अवघे ऐंशीचे वयोमान अन् राजकीय थैमान ! - only eighty years old and having huge power in politics | Politics Marathi News - Sarkarnama

अवघे ऐंशीचे वयोमान अन् राजकीय थैमान !

श्रीकांत शिवणकर 
शनिवार, 12 डिसेंबर 2020

कोरोनाचा काळ, ताट, थाळी पिटणाऱ्यांपासून तर मास्क, सॅनिटायजर विकणाऱ्यांसाठी सुखावह असला तरी अतिवृष्टीत बांधांवर आणि छोट्या किरकोळ धंद्यांवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या जीवनावर सदैव लक्ष वेधून घेण्याचा ध्यास पवार साहेबांचा आहे. कृषी मंत्री असताना कुण्याही आंदोलकांचा आक्रोश होऊ दिला नाही.

नागपूर : तरुणालाही लाजवेल अशी ऊर्जा अंगी धारण करुन महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात ज्यांचा दबदबा आहे… जगभरात त्यांची किर्ती पोचली आहे. आजच्या युगाचे राजनायक, असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. शरद पवार… हे नाव जरी कानी पडले तरी मनामनांत एक उत्साह संचारतो. जाणता राजा आहे, हे जाणकार म्हणतीलच ! पण जाणीवपूर्वक काहीतरी अद्भूत करण्याची रुबाबी कसरत करणारे, इलेक्ट्रिक ‘पॉवर’पेक्षा मोठा शॉक देणारा पॉवर म्हणजेच शरद पवार ! 

लोकनेता, जाणता राजा, साहेब, राजनीतिज्ञ आणि अखंडपणाने पुस्तकाच्या प्रत्येक पानाचा बुद्धीच्या कसोटीतून विवेकाच्या दृष्टीने धोरणाला आकार देणारे शरद गोविंदराव पवार. आठ दशकांनंतरही भर पावसात राज्यभरातल्या तरुणांच्या काळजाला लाजवून जेव्हा ऊभे झाले. तेव्हा नभातूनसुद्धा पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा अभिषेक पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वासाठी आसुसला होता. अशा वर्णनाने प्रत्येक कार्यकर्ता ओथंबून जावा, येवढा विश्‍वास देणारे ऐंशीच्या वयोमानातील वृद्धत्वाचं शरीर धारण करुन उभे झालेले तरुण. एका षडयंत्री पक्षाच्या विरोधात उभे राहतात. तेव्हा माहिती होते पवारांची पॉवर आणि उभे होतात सर्वांचे हात, सन्मानाने मुजरा आणि सलाम करण्यासाठी...

साहेबांमध्ये गुणाचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार करण्याचं सामर्थ्य आहे. वर्तमानकाळाचा पूर्ण अंदाज घेऊन भविष्याचे वेध उद्घोषीत करण्याचा विश्‍वास असणारा जाणता पुरुष म्हणून पवारांचा परिचय सर्वदूर आहे. तारुण्याचा स्वभाव, उत्साह, हिंमत, स्वप्नांची रचना आणि वास्तवाला टिकून ठेवण्याच्या सामर्थ्याप्रमाणे असतो. क्षमतांची ओळख, त्या क्षमतेनुसार संधी उपलब्ध करून देण्याचं पालकत्व ज्यांच्या अंगी असते, ते शासन व्यवस्था निर्माण करतात. याची प्रचिती आर. आर. पाटलांपासून तर अनेक तळागाळातील नेत्यांना आलेली आहे. 

धाडस हे क्षमतेनुसार जरी येत असलं तरी ते धाडस करण्यासाठीची चालना, प्रेरणा देणारा मार्गदर्शक किंवा गुरू असल्याशिवाय कुणावरच किमया होत नाही याचा अनुभव आजही बारामतीच्या वलयाशिवाय सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशिवाय विरोधी, मित्र किंवा समर्थक नेते सुद्धा उगाच बोलत नाहीत. पुस्तकांचा व्यासंगी आणि प्रसंगी युक्ती, निर्णय आणि बचाव करणारे मार्गदर्शन उगाच देत नाही. मग तो विषय कुठलाही असो. त्याचा लाभ अनेक पिढ्यांना, त्यांच्या समाजकुळासोबत मानवी जमातीसाठी लाभदायक होईल, अशा धोरणांची चुणूक सुचवून विरोधकांना चुकवण्याचा चाणक्यपणा ठेवणारा ऐंशीचा एक वृद्धत्व पांघरून  तारुण्याची उब देणारा स्वयंभूत पॉवर म्हणजेच शरद पवार. 

राजकारण म्हणजे विशेष करणे. ही व्याख्या ज्यांनी समजून घेतली असेल, त्यांनी राजकारणात सहभाग घेऊन जनतेच्या जीवनातील समस्या सोडवण्याचे कार्य करावे. हीच राजकीय नेत्याची कर्तबगारी दाखवण्याची संधी देणारा राजनायक म्हणजे शरद पवार. कुणापासूनही लपवू शकत नाही. येवढा विश्‍वास देणारा अष्टदशकी व्यक्ती जाणत्या पिढीसाठी साक्षात कर्तव्यावर असताना दिसतो. त्या अप्रूप शक्तीला, ऊर्जेला उत्सर्जित करणारा पॉवर साहेबांशिवाय दुसरा असूच शकत नाही. 

दुष्काळ हा निसर्गाचा लपंडाव किंवा महापूर अथवा इतरही नैसर्गिक घडामोडीचा परिणाम महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेबांच्या राजवटीत अनुभवायला आला असेल, त्यावेळी सर्व शासकीय आस्थापनांपासूनचे व्यवस्थापन तर सर्वच कर्मचारी, अधिकारी, पुढारी, नेते, कार्यकर्ते आपापल्या क्षमतेनुसार ऊर्जित करून सर्वांकडून विश्‍वास अर्जीत करणारा लोकनेता फक्त साहेबच असू शकतात. येवढा सर्व परिणाम आजची पिढी शरदचंद्र पवार यांच्या वास्तविक जीवनातून अनुभवताना दिसतो. आपलं मत व्यक्त करण्याची संधी प्रत्येक तरुण घेण्यासाठी आतुरलेला आहे. कारण नव्या पिढीने राजकारणात प्रत्यक्ष येताना साहेबांचा हस्तस्पर्श, निवडलेल्या ध्येयावर शेरा आणि नुसतं एखादं वाक्य समजून घेण्यासाठी तयार असल्याचा परिचय २०१९ च्या निवडणुकीत करून घेतला. 

बुडते हे जननी देखते डोळा... अशी तुकोबा वृत्ती संवेदनशील हृदयात संचारते, हे खरे जरी असले तरी बुडते हे सरकार, न पेलते पक्ष फार, अशा स्थितीची बांधणी अपंगाला आधार देणाऱ्याची प्रसंगावधानता बाळगण्याची दृष्टी सबळाला दुर्बल बनवण्याची माधव वृत्ती फक्त पवारांच्याच मेंदूत पिकते. असा आरोप प्रत्यारोपाचा वर्षाव सहज ‘अभी तो मै जवान हूं’, अशा विनोदी शैलीत डोक्यावरून हात फिरवणारे, राज किमयागार म्हणजे शरद पवारच आहेत, हे अशा वैदर्भीय शैलीतील उत्तरसुद्धा नागपुरातील लोकांनी उद्गारले. अशी समाजमाध्यमांची किमया सर्वांना तोंडात बोटे टाकणारी आहे. 

कोरोनाचा काळ, ताट, थाळी पिटणाऱ्यांपासून तर मास्क, सॅनिटायजर विकणाऱ्यांसाठी सुखावह असला तरी अतिवृष्टीत बांधांवर आणि छोट्या किरकोळ धंद्यांवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या जीवनावर सदैव लक्ष वेधून घेण्याचा ध्यास पवार साहेबांचा आहे. कृषी मंत्री असताना कुण्याही आंदोलकांचा आक्रोश होऊ दिला नाही. परंतु आज दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आग पेटताना पवार साहेबांशिवाय कुणीच फुंकर घालू शकत नाही. याची वाट पाहणारे आजही ८०च्या वयोमानातील शरदचंद्रांच्या पॉवरची अपेक्षाच करीत असल्याचं आश्‍चर्यही वाटतं. कारण शरदचंद्र पवार हेच भारतीय राजकारणाच्या क्षेत्राशी आणि पिढी दर पिढीपर्यंत राजकारण पोहोचवण्याची हमी देणारे ‘राजनायक’ अवघे ऐंशी वयोमान, अन् राजकारणात घालते थैमान...! 
(प्रवक्ता राष्ट्रवादी काॅंग्रेस, बी . ई  (यांत्रिकी) , मास्टर ऑफ व्हॅल्यूएशन)
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख