निवडणुकीआधी इंदापूरचे पाणी पेटले...

निवडणुकीआधी इंदापूरचे पाणी पेटले...

वालचंदनगर : विधानसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना इंदापूर तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रश्‍नावरुन  राजकारण सुरु झाले आहे. तालुक्यातील पाझर तलावामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याचे श्रेय लाटण्यासाठी आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये चढाओढ सुरु  आहे.

इंदापूर तालुक्याकडे या वर्षीही पावसाने पाठ फिरवली आहे. तालुक्यातील दोन्ही बाजूच्या नीरा व भीमा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मात्र तालुक्यातील पाझर तलाव कोरडे आहेत. तालुक्यातील सर्व पाझर तलाव नीरा डाव्या व खडकवासला कालव्याच्या पाण्याने भरणण्याचे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी होती.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शनिवार (ता.१४) रोजी महाजनादेश यात्रेमध्ये तालुक्यामध्ये पाझर तलाव  तातडीने भरण्याचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांना सांगितला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने तलाव भरण्याचे  तोंडी आदेश दिले. यानंतर तालुक्यातील तलावामध्ये खडकवासल्यातून पाणी येण्यास सुरवात झाली. गेल्या दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी पाणीपूजन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या आदेशामुळे तालुक्यात पाणी आल्याचे भाजपचे कार्यकर्ते सोशल मिडीयावर सांगत आहेत.

यानंतर आज शुक्रवार (ता.२०) रोजी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी तरंगवाडीच्या तलावातील पाण्याचे पुजन केले. यावेळी भरणे यांनी सांगितले की, तालुक्यातील पाझर तलावामध्ये पाणी सोड्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आंदोलन केले होते.  दौंड व बारामती तालुक्यातील पाण्याचे रोटेशन संपले असल्यामुळे आंदोलनामुळे  इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याचे काम रोटेशन प्रमाणे सुरु झाले आहे. आदेश वैगरे खोटे असून विराेधक खोटे बोलत असल्याचा आरोप केला.

पाणी सोडण्याचे लेखी आदेश नाहीत : पाटबंधारे विभाग
यासंदर्भात  खडकवासला पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की इंदापूरच्या पाझर तलावामध्ये पाणी सोडण्याचे लेखी आदेश वगैरे काही नाहीत. वरच्या तालुक्यांतील पाण्याचे रोटेशन संपल्याने  इंदापूरला टेल टू हेड पाणी पद्धतीने रेग्युलर पाणी सोडले असल्याचा खुलासा केला. त्यामुळे इंदापूरला पाणी कसे आले आणि कोणामुळे आले,  याचे उत्तर शोधणे कठीण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com