मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे : रूपाली चाकणकर 

अतिवृष्टीची पूर्वकल्पना मिळूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले, सरकार पुराचे नियोजन करू शकले नाही. एकूणच कोल्हापूरसह राज्यातील पूरस्थिती हाताळण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे - रुपाली चाकणकर
मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे : रूपाली चाकणकर 

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यात भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून केवळ व्हीडीओ कॉन्फरसिंग व हवाई पाहणीद्वारे पुरस्थितीचा आढावा घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली. 

जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी सौ. चाकणकर कोल्हापुरात आल्या होत्या. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, महिला अध्यक्षा सौ. वहिदा मुजावर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सौ. चाकणकर यांनी कागल, मुस्लिम बोर्डींग, चित्रदुर्ग मठ, बापट कॅम्प, जाधववाडी, कुंभार गल्ली आदि पूरग्रस्त भागाचा दौरा करून याठिकाणी थांबलेल्या पूरग्रस्तांची विचारपूस केली. 

त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या,"अतिवृष्टीची पूर्वकल्पना मिळूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले, सरकार पुराचे नियोजन करू शकले नाही. एकूणच कोल्हापूरसह राज्यातील पूरस्थिती हाताळण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. पूरस्थितीपेक्षा मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रीची काळजी लागली आहे. गेल्या पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले असते तर त्यांना ही यात्रा काढण्याची गरज लागली नसती. मंत्री गिरीश महाजन हे सेल्फी काढण्यात दंग होते. तर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे कुठेही फिरकल्या नाहीत. एकूणच येत्या विधानसभा निवडणुकीत जनता या सरकारला नक्कीच धडा शिकवेल.''
 
पूरग्रस्तांना मदत करताना शासन त्यांच्याकडे कागदपत्राची मागणी करते यावरून त्यांची संवेदनशीलता दिसून येते, असा टोलाही सौ. चाकणकर यांनी लगावला. यावेळी सुनिता राऊत, माई वाडेकर, मंगल कट्टी, सुरेखा सावंत, माधुरी सुर्यवंशी आदि उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com