मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी पुरात स्वतः जीप चालवली; संजय देरकरांनी दिला आठवणींना उजाळा.. - when pawar was chief minister drown jeep himself in flood memories told derkar | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी पुरात स्वतः जीप चालवली; संजय देरकरांनी दिला आठवणींना उजाळा..

अतुल मेहेरे
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

पवार साहेबांच्या स्मरणशक्तीची लोकं दाद का देतात, हे तेव्हा समजले. येथे आल्यावर त्यांना आठवले की सभागृहासाठी निधी देण्याबाबत आपण बोललो होतो. तेव्हा वणीत एकही सभागृह नव्हते. कार्यक्रम आटोपल्यावर जाता-जाता हेलिपॅडवर त्यांनी मला हाक मारली आणि १० लाख रुपयांचा धनादेश माझ्या हातात दिला.

नागपूर : सन १९९१-९२ चा काळ. यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये महापूर आला होता. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते शरद पवार. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी ते वणीत आले. सर्वप्रथम विश्रामगृहावर ते थोडा वेळ थांबले आणि उकणी या गावी जाण्यासाठी निघाले. पण सर्व रस्ते पाण्याखाली असल्यामुळे गाडी काढायला ड्रायव्हरचीही हिंमत होईना.. आणि पवारांनी स्वतः बोलेरोचे स्टेअरींग हाती घेतले. ही आठवण ‘सरकारनामा’ला सांगितली तत्कालीन नगराध्यक्ष संजय देरकर यांनी. ही आठवण वणीकरांच्या मनात आजही कायम आहे. 

संजय देरकर म्हणाले, त्यांना असलेली सुरक्षा व्यवस्था देखील त्यांनी तेव्हा नाकारली आणि स्वतः गाडी चालवत ते निघाले. ‘वन हॅन्डेड’ ड्राईव्ह करत ते मार्गाने लोकांचे अभिवादन स्वीकारत होते. या दौऱ्यात त्यांनी २५ ते ३० किलोमीटर जीप चालवली. जीपमध्ये बसलेल्या संबंधितांना ते विविध सूचना देत होते. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस केली, त्यांचे सांत्वन केले आणि मदत देण्याची व्यवस्था केली. इतर सामान्य नागरिकांशीही त्यांनी पूरस्थितीबाबत चर्चा केली. आपल्या राज्याचा मुख्यमंत्री भर पुरात स्वतः जीप चालवत आपल्या तालुक्यात फिरतो आहे, हे बघून लोकांना कुतूहल आणि कौतुक वाटले. 

मुख्यमंत्री निधीतून दिले 10 लाख
पुढे संजय देरकर सांगतात, त्यांचा वणीचा दौरा संपता संपता त्यांनी सभागृहासाठी निधी देण्याची गोष्ट बोलून दाखवली होती. यानंतर ते १९९४ मध्ये राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी वणीला आले होते. पवार साहेबांच्या स्मरणशक्तीची लोकं दाद का देतात, हे तेव्हा समजले. येथे आल्यावर त्यांना आठवले की सभागृहासाठी निधी देण्याबाबत आपण बोललो होतो. तेव्हा वणीत एकही सभागृह नव्हते. कार्यक्रम आटोपल्यावर जाता-जाता हेलिपॅडवर त्यांनी मला हाक मारली आणि १० लाख रुपयांचा धनादेश माझ्या हातात दिला. त्यानंतर सभागृहाचे काम सुरू झाले आणि वणीकरांच्या सेवेत ते सभागृह आजही आहे. 

आठवणीचा पक्का, दिलेल्या शब्दाला जागणारा दानशूर नेता म्हणून कायमस्वरूपी त्यांचे नाव वणीकरांच्या मनात कोरले गेले. ‘असाच पाहिजे मुख्यमंत्री’, अशी वाक्‍ये लोकांच्या तोंडून निघत होती. आजपासून जवळपास 25 वर्षांपूर्वीचे पवारांचे ते रूप लोकांनी डोळ्यांत साठवले होते. दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांची "लीड अर्थातच शरद पवार होते. तेव्हा शरद पवार नागपूरहून कारने वणीला आले होते. कारण त्यांना मार्गातील शेतींचीही पाहणी करायची होती. पुराने झालेल्या नुकसानाचा अंदाज घ्यायचा होता. वणी हे वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले गाव. या दोन्ही नद्यांनी तेव्हा उच्छाद मांडला होता. वणी उपविभागातील वणी, मारेगाव आणि झरीजामणी हे तिन्ही तालुके पुराच्या पाण्याखाली आले होते.

शरद पवार... आज नुसते नाव जरी घेतले तरी मनामनांमध्ये उत्साह संचारतो. आजपर्यंत आणि त्यातल्या त्यात गेल्या वर्षभरात राजकारणात ज्या घडामोडी झाल्या आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावरून जे पवार साहेबांना मानत नव्हते, असे लोकही शरद पवारांचे गुणगान गाताना दिसतात. पवार काय आहेत, हे भल्याभल्यांना कळून चुकले आहे. 

‘कसं काय बळीभाऊ, काय म्हणता...’
शरद पवारांच्या स्मरणशक्तीचे, कार्यकर्त्यांबद्दल असलेल्या आत्मीयतेचे दाखले आजही दिले जातात. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना देखील ते नावानिशी ओळखतात, नव्हे तर नावाने हाकही मारतात. असाच एक 1994 चा किस्सा वणीकरांच्या आजही स्मरणात आहे. राळेगावचे तत्कालीन आमदार नेताजी राजगडकर यांनी वणीमध्ये राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव घेतला होता. उद्‌घाटक तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यांच्यासह सर्व जण मंचावर बसले असताना तेथे बळीभाऊ सातपुते आले. बळीबाऊ एक सामान्य कार्यकर्ता होता. पवारांनी त्यांना लगेच ओळखले आणि नावाने आवाज देऊन मंचावर बोलावले. "कसं  काय बळीभाऊ, काय म्हणता...' असे म्हणत आस्थेने त्यांची चौकशी केली. हा प्रसंग पाहून बळीभाऊंसह उपस्थित सर्व भारावून गेले होते, असे वणीकर आजही सांगतात.

दादासाहेब हूड आणि शेवाळकरांशी घनिष्ठ संबंध
सत्तेत न राहताही राजकीय मंडळींमध्ये दबदबा असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दादासाहेब हूड. शरद पवार वणीला आले की दोघा जणांना ते आवर्जून भेटत. एक म्हणजे दादासाहेब आणि दुसरे म्हणजे साहित्यिक राम शेवाळकर. या दोघांशीही पवारांची घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्या मैत्रीच्या आठवणी आजही जुनेजाणते सांगतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख