फडणविसांच्या सभा झालेल्या जागांवर भाजपचा पराभव; वाशिममध्ये आमदारपूत्र गेले घरी

वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे....
washim zp election result
washim zp election result

वाशीम : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेऊनही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. मागील जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे सातच सदस्य होते. या निवडणुकीत ज्या जिल्हा परिषद गटांत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभा झाल्या त्या दोन्ही गटांत भाजपचे उमेदवार पराभूत झाले. जिल्हा परिषदेमध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 12 जागांसह समोर आला आहे.

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे तीन पैकी दोन आमदार आहेत. निवडणुकीच्या सुरवातीलाच भाजपने शिवसंग्राम व रिपाइं आठवले गटाला डावलून आपल्या हेक्याने उमेदवार जाहीर केले होते. त्याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसला. प्रचंड संसाधने वापरूनही भारतीय जनता पक्षाला दोन अंकी संख्या गाठता आली नाही. जिल्ह्यामध्ये भाजपचे नेतृत्त्व अल्पसंख्यांक समाजाकडे आहे. भाजपचा शहरी तोंडवळ्याचा पक्ष म्हणून ओळख आहे. गेल्या पाच वर्षांत सत्ता असूनही भाजपला ग्रामीण भागात पाळेमुळे रोवता आली नाहीत. हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
....
माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या जागाही गमावल्या
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात तिकीट वाटपावरून प्रचंड अंतर्गत गटबाजीला उधाण आले होते. तरीही जिल्हाध्यक्षांच्या आग्रहास्तव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर जैन व अनसिंग येथे प्रचार सभा घेतल्या. शिरपूरची जागा भाजपची परंपरागत जागा असूनही या सभेनंतरही काँग्रेसने ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली. अनसिंग येथेही भाजपचा सपसेल पराभव झाला.
....
आमदार पूत्र पराभूत
वाशीम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लखन मलिक यांचे चिरंजीव नीतेश मलिक हे वारला जिल्हा परिषद गटात भाजपचे उमेदवार होते. या गटात शिवसेनेचे सुरेश कर्‍हे यांनी नीतेश मलिक यांचा पराभव केल्याने, भाजपचा पाय आणखी खोलात गेला आहे.
...
जिल्हा परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ
राष्ट्रवादी काँग्रेस ..........12
काँग्रेस ....................09
भाजप .....................07
शिवसेना ..................06
जनविकास आघाडी.......07
वंचित आघाडी ...........08
अपक्ष......................02
स्वाभिमानी ................01
एकूण .....................52
.......
सत्तास्थापनेत भाजप परिघाबाहेर
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व जनविकास आघाडी यांची आघाडी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भाजप व शिवसेनेचे विळ्य-भोपळ्याचे सख्य पाहता या आघाडीत शिवसेना सामिल होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत एकाकीपण ओढवून घेतलेली भाजपा जिल्हा परिषदेतही एकाकी पडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com