आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : क्रिम पोस्टींग आणि साईड पोस्टींगचे निकष काय ? 

 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : क्रिम पोस्टींग आणि साईड पोस्टींगचे निकष काय ? 

मुंबई ता. 28: राज्यातील आयपीएस दर्जाच्या 137 अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी बदल्या करण्यात आल्याची बहुदा ही पहिली वेळ असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे. मात्र राज्याच्या गृह खात्याने हा निर्णय घेताना, बदल्यामधील पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी, क्रिम पोस्टींग आणि साईड पोस्टींगचा निकष कसा लावला? यावरुन आता राज्य पोलीस दलात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे एप्रिल किंवा मे महिन्यात पोलीस दलातील उच्चपदस्य अधिकारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. आपल्या शहरात कोण पोलीस अधिकारी असावा किंवा त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात यावी, अशा अनेक शिफारशी किंवा पत्रे मुख्यमंत्र्यांपासून गृहखाते सांभाळणाऱ्या मंत्र्यांना येतात, असा आजवरचा अनुभव आहे. 

आघाडी सरकारच्याकाळात तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात उच्चपदस्य अधिकाऱ्यापासून साध्या पोलीस शिपायापर्यंत बदल्याबाबतचा विषय येत होता.  गृहखात्यांच्या कारभारातील बदल्यांची चर्चा त्यावेळपासून सुरु झाली होती.

 त्यामुळे, गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदल्याच्या अर्थकारणामुळे बदनामीचा धोका निर्माण होउ नये याची विशेष काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यातून बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप टाळण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न केला गेला असल्याचे बोलले जाते.


 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अनेक आमदार तसेच मंत्र्यांनी आपल्या भागात कोणता आयपीएस अधिकारी असावा, अशी तोंडी तसेच पत्रातून विनंती केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी या विनंतीकडे कानाडोळा केल्याचे गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या 137 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या यादीतून दिसून आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 गृहखात्याने पहिल्यांदा राज्यातील सर्व आयपीएस अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या करण्याचा निर्णय घेताना, विशेष पोलीस महानिरिक्षक दर्जाचे 16 अधिकारी, बदली आणि बढती झालेल्या 17 अधिकाऱ्यांसह जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या 104 अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतची परिपत्रके एकाच दिवशी काढली. गृह खात्याच्या या निर्णयामुळे, वशिलीबाजी आणि राजकीय दबाव आणण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली असली तरी, क्रिम पोस्टींग आणि साईड पोस्टींग देताना कोणते निकष लावण्यात आले, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. 

मुंबई, ठाणे, पुणे शहरासह प्रमुख ठिकाणी आपली बदली व्हावी अशी मानसिकता उच्च पदस्य पोलीस अधिकाऱ्यांची असते. तसेच, उदाहरण द्यायचे झाल्यास मुंबई शहरात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला एका पोलीस परिमंडळातून दुसऱ्या परिमंडळात बदली व्हावी अशी इच्छा असते. तसेच शहरात वर्षोनुवर्षे काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची ग्रामीण भागात बदलीवर जाण्याची मानसिकता नसते. 

त्यातून बदली होताना आपल्या आवडीचे ठिकाण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पोलीस अधिकाऱ्यांकडूनही फिल्डींग लावली जात होती. तसेच त्यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असल्याची चर्चा होत असे. हा सर्व पुर्वानुभव लक्षात घेता, यंदा पहिल्यांदाच एकाच वेळी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या एकाच दिवशी करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त, विशेष पोलीस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची उर्वरित दुसरी बदल्यांची यादी काढली जाणार नसल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांने स्पष्ट केले. त्यामुळे. पुढील यादीत वशिलेबाजी करण्याची संधी कोणालाही मिळणार नाही, ही चांगली बाब होणार आहे. 

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही आयपीएस अधिकाऱ्यांना क्रिम पोस्टींग देण्यात आल्या आहे. कोणाला क्रिम पोस्टींग तर कोणाला साईड पोस्टींग द्यायच्या हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या मर्जीने घेतला गेला असला तरी, यामधील काही अधिकाऱ्यांना कायम साईड पोस्टींग मिळत गेल्यामुळे, यामागे काय अर्थ दडला आहे, अशी कुजबुजही आता पोलीस दलात ऐकू येवू लागली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com