शिक्षण विभागातील `रजनीकांत`ची अखेर बदली! कारकिर्द ठरली होती चमत्कार 

चित्रपटातील रजनीकांत अनेक चमत्कार करतो. पण एखादा प्राथमिक शिक्षक दुर्गम भागातील शिक्षणासाठी तब्बल आठ वर्षे पायपीट करत असेल तर तो देखील चमत्कारच मानावा लागेल. अशा रजनीकांत मेंढे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नवीन शिक्षक आला आहे. ही देखील आता न्यूज झाली आहे.
शिक्षण विभागातील `रजनीकांत`ची अखेर बदली! कारकिर्द ठरली होती चमत्कार 
rajnikant mendhe

पुणे : पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले चांदर हे दुर्गम गाव. जायला रस्ताही नाही.  या गावातील केवळ एका मुलासाठी होय फक्त एका मुलासाठी रजनीकांत मेंढे हे शिक्षक रोज बारा किलोमीटरचा प्रवास करून रोज शिकवायला जात. मेंढे यांच्यामुळे चांदर हे गाव कानकोपऱ्यात पोचले. रस्ता नसलेल्या गावात तब्बल आठ वर्षे मेंढे यांना शिकविले. आता या मेंढेसरांची बदली झाली असून त्यांनी पाणावल्या डोळ्यांनी या शाळेचा निरोप घेतला.

मेंढे यांची बदली आता खानापूर जवळील गोऱहे गावात झाली आहे. चांदरसाठी नवीन शिक्षक पुणे जिल्हा परिषदेने नेमला आहे. या गावाला जायला रस्ता नाही. तेथे दोन महिन्यांपूर्वी वीज देखील नव्हती. तरीही मेंढे हे ५० किलोमीटरचा प्रवास करत न चुकता या शाळेत शिकवायला जात होते. अनेकदा शाळेतच त्यांनी मुक्काम केलेला आहे. त्याच्या या परिश्रमाची दखल अनेक प्रसिद्धी माध्यमांनी घेतली. मेंढे यांच्या कष्टाची बातमी वाचल्यानंतर महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी या गावात वीज पोचविण्यासाठी लक्ष घातले आणि तेथे विजेचे खांब उभे राहून दिवेही दोन महिन्यांपूर्वी लागले.

पुणे जिल्ह्यातील पानशेत खोऱ्यात असलेल्या या भागात माणगावपर्यंत एसटी बसची सुविधा आहे. येथे एसटी सुरू होण्यापूर्वी कशेडीहून माणगावला बोटीतून जावे लागत होते. तेथून दीड ते दोन तास पायी चालत तेरा किलोमीटरवर असलेल्या चांदर या गावात पोचावे लागते.  मेंढे हे रोज ही कसरत करत होते. त्याचे नोकरीचे हे पहिलेच ठिकाण होते. या गावची एकूण लोकसंख्या २४३ असून ४५ घरे आहेत. 

शिक्षकांसाठीच्या सीईटीमध्ये ते राज्यात २०१० मध्ये प्रथम आले होते. प्रथम येऊनही त्यांना अशी दुर्गम शाळा मिळाली होती. तरी त्यांनी न कुरकुरता रूजू झाले. पहिले पाच वर्षे त्यांनी शाळेशेजारीच मुक्काम केला. लग्न झाल्यानंतर ते खानापूर या गावात राहायला आले होते. 

ते रूजू झाले तेव्हा शाळेत चौथीपर्यंतची दहा ते बारा मुले होती. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी काही मुले इतर गावांतील शाळांत गेली. सध्या या शाळेत युवराज सांगळे हा एकमेव तिसरीचा विद्यार्थी आहे. या गावची लोकसंख्या शंभरच्या आसपास आहे. गेली तीन वर्षे मेंढे सर त्याला शिकवत होते. नुकत्याच झालेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये त्यांना खानापूरपासून पाच ते सहा किलोमीटर असलेल्या गावात नेमणूक मिळाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी या शाळेचा फोटो आपल्या फेसबुक वाॅलवर शेअर केला. त्यामुळे या शाळेविषयी पुन्हा सोशल माध्यमांत चर्चा सुरू झाली. मेंढे यांच्या बदलीनंतर ही शाळा बंद होण्याची शक्यता होती. जिल्हा परिषदेने तेथील एका विद्यार्थ्यासाठी तात्पुरत्या शिक्षकाची व्यवस्था केली आहे. पुढील वर्षी आणखी दोन किंवा तीन मुले शाळेला मिळू शकतात. नवीन शिक्षक सोनवणे यांच्यासोबतचा युवराजचा फोटो सोशल माध्यमांत यामुळे झळकला.

मांढरे यांनी सांगितले की एका विद्यार्थिनीसाठी जपानमध्ये एक रेल्वे चालवली जात होती, अशा बातम्या सोशल मिडियात वाचल्या होत्या. पण पुणे जिल्ह्यातही एका विद्यार्थ्यासाठी शाळा चालवली जात आहे, हे यातून पुढे आले. त्यामुळे युवराजच्या शिक्षणात खंड पडणार नसल्याची काळजी जिल्हा परिषदेने घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in