काॅंग्रेसला आधार देण्याचा आम्ही मक्‍ता घेतलेला नाही : आंबेडकर

लोकसभेच्या 2019 च्या निवडणूक निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी केलेले हे भाष्य!
काॅंग्रेसला आधार देण्याचा आम्ही मक्‍ता घेतलेला नाही : आंबेडकर

कॉंग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले आहे. राज्यातल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले आहे, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का याबाबतचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र यापुढे कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करताना समसमान पातळीवर येवून बोलावे लागेल कारण कॉंग्रेससोबतच राजकारणातली गुलामीची व्यवस्था संपली आहे. 

वंचित बहुजन आघाडीने जवळपास 14 टक्‍के मते घेतली हे आमचे यशच आहे. कॉंग्रेस राज्यात समूळ नष्ट झाली आहे आणि त्याला वंचित बहुजन आघाडी जबाबदार आहे असे शिक्‍का मारला जातोय, तो चुकीचा आहे. कॉंग्रेस त्यांच्या कर्तुत्वाने नष्ट झाली आहे. राजकीय पक्ष म्हणून आमची जागा तयार करण्याचा आम्हाला अधिकार आहे. मात्र कॉंग्रेसला आधार देण्याचा आम्ही मक्‍ता घेतलेला नाही. या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उच्चाटन होण्याचे कारण मागच्या पाच वर्षात ती अजिबात कुठेच शिल्लक नव्हती. निवडणुक लढविण्यासाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हते. त्यांच्याकडे जिथे उमेदवार नाहीत त्या जागा आम्हाला देण्याची मागणी त्यांनी फेटाळली. कॉंग्रेसचे किती उमेदवार निवडून आलेत? बाहेरून आलेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार निवडून आला आहे. कॉंग्रेसने स्वत:च स्वत:ला संपवले आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून बॅलेटपेपर निवडणूक लढविली जावी यासाठी आग्रह धरण्याची आवश्‍यकता आहे. किंबहुना त्यासाठी देशपातळीवर आंदोलन करण्याची आवश्‍यकता आहे. महाराष्ट्रापासूनच बॅलेटपेपर पुन्हा आणण्याची आवश्‍यकता आहे. इव्हीएम ही टेक्‍नॉलॉजी आहे आणि कुठलं तंत्र निकामी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान येतच असतं. घरातला ओव्हन जर आपण दूर कुठूनही चालू बंद करू शकतो, तर इव्हीएम का नाही? जपानसारख्या इलेक्‍ट्रॉनिकमध्ये क्रांती केलेल्या देशात जर बॅलेटपेपरवर निवडणूका होत असतील तर भारतात का नको? बॅलेटवर निवडणूक होणार नसतील तर निवडणूकीत सहभाग घ्यायचा नाही अशाप्रकारची भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेवून त्यावर ठाम राहण्याची आवश्‍यकता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com