बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागे कामाचा व्याप असला तरी गेले दोन दिवस ते टेन्शनमध्ये होते. कोणत्याही समस्येवर चटकन निर्णय घेणारे दादाच टेन्शनमध्ये असल्याने त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींनाही धास्ती असते. हा तणाव काही राजकीय समस्येचा नव्हता तर जवळच्या व्यक्तीच्या आजारपणामुळे ते अस्वस्थ होते.
पवार कुटुंबियांच्या घरी पूर्वीपासून कार्यरत असलेला जालिंदर शेंडगे हे त्यामागचे कारण. अजित पवार यांना लहानपणी सायकलने शाळेत पोहोचविण्यासह त्यांचे लाडही पुरविण्याचे काम जालिंदर उर्फ जेल्या हा करायचा. त्याचा वावर सर्वच पवार कुटुंबियात असल्याने पवार कुटुंबातील प्रत्येक जणच त्याला नावाने ओळखतो.
दोन दिवस बारामतीत विविध कामांचा व्याप असतानाही जालिंदर आजारी असल्याचा निरोप त्यांना मिळाला आणि त्यांना काळजी वाटली. त्याला कोणत्या उपचारांची गरज आहे, त्याचा खर्च या बाबतची सविस्तर चौकशी पवार यांनी तातडीने हातातले काम बाजूला ठेवत केली. पवार हे आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री झाले पण त्यांचा जालिंदरप्रती असलेला जिव्हाळा आहे तसाच राहिला आणि तो आजारी आहे म्हटल्यावर साहजिकच पवार यांनीही त्याला आजारातून काहीही करुन बरे करा, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
ही पण बातमी वाचा : भाजपने मेडिकल काॅलेजचे राजकारण करून नये ः अजित पवार
त्याला दवाखान्यात भरती केल्यानंतर डॉक्टरांशी चर्चा झाल्यानंतर व आता त्याच्यावर व्यवस्थित उपचार होतील याची खात्री झाल्यानंतरच अजित पवार बारामतीतून नागपूरकडे रवाना झाले. त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्याला काहीही होऊ द्यायचे नाही असा निरोप सर्वांना द्यायला ते विसरले नाहीत. कामाचा व्याप व बाकीच्या जबाबदा-या असतानाही अजित पवार हे चालक, सुरक्षारक्षक, सहायक किंवा कोणीही सहकारी असला आणि त्याच्यावर अडचणीची वेळ आली तर अजित पवार हे मोठ्या भावासारखे धावून जातात हे अनेकदा दिसले. जेल्याच्या बाबतीतही पवार हळवे झाल्याचे पाहायला मिळाले. पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी त्यांच्या या स्वभावाचा अनुभव समाजमाध्यमावर लिहीला आहे.
ही पण बातमी वाचा : अजितदादांची ती घोषणा भरणे खरी करणार का?

