पाणीप्रश्नी पिंपरीत भाजपविरुद्ध शिवसेनाही मैदानात 

पाणीप्रश्नी पिंपरीत भाजपविरुद्ध शिवसेनाही मैदानात 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरात लागू केलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याविरोधात शिवसेनेनेही शनिवारी दंड थोपटले. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला नाही,तर उद्रेक होईल, असा इशारा पक्षाचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील व खासदार श्रीरंगप्पा बारणे यांनी आज दिला. 

त्यामुळे शहराचे कारभारी भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सुचनेनुसार पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लागू केलेल्या या पाणीकपातीला आता शिवसेनेचे अप्पा विरुद्ध भाजपचे भाऊ असे वळण मिळाले आहे. 

दरम्यान,आढळराव,बारणे, माजी आमदार ऍड. गौतम चाबूकस्वार,जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे, जिल्हा महिला संघटिका (शिरूर) सुलभा उबाळे, पालिकेतील गटनेते राहूल कलाटे व इतर पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना पाणीप्रश्नी घेराव घातला. त्यांना यावेळी पुरवठा होणाऱ्या दुषित पाण्याची बाटली भेट देण्यात आली. त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठा बंद केला नाही,तर जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेनेने दिला. 

दरम्यान, राज्यात सत्ताबदल होताच भाजप व त्यातही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुलेट ट्रेनसारखे एकेक महत्वाकांक्षी प्रकल्प महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बंद करीत आहेत.तर, दुसरीकडे उद्योगनगरीत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने दररोजचा बंद केलेला पाणीपुरवठा सुरु करा असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेना,भाजपची युती झाल्याने गेली दहा वर्षे टोकाचे वितूष्ट असलेल्या अप्पा,भाऊंत सलोखा झाला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेसबरोबर राज्यात सत्ता स्थापन झाल्याने या दोन्ही पक्षांत पुन्हा दुरावा आला आहे. त्याचे पडसाद पालिकेत व शहरातही उमटले आहेत.पाणीपुरवठा करणारे पवना धरण भरूनही दिवसाआड पाणी केल्याने भाजपविरुद्ध प्रथम मनसे व कॉंग्रेसने आंदोलन केले. 

त्यानंतर राष्ट्रवादी मैदानात उतरली. तर,आज शिवसेनेनेही भाजपविरुद्ध दंड थोपटले. आयुक्त हर्डीकर हे पालिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक निष्क्रिय आयुक्त असल्याची तोफ बारणेंनी डागली. त्यांच्या राजवटीतच पालिका अधिकाऱ्यांत भ्रष्टाचार बोकाळला. त्यामुळे त्याला खतपाणी घालणारे आयुक्तच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तर, पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार असल्याचे आढळराव म्हणाले. भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याचे पुणे पालिकेचे काम जवळपास पूर्ण होत असताना पिंपरी पालिकेचे ते अद्याप सुरुही झालेले नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com