पृथ्वीराज देशमुख यांना आमदार करण्यामागे भाजपचा  डाव काय? 

पृथ्वीराज देशमुख यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी देताना भाजपने काय डाव खेळलाय, हा सध्या औत्सुक्‍याचा विषय आहे. कारण, भाजपच्या निष्ठावंत मंडळींची आधीच मोठी रांग असताना आणि संग्रामसिंह देशमुख यांची विधानसभेची पलूस-कडेगावची उमेदवारी निश्‍चित मानली जात असताना त्यांचे चुलतबंधू पृथ्वीराजबाबांना दिलेले संधी आगामी राजकारणात नवा पट मांडला जाऊ शकतो, असेही संकेत देणारी आहे. अर्थात, पृथ्वीराज देशमुख यांचा भाजपच्या वरिष्ठ केडरमधील संपर्क आणि राजकीय चातुर्य हे निवडीमागचे कारण असल्याचेही दुर्लक्षित करता येणार नाही.
prithviraj-Deshmukh
prithviraj-Deshmukh

सांगली : विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी कुणाला संधी मिळणार, हा विषय लोकसभा निवडणुकीच्या आधीच एका कारणाने चर्चेत आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना 'बिग ऑफर' दिल्याचे चंद्रकांतदादा बोलून गेले होते. ती ऑफर अर्थातच देशमुख यांची रिक्त झालेली जागा आणि मंत्रिपद अशी होती. पडळकर यांनी ती ऑफर नाकारली. लोकसभा निकालानंतर त्याची फार चर्चा झाली नाही आणि अचानक पृथ्वीराज देशमुख यांचे नाव चर्चेला आले. त्यांची उमेदवारीही भाजपने जाहीर केली. ते आता बिनविरोध आमदार झाले  आहेत.

पृथ्वीराज देशमुख यांचा विधान परिषदेसाठी भाजपने यावेळी प्रथमच विचार केला असेही नाही. याआधी अशीच एक घटना घडली आणि पृथ्वीराज देशमुख यांचे नाव विधान परिषदेसाठी घेतले गेले. रासपचे नेते महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज पक्षांतर कायद्याने अपात्र ठरेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पृथ्वीराज यांना पर्यायी अर्ज भरायला सांगितला गेला. जानकर पात्र ठरले आणि पृथ्वीराज यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे भाजपचे देशमुख यांच्याकडे लक्ष होतेच. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतपर्यंत केडर बांधणीत भाजप भारी ठरले आहे. त्यामागे देशमुखांची एक स्वतंत्र टीमही काम करतेय. संजयकाकांशी उभा संघर्ष होत असतानाही त्यांनी "आधी पक्ष' याला महत्त्व दिले, हेही अधोरेखित व्हावे.

आता भाजपला विधानसभेचे टार्गेट आहे आणि तेही 144 प्लसचे. त्यात सांगलीतील आणखी तीन मतदार संघात त्यांना संधी शोधायची आहे. त्यात इस्लामपूर, तासगाव आणि महत्त्वाची म्हणजे पलूस-कडेगाव भाजपसाठी मोठे आव्हान आहे. पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुख उमेदवार असतील, हे भाजपने आधीच जाहीर केले आहे. तरीही, पृथ्वीराज यांना विधान परिषद कशी? हा प्रश्‍न राजकीय चर्चेचा विषय नक्कीच बनणार होता. तो बनला. त्यामागे आणखी काही कारणांची दबी चर्चाही सुरू झाली. केंद्रातील भाजपच्या एकहाती सत्तेनंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये "इनकमिंग' सुरू होईल, असे संकेत मिळत आहेत. सांगली जिल्ह्यातील एक मोठे राजकीय घराणेही भाजपमध्ये जाईल अशी चर्चा आहे. अशा स्थितीत भाजपसमोर नवी पटमांडणी करण्याचे नवे आव्हान असेल. त्यादृष्टीने देशमुखांना जी लॉटरी लागली आहे त्याकडे पाहिले जाते.

या घडामोडींत भाजपच्या मूळ केडरमध्ये मात्र पुन्हा एकदा 'नाराजी'चे पडसाद आहेत. निष्ठावंतांना 'प्रतीक्षा यादी'त रहावे लागले आहे. विशेषतः विधान परिषदेची उमेदवारी सांगलीत द्यायची होती तर दीपक शिंदे, नीता केळकर, मकरंद देशपांडे अशा जुन्या जाणत्यांचा विचार का नाही, याची दबी चर्चा होते आहे. कारण मकरंद देशपांडे हे संघ आणि भाजप यात दुवा साधण्याचेही काम करतात आणि गेली चार वर्षे त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणून पश्‍चिम महाराष्ट्रात पडद्यामागे बरेच काम केले आहे. 

दीपक शिंदेही थिंक टॅंकमध्ये आहेत. याशिवाय विधान परिषदेसह विधानसभेसाठी इच्छुकांची यादी मोठी आहे. माजी आमदार दिनकर पाटील यांनी आताच उचल खाल्ली असून "भावी आमदार' म्हणून त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर चर्चा घडवून आणताहेत. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, तम्मनगौडा रविपाटील बंडाची भाषा करताहेत. अर्थात, 'बाहुबली' भाजपपुढे आता विधानसभेपर्यंत हे आव्हान असणार आहे. त्यात पृथ्वीराज देशमुख यांची 'लॉटरी' लागली, इतरांना प्रतीक्षा करावी लागेल. त्यादृष्टीने भाजप पटमांडणी करतोय. ती अधिक रंजक असेल. कारण, आधीच गर्दी असलेल्या भाजपमध्ये पुन्हा "भरती' निघेल, त्यात कोण-कोण असेल, याकडे विशेष लक्ष राहणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com