क्रांतीसिंह नाना पाटील अन्‌ बबनराव ढाकणे हे परजिल्ह्यातील नेतेही बीडमधून लोकसभेत गेले!

बीड जिल्ह्यात दिवंगत केशरबाई क्षीरसागर आणि जयसिंगराव गायकवाड प्रत्येकी तीन वेळा खासदार राहिले आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील आणि जनता दलाचे बबनराव ढाकणे यांनीही येथून विजय मिळविला. परजिल्ह्यातील दोघे बीडमधून खासदार झाले आहेत.
Babanrao Dhakne-Kranti Singh Nana Patil
Babanrao Dhakne-Kranti Singh Nana Patil Sarkarnama

बीड : नव्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीसिंह नाना पाटील (Krantisinha Nana Patil) यांचे प्रतिसरकार माहीत आहे. तर, नव्या राजकीय इतिहासात बीड (Beed) जिल्हा काँग्रेसनंतर (congress) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपचा (BJP) गड असल्याचेही माहित आहे. मात्र, जिल्ह्यात समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मॅक्सीस्ट) यांनाही जिल्ह्यात मोठा जनाधार होता. विशेष म्हणजे कम्युनिस्ट पार्टीकडून सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असलेले स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी दिवंगत क्रांतीसिंह नाना पाटील यांनाही जिल्हावासियांनी लोकसभेवर (Loksabha) पाठविले होते. (KrantiSinha Nana Patil & Babanrao Dhakne were elected to Lok Sabha from Beed)

देशातील पहिली लोकसभा निवडणुक १९५२ मध्ये झाली. आतापर्यंत देशात १६ लोकसभेच्या निवडणुका झाल्या. मात्र, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्यात २०१४ मध्ये पोटनिवडणूक झाली. बीड जिल्ह्यातून आतापर्यंत लोकसभेवर १७ खासदार निवडून गेले आहेत. सुरुवातीच्या सहा लोकसभा निवडणुकांपैकी तीन निवडणुकांत समाजवादी पक्ष व कम्युनिस्ट पक्षाने लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत.

Babanrao Dhakne-Kranti Singh Nana Patil
अभिजित पाटलांचा कल्याणराव काळेंना दणका; ‘चंद्रभागा’चे आजी-माजी संचालक लागले गळाला!

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याची ज्वाला अंबाजोगाईतून दिवंगत स्वामी रामानंद तीर्थ यांनी पेटविली. त्यांच्या आंदोलनात अग्रणी असणारे दिवंगत रामचंद्र परांजपे पुढे समाजवादी लढ्याचे अग्रणी डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्या विचाराने प्रेरीत झाले. लोकसभेच्या १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने रामचंद्र परांजपे यांना मैदानात उतरविले आणि जिल्हावासियांनी त्यांना लोकसभेवर पाठविले. पुढच्या १९५७ आणि १९६२ मधील दोन निवडणुकांत सलग काँग्रेसने बाजी मारली. दिवंगत रामचंद्र पाटील व दिवंगत द्वारकादास मंत्री लोकसभेचे जिल्ह्याचे खासदार होते. त्यानंतरची निवडणुक पुन्हा रोमांचकारी झाली.

Babanrao Dhakne-Kranti Singh Nana Patil
तांदूळवाडीवरून दररोज मेसेज येतो ‘कुछ तो होनेवाला है’ : खडसेंचा रावेरमध्ये गौप्यस्फोट

काँग्रेसने जिल्ह्यात पाय रोवलेले असताना व त्यापूर्वीच्या दोन निवडणुका जिंकलेल्या असतानाही १९६७ मध्ये सातारा जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील यांना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची उमेदवारी देण्यात आली. नाना पाटलांनाही बीडच्या नागरिकांनी लोकसभेवर पाठविले. त्यानंतरची निवडणुकही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मॅक्सीस्ट) गंगाधरअप्पा बुरांडे यांनीच जिंकली. पुढे काँग्रेसच्या दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर लोकसभेवर विजयी झाली. त्यांनी १९८० व १९८४ अशा सलग दोन लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता.

Babanrao Dhakne-Kranti Singh Nana Patil
गणपतराव देशमुखांच्या नातवांनी बिनविरोधची परंपरा जपली; सांगोला सूतगिरणीसाठी आजी-माजी आमदारांचीही साथ

सन १९८९ मधील निवडणूक अत्यंत रोमंचकारी झाली. जनता दलातर्फे नगर जिल्ह्यातील असलेल्या बबनराव ढाकणे यांना केशरबाई क्षीरसागर यांच्या विरोधात उमेदवारी दिली. बबनराव ढाकणे विजयी झाले आणि त्यांच्या रुपाने केंद्रात जिल्ह्याला तब्बल ३७ वर्षांनी पहिल्यांदाच मंत्रीपदही मिळाले. नंतर पुन्हा काँग्रेसच्याच केशरबाई क्षीरसागर खासदार राहील्या. त्यानंतरच्या १९९६ मधील ११ व्या लोकसभा निवडणुकीत रजनी पाटील यांच्या रुपाने भाजपने पहिल्यांदा लोकसभेवर झेंडा फडकविला. नंतर जयसिंगराव गायकवाड दोन वेळा भाजपच्या उमेदवारीवर लोकसभेवर गेले. त्यांनाही केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली. पुढच्या २००४ मधील १४ व्या लोकसभा निवडणुकीत जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुक लढले आणि जिंकलेही. आतापर्यंतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ वर्षांच्या राजकीय वाटचालीत राष्ट्रवादीने एकदाच लोकसभा निवडणुक जिंकली आहे.

पुढे भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी २००९ मध्ये प्रथमच लोकसभा निवडणुक लढवून विजय मिळविला. पुढच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला. त्यांनाही केंद्रात मंत्रीपद मिळाले. मात्र, त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे लोकसभेवर विजयी झाल्या. सध्याही त्या दुसऱ्यांदा खासदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in