सत्तेचे लोणी खाण्यासाठी " त्यांनी ' पक्ष सोडला : रुपाली चाकणकर यांचा चित्रा वाघ यांना टोला

 सत्तेचे लोणी खाण्यासाठी " त्यांनी ' पक्ष सोडला : रुपाली चाकणकर यांचा चित्रा वाघ यांना टोला

नगर : कोणी कुठेही जाऊ देत, त्याचा आम्हाला फरक पडणार नाही. कोणाचीही पोकळी आम्हाला जाणवणार नाही. केवळ सत्तेचे लोणी खाण्यासाठी काहींनी पक्ष सोडला, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नुकत्याच भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांच्यावर केला. 

पत्रकारांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या, " महिलांचे संघटन वाढवण्यासाठी आपण राज्यभर दौरा करत आहोत. 29 तारखेचा पदभार स्विकारल्यानंतर संपूर्ण राज्याच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिला संघटना ताकतीने उतरणार असून, पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून देणार आहे. सध्याचे सरकार शेतकरी कामगार यांचे विरोधात आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. यासाठीच महिला सक्षमीकरण करण्यासाठी 12 कलमी कार्यक्रम आखणार असून, त्यामध्ये महिला सुरक्षा, महिलांचे आरोग्य, यावर अधिक भर देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. 

महिलांच्या सुरक्षेसाठी पक्षाच्यावतीने टोल फ्री क्रमांक देणार असून, त्या माध्यमातून संपूर्ण राज्यात महिलांना त्याचा लाभ होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना जास्तीत जास्त उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. विद्यमान सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूक जिंकत आहेत असाही आरोप त्यांनी केला. 

अजून कोणताही उमेदवार निश्‍चित झाला नाही, कोणत्याही मतदारसंघाचा अंदाज आलेला नाही, असे असतानाही सरकार मधील नेते मात्र ठराविक जागा जिंकण्याची भाकीत करत आहेत. हे केवळ ईव्हीएम मशीनच्या भरोशावर करत आहेत. राज्यातील कोणत्याही पोटनिवडणुका भाजपने जिंकल्या नाहीत, हे त्याचे द्योतक आहे. कारण पोटनिवडणुकांमध्ये बहुतेक ठिकाणी ईव्हीएम मशीनचा वापर नाही. आगामी काळात 12 कलमी कार्यक्रम आखताना निर्भया, महिलांचे प्रबोधन, महिलांची सुरक्षा, रोजगार उच्च शिक्षण, आदी विषयांवर भर दिला जाणार आहे." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com