शेतकरीहितासाठी आम्ही बेनकेंच्या पाठीशी : शेरकर; संजय काळेही पाठीशी

शेतकरीहितासाठी आम्ही बेनकेंच्या पाठीशी : शेरकर; संजय काळेही पाठीशी

ओझर :"कुकडीच्या हक्काच्या पाण्यापासून जुन्नर तालुक्‍यातील शेतकरी वंचित राहिल्याने तालुक्‍याची आर्थिक घडी विस्कटली. विधानसभा निवडणुकीत तालुक्‍यात परिवर्तन न झाल्यास भविष्यकाळात हीच स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. शेतकरीहितासाठी मतभेद बाजूला ठेवून बेनके, काळे आणि मी एकत्र आलो आहेत,'' असे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.


आदिवासी नेते यशवंत मडके यांच्या 75व्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शेरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती संजय काळे होते. या वेळी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार अतुल बेनके, "विघ्नहर'चे उपाध्यक्ष अशोक घोलप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, बाजीराव ढोले, बाळासाहेब खिलारी, संतोष तांबे, निवृत्ती काळे, नाना घोडे, तुळशीराम भोईर, तुळशीराम शिंदे उपस्थित होते.

शेरकर म्हणाले, "आमच्यातील मतभेदाचा फायदा निवडणुकीत इतरांना झाला आहे. यामुळे मागील पाच वर्षांत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. तालुक्‍यात परिवर्तन होणार, बेनके हे विजयी होणार, असा शब्द मी पवार यांना दिला आहे.''

शरद लेंडे म्हणाले, ""मागील पाच वर्षे माझी आठवण न आलेले लोकप्रतिनिधी निवडणुकीसाठी माझा आशीर्वाद घेण्यासाठी आता येतात. त्यांना माझा आशीर्वाद मिळणार नाही.''

सभापती काळे म्हणाले, ""जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. शेतकरीहितासाठी आम्ही तिघे एकत्र आल्याने विधानसभा निवडणुकीत अतुल बेनके हे पन्नास हजारांच्या मताधिक्‍याने विजयी होतील.''

बेनके म्हणाले, ""सिंचन, रोजगार, दूध उत्पादन, शिक्षण, स्पर्धा परीक्षा या क्षेत्रांत तालुक्‍यात भरीव काम करायचे आहे. कांदळी औद्योगिक वसाहतीचा विस्तार करून सुमारे अडीच हजार तरुणांना रोजगार देणार आहे. कात्रज संघाच्या माध्यमातून दूध पॅकिंग प्रकल्पाची उभारणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणार आहे. कुकडीचे हक्काचे पाणी तालुक्‍याला देण्यासाठी मी ठाम आहे.''
सीताराम खिलारी, पांडुरंग पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com