we will defeat COVID19 says mohan bhagwat | Sarkarnama

कोरोनावर विजय हाच संकल्प करा - डॉ. मोहन भागवत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

संपूर्ण जग कोरोना विरुध्द लढत असताना, ही लढाई जिंकण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांची संचारबंदी जाहीर केली. संघस्वयंसेवक वर्षप्रतिपदेला संकल्प करतो. त्यामुळे आजचा संकल्प कोरोनावर विजय मिळविण्याचा करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

नागपूर : संपूर्ण जग कोरोना विरुध्द लढत असताना, ही लढाई जिंकण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांची संचारबंदी जाहीर केली. संघस्वयंसेवक वर्षप्रतिपदेला संकल्प करतो. त्यामुळे आजचा संकल्प कोरोनावर विजय मिळविण्याचा करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथेप्रमाणे दरवर्षी रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात वर्षप्रतिपदेचा उत्सव होतो. या उत्सवाला अनेक प्रकारे महत्त्व असून, महानगर स्तरावर वहन करणाऱ्या पदांची घोषणा वर्षप्रतिपदेलाच होते. शिवाय वर्षप्रतिपदा संघसंस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांची जयंती असल्याने आद्यसरसंघचालक प्रमाण देण्याचीही आजची प्रथा आहे. मात्र संपूर्ण देश कोरोनाच्या सावटात असल्याने यंदा संघाने स्वत:च्या घरीच वर्षप्रतिपदा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. तर सकाळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला.

केंद्र शासनाच्या सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. हे देखील एकप्रकारचे संघकार्य आहे. स्वयंसेवकांना एकत्र येणे शक्‍य नसल्याने स्वतःच्या घरी राहून कुटुंबासह संघाची प्रार्थना करावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले. संघाचा स्वयंसेवक कायमच असामान्य परिस्थिती अशी लढत आला. त्यामुळे आजच्या स्थितीला पूरक असलेले वर्तन स्वयंसेवक ठेवणार आहे. देशात काही ठिकाणी योगदान देण्याची आवश्‍यकता पडू शकते. पण केंद्र शासनाच्या सूचनांचे संपूर्ण पालन करून आपल्याला हे प्रयत्न करायचे असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी यापूर्वी केलेल्या सूचनांचे पालन करावे. यापुढेही अशा अनेक सूचना त्यांच्याकडून येत राहतील, स्वाभाविकपणे केंद्र शासनाच्या सूचनांना अनुसरूनच सरकार्यवाह मार्गदर्शन करतील, असा विश्वास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख