वर्धा : विधानसभेसाठी आत्ताच ठोकले शड्डू; चुरशीच्या लढती होणार

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीपासूनच येत्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. संभाव्य उमेदवार, इच्छुक, युती-आघाडीतील पक्षांतील नेते-पदाधिकारी कामाला लागले आहेत.
वर्धा : विधानसभेसाठी आत्ताच ठोकले शड्डू; चुरशीच्या लढती होणार

वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीपासूनच येत्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. संभाव्य उमेदवार, इच्छुक, युती-आघाडीतील पक्षांतील नेते-पदाधिकारी कामाला लागले आहेत. 

वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी या चार व अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी चुरशीच्या लढती होतील, हे आत्ताच स्पष्ट झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीत युती-आघाडी तयार झाल्याने ती रचना विधानसभेसाठीही राहील, असा विश्‍वास आहे. पण अखेरच्या क्षणापर्यंत काहीही सांगता येत नाही. त्यामुळे त्याकडे भाजप-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मागील विधानसभा निवडणुकीने जागावाटपाचे समीकरण बदलून टाकले आहे. वर्धा आणि हिंगणघाट हे दोन मतदारसंघ 2009 च्या निवडणुकीपर्यंत शिवसेनेकडे होती; मात्र, 2014 मध्ये या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या. असाच तिढा जवळपास सर्व मतदारसंघात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत युती-आघाडी झाल्यास जागावाटपाचे हे गणित बदलू शकते. 

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदारसंघात कॉंग्रेसचे वीरेन्द्र जगताप निवडून आले आहेत. तेथे भाजप प्रबळ आहे. मात्र दुसऱ्या मोर्शी मतदारसंघात मात्र युतीचे गाडे अडू शकते. तेथे गतवेळी भाजपाचे अनिल बोंडे निवडून आले आहे. तेथे शिवसेनाही मजबूत आहे. 

सध्या जिल्ह्यातील भाजप नेते हे वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी अशा चारही मतदारसंघांवर दावा करीत आहेत, तर दुसरीकडे, शिवसेनेकडून हिंगणघाट व वर्धा मतदारसंघ सोडण्याची तयारी नाही. यापैकी एखादा मतदारसंघ भाजपला सोडावा लागल्यास देवळी वा आर्वी मतदारसंघावर शिवसेना दावा करेल, हे निश्‍चित. 

आघाडी झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हिंगणघाटसोबतच वर्धा मतदारसंघाची मागणी होईल. वर्धा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांचा मागील दोन निवडणुकीत पराभव झाला आहे. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा नेते प्रा. सुरेश देशमुख हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. यावेळी देशमुख परिवार पक्षाकडे वर्धा मतदारसंघाची मागणी करीत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर तयारी सुरू झाली आहे. भेटीगाठी, पक्षांतर्गत मोर्चेबांधणी, नाराजांना जवळ करणे, पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना कमकुवत करण्याचे राजकारण पहायला मिळत आहे. काही उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची "तरतूद' करून घेतली आहे. 

- आघाडी, युती झाल्यास अनेक नेत्यांची पंचाईत 
- भाजपकडून देवळीत उमेदवारीसाठी भाऊगर्दी 
- शिवसेनेच्या युतीतील दोन मतदारसंघांचा तिढा 
- भाजप चारही मतदारसंघ लढविण्यास उत्सुक 
- बसपचे उमेदवार नेहमीप्रमाणे ठरतील वेळेवर 

असे आहेत इच्छुक... 
डॉ. पंकज भोयर (भाजप), शेखर शेंडे (कॉंग्रेस), प्रा. सुरेश देशमुख, समीर देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस), राजेश सराफ (शिवसेना), समीर कुणावार (भाजप), अशोक शिंदे (शिवसेना), राजू तिमांडे, ऍड. सुधीर कोठारी (राष्ट्रवादी कॉंग्रेस), अतुल तिमांडे (मनसे), अमर काळे (कॉंग्रेस), दादाराव केचे, सुधीर दिवे (भाजप), बाळा जगताप (शिवसेना), नीलेश देशमुख (अपक्ष), रणजित कांबळे (कॉंग्रेस), सुरेश वाघमारे, राजेश बकाणे, डॉ. शिरीष गोडे, मिलिंद भेंडे (सर्व भाजप) 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com