नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे माजी बौद्धिक प्रमुख व प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचे (वय 97) आज दुपारी ३.३० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. संघाच्या सर्वच सरसंघचालकांसोबत त्यांनी कार्य केले होते. पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला. हिंदुत्त्वाचे भाष्यकार म्हणून त्यांची ख्याती होती.
गेल्या वर्षभरापासून मा. गो. वैद्य प्रकृतीमुळे घरीच होते. आज दुपारी साडेतीन वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. संघात त्यांच्या शब्दाला मान होता. त्याचप्रमाणे सामाजिक व पत्रकारितेतही त्यांनी आपली छाप सोडली होती. उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणाऱ्या मा. गो. वैद्य यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. आणीबाणीचा काळ व त्या वेळच्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग हा मा. गो. वैद्य यांच्या संपादकीय कारकिर्दीतल्या कायम आठवणीत असणारा काळ होता.
आणीबाणीत सेन्सॉरशिप लागू झाल्यावर ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ हा त्यांचा अग्रलेख डाक आवृत्तीत छापला गेला, परंतु शहर आवृत्तीत सेन्सॉर अधिकाऱ्याने छापू दिला नाही म्हणून अग्रलेखाची तेवढी जागा निषेध म्हणून त्यांनी मोकळी सोडली. मा. गो. वैद्य हे ‘नीरद’ या टोपण नावाने लेखन करीत होते. १९७८ साली ते विधानपरिषदेचे सदस्यही होते. संघाचे सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली, पाच मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.
Shri M. G. Vaidya, my father breathed his last today at 3.35pm at Nagpur after completing 97 years of active, meaningful and inspiring life. He was a veteran journalist, a Hndutva "Bhashyakar" and active Sangh (RSS) Swayamsevak for 9 decades. pic.twitter.com/Gp6QPMsabW
— Dr. Manmohan Vaidya (@ManmohanVaidya) December 19, 2020
नितीन गडकरी गडकरी यांची श्रद्धांजली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांचे आज दुपारी निधन झाले. यानिमित्त राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना विनम्र श्रध्दांजली अर्पण केली.
पूज्य श्री गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे व त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझा लहानपणापासून बाबुरावजींशी व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले आहेत. खरे तर बाबुराव शतायुषी होतील, हा ठाम विश्वास मला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले, याची अतीव दु:ख आहे, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

