आज उपोषण, उद्या रस्त्यावर उतरू - देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ठणकावले 

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला 'आता उपोषण करत आहोत, उद्या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी रस्त्यावर उतरू' असा निर्वाणीचा इशारा दिला आहे
Devendra Fadanavis Visits Pankaja Munde Agitation Site at Aurangabad
Devendra Fadanavis Visits Pankaja Munde Agitation Site at Aurangabad

औरंगाबाद : गेल्या पाच वर्षात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले .अनेक योजना आणल्या , जलयुक्त शिवार असेल वॉटर ग्रीड असेल पश्चिमेतील नद्या वळवण्याचे योजना असतील , या सगळ्यांना गती देण्याचं आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं काम आम्ही जोमाने हाती घेतले होते.

परंतु आत्ताच्या सरकारकडून त्या कामात खोडा घालण्याचा आणि योजनांना स्थगिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप करत ,माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला 'आता उपोषण करत आहोत,  उद्या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी रस्त्यावर उतरू' असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे मराठवाड्यातील नेत्यांसह एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसल्या आहेत .या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस दुपारी उपोषणस्थळी आले होते .

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून हल्ला चढवला . फडणवीस म्हणाले, ''मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या अनेक योजनांचे टेंडर रद्द करणे ,स्थगिती देणे एवढेच काम या सरकारकडून सुरू आहे.  दिवंगत गोपीनाथ मुंडे असतील किंवा आता त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी नेहमीच मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे आम्ही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी कायदेशीर लढा दिला, सरकारी पातळीवरील अडथळे दूर करून अनेक योजना आणल्या.''

''जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने पावले उचलली .मात्र आताच्या महाविकास आघाडी सरकारने या योजनांमध्ये खोडा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या योजना पूर्ण होऊन मराठवाडा दुष्काळ मुक्त व्हावा यासाठीच पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे एक दिवशी लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे,'' असेही फडणवीस म्हणाले. 

या उपोषणाला माझा पाठिंबा तर आहेच पण सरकारने या योजना वेगाने पुढे सुरू ठेवाव्यात अन्यथा आज उपोषण केले उद्या रस्त्यावर उतरू असा निर्वाणीचा इशारा देखील आम्ही यानिमित्ताने सरकारला देत आहोत असेही फडणवीस यांनी निक्षून सांगितले. 

शिवसेनेला टोला

''औरंगाबादच्या पाणीप्रश्‍नासाठी आम्ही सोळाशे कोटींची योजना दिली मात्र या सरकारने अद्याप या योजनेवर एकही रुपया खर्च केलेला नाही . कंत्राट कुणाला द्यायचे यावरूनच सध्या स्पर्धा सुरू आहे. कंत्राट कुणालाही द्या, योजनेला कुणाचे नाव घ्यायचे ते द्या ,पण शहरातल्या नागरिकांना प्यायला पाणी द्या अशी आमची मागणी आहे,'' असे सांगत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. कार्यकर्त्यांनी दिवसभर उपोषणाच्या ठिकाणी बसून राहावे आणि हे उपोषण यशस्वी करावे असे आवाहनही शेवटी फडणवीस यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com