारी (ता. 2) रात्रीपर्यंत कायम होती. तरीही किमान निम्म्या ठिकाणी मागील वेळी झालेल्या उमेदवारांमध्ये लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

पुणे जिल्ह्यातील महायुतीचे जागा वाटप निश्‍चित झाल्यात जमा आहे. येथे युतीच्या जागा वाटपातील बारामती व इंदापूरची शिवसेनेकडील जागा आता भाजपच्या वाट्याला आली आहे. बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात भाजपने धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना मैदानात उतरवले आहे. इंदापूरमध्ये कॉंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून रिंगणात उतरले आहेत. येथे राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने व बाजार समितीचे अप्पासाहेब जगदाळे यांनी दंड थोपटले आहे.

दौंडची जागा अपेक्षेप्रमाणे रापसच्या वाट्याला आली आहे. येथे विद्यमान आमदार राहुल कुल हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात हे असतील, अशी शक्‍यता आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार हेही इच्छुक आहेत. त्यामुळे येथे कुल- थोरात ही पारंपरिक लढत होणार की तिसराच उमेदवार रिंगणात असणार, याची उत्सुकता आहे.

भोर मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे कॉंग्रेसकडून हॅटट्रिक करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात मागील वेळेचे शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे हेच उमेदवार आहेत. मात्र, येथे भाजप व राष्ट्रवादीकडून बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. येथे भाजपकडून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दगडे हे उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य रणजित शिवतरे, शंकर मांडेकर हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. तसेच, शिवसेनेमध्ये उमेदवारी न मिळालेले माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे, बाळासाहेब चांदेरे व आत्माराम कलाटे हे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला असणाऱ्या पुरंदर मतदारसंघात कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे त्यांनी शिवसेनेचे विद्यमान राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. मात्र, राष्ट्रवादीमधील नाराज कोणती भूमिका घेतात, यावर या लढतीचा निकाल अवलंबून आहे.

जुन्नरमध्ये अतुल बेनके हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. येथे शिवसेनेकडून हकालपट्टी झालेल्या जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच, कॉंग्रेसकडून इच्छुक विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

आंबेगावात राष्ट्रवादीकडून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हेच उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात शिवसेनेला अद्याप उमेदवार सापडला नाही. मात्र, राष्ट्रवादीचे पदाधिकारी मंगलदास बांदल यांनीही येथे अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या घरातील सदस्याच्या नावाची चर्चा आहे.

खेडमध्ये विद्यमान आमदार सुरेश गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप मोहिते मैदानात असण्याची शक्‍यता आहे. या दोघांच्याही विरोधात तालुक्‍यात सर्वपक्षीयांनी एकत्र येत तिसरी आघाडी केली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप नाव निश्‍चित झालेले नाही.

शिरूरमध्ये भाजपने विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. येथे राष्ट्रवादीकडे माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच चालली आहे.

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपने रंगतदार लढत होणार आहे, परंतु मैदानात कोण असणार, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. येथे विद्यमान राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उमेदवारीला पक्षातील सुनील शेळके व रवींद्र भेगडे या दोघांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात भाजपने बंडखोरीच्या भीतीने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. येथील भाजपचा नाराज इच्छुक राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, अशी चर्चा आहे. पण, राष्ट्रवादीतील नेत्यांकडून त्याला विरोध होण्याची शक्‍यता आहे. निष्ठावंतांनाच न्याय देण्याची मागणी होत आहे.

खडकवासल्याचा भोरवर प्रभाव
खडकवासला मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. तर, भोरमध्ये शिवसेनेने कुलदीप कोंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भोरमध्ये भाजपकडून किरण दगडे हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. हा एकप्रकारे शिवसेनेला इशारा असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com