सर्व महाडिकांना सत्तेच्या सर्व पदांवरून घालवले तेव्हाच सतेज पाटील शांत झाले.... - satej patil defeats Mahadik family in all elections since 2016 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

सर्व महाडिकांना सत्तेच्या सर्व पदांवरून घालवले तेव्हाच सतेज पाटील शांत झाले....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून 2004 ची लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यामागे आपली ताकद उभी केली. त्यावेळी त्यांचा प्रचारही केला. दोनतरुण तडफदार नेते जिल्ह्याच्या विकासाचे शिलेदार ठरतील, अशी भाकितेही वर्तवण्यात आली.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण गेल्या 15 वर्षांत दोन गटांभोवती फिरत आहे. पहिला गट आहे तो महादेवराव महाडिक यांचा आणि दुसरा सतेज पाटील यांचा. या दोन गटांत गेल्या सहा वर्षांत इतक्या लढाया झाल्या आणि त्यात दोघांनीही एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. त्यात गेल्या काही वर्षांत म्हणजे 2015 पासून सतेज पाटलांना यश मिळते आहे. महाडिक यांच्याकडे असलेली गोकुळ म्हणजे जिल्हा दूध संघाची सत्ता आज खेचून घेतली. महाडिकांच्या कुटुंबाकडे सत्तेचे एकही पद सतेज पाटलांनी ठेवले नाही. (Satej Patil defeats Mahadik family in all elections since 2016)

गोकुळच्या आज झालेल्य निवडणुकीत पाटील यांच्या पॅनेलला 17 आणि महाडिकांना केवळ चार जागा मिळाल्या. दारुण पराभव महाडिक यांना स्वीकारावा लागला. खुद्द महादेवराव महाडिक हे विधान परिषदेला, धनंजय महाडिक लोकसभेला आणि अमल महाडिक हे विधानसभेला  पराभूत झाले. कोल्हापूर महापालिकेतील महाडिक गटाची सत्ता घालवली. सतेज पाटील यांनीच हे चारीही पराभव घडवून आणत आज पाचवा धक्का दिला. सतेज पाटलांनाही असेच अनेक धक्के सहन केले. पण आता ते सर्वच अर्थाने महाडिकांना भारी ठरले आहेत. 

एकमेकांना पाण्यात पाहणारे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक हे एकेकाळी जवळचे मित्र होते, हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. पाटील विरुद्ध महाडिक हा संघर्ष उभ्या कोल्हापूर जिल्ह्यात खदखदतो आहे. राजकारण कसे बदलते, जवळच्या व्यक्ती लांब जातात आणि दूरच्या व्यक्ती कशा मांडिवर येऊन बसतात हे कळतही. निवडणूक म्हटली की कोल्हापूरकरांचा नाद नाही करायचा. त्यात महाडिक आणि पाटील यांच्यातील लढत म्हणजे दोन मातब्बर हत्तींच्या टकरा. या राजकीय स्पर्धेचा इतिहासही रंजक आहे.

पाटील-महाडिक पहिल्यांदा एकत्र 
2004 ला सतेज पाटील यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघाची निवड केली. त्यांनी माजी आरोग्यमंत्री (कै.) दिग्विजय खानविलकर यांच्याविरुद्ध दंड थोपटले. त्यांचे कच्चे दुवे शोधून त्यानुसार त्यांनी आपली मोट बांधण्यास सुरवात केली. खानविलकर यांचे त्यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक हे राजकीय विरोधक होते. त्यामुळे सतेज पाटील आणि महाडिक एकत्र आले. त्यांनी जोरात तयारी केली. त्यावेळी राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी राखीव ठेवण्यात आला. सतेज पाटील यांनी अपक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांनी मतदारसंघात राळ उठवली. सतेज पाटील, धनंजय महाडिक यांच्या प्रचाराच्या तोफाही धडाडू लागल्या. खानविलकरांविरुद्ध असलेला नाराजीचा फायदा आणि पाटील-महाडिक यांनी बांधलेली मोट यशस्वी झाली. सतेज पाटील आमदार म्हणून पहिल्यांदा विजयी झाले. सतेज पाटील व महाडिक यांच्या राजकीय मैत्रीची चर्चा चांगलीच सुरू झाली. एकमेकांच्या युवा मंचच्या उद्‌घाटनाला दोघे जाणे आणि विकासावर भाषण करणे असे सुरू झाले. याचवेळी धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून 2004 ची लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यामागे आपली ताकद उभी केली. त्यावेळी त्यांचा प्रचारही केला. दोनतरुण तडफदार नेते जिल्ह्याच्या विकासाचे शिलेदार ठरतील, अशी भाकितेही वर्तवण्यात आली. 

आणि तीन वर्षांत ठिणगी पडली... 
सतेज पाटील व महाडिक हे 2004 नंतर 2007 पर्यंत एकत्रित सगळीकडे राजकारणात राहिले. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, गोकुळ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक अशा सर्व ठिकाणी एकत्रित राहिले. जिल्ह्याच्या राजकारणाच्या नाड्या यामुळे हातात होत्या. या सगळ्या सत्ता केंद्रांमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांचाच शब्द अंतिम असायचा. त्यामुळे ते सांगतील त्यांना पदे दिली जात होती. त्याशिवाय महाडिक यांची कारभारी असणारी नेते मंडळीही व्यवस्थित आपल्याला हव्या त्या माणसाला पदांची माळ गळ्यात पडण्यासाठीही फिल्डींग लावत होती. ही खदखद सतेज पाटील यांच्या मनात सुरू होती. गोकुळच्या निवडणुकीत असो किंवा महापालिकेतील ताराराणी आघाडीतून पदांचे वाटप असो, यामध्ये सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना पदे दिलीच जात नसल्याने त्यांनी याविरुद्ध आवाज उठवला. जाहीरपणे त्यांनी यावेळी महाडिक यांना याबाबत सांगितले. कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा झालो. जिथे सत्ता तिथे कार्यकर्त्यांना पद नाही. कार्यकर्तेही आता पदांसाठी विचारू लागले आहेत. पदरमोड करून लढायचे, विरोधकांना अंगावर घ्यायचे, वैरत्व स्वीकारायचे आणि पदे मात्र नाहीत असे बोलू लागले. एकूणच सगळे राजकारणातील चित्र पाहिल्यावर सतेज पाटील यांनी आता राजकारण करायचे तर स्वतंत्रपणे पुढे जाण्याची तयारी सुरू करायची, असे ठरवले आणि त्यातून ठिणगी पडण्यास सुरवात झाली. त्यातच महापालिकेत त्यावेळी रस्ते विकास प्रकल्प आणण्यात आला. या रस्ते विकास प्रकल्पातूनही पाटील व महाडिक यांच्यात ठिणगी पडली. तेव्हापासून सतेज पाटील यांनी आपले स्वतःचे अस्तित्व तयार करण्यास सुरवात केली. 

जवळचे मित्र एकमेकांच्या विरोधात
2009 ला माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खासदारकीची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती; परंतु जिल्ह्यात एकूणच महाडिकांच्या विरुद्ध वातावरण तयार होऊ लागले होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा उमेदवारीचा पत्ता कट करण्यात आला आणि खासदार संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यात आली. धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील अनेक नेते मंडळींनी फिल्डींग लावली होती. त्यामध्ये सतेज पाटीलदेखील असल्याचा संशय महाडिक गटाला आला. यावरून महाडिक व सतेज पाटील यांच्यात संघर्ष सुरू झाला. एक कोणत्याही जाहीर कार्यक्रमात जरी एकाच व्यासपीठावर आले तरी दोघांच्या नजराही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असल्याचे चित्र नागरिकांनी पाहिले. तिकीट न मिळाल्याने झालेला वार वर्मी लागल्याने महादेवराव महाडिक यांनी 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना उतरवण्याचे ठरविले. सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्यामध्ये सर्वाधिक राजकीय हाडवैर होते; परंतु धनंजय महाडिकही आपल्या काकांबरोबर त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि अखेर एकमेकांचे मित्र असलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे दोघे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले.

गुरू-शिष्य संघर्ष जोमात
सतेज पाटील यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर कॉंग्रेसचे तिकीट मिळवले. कॉंग्रेसच्या चिन्हावर ते रिंगणात उतरले, तर धनंजय महाडिक हे पतंग चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. दोघांच्यामध्ये कॉंटे की टक्कर अशीच लढत झाली; पण अखेरीस सतेज पाटील यांनी बाजी मारत विजयश्री खेचून आणली. 

पाटील यांचा दुसरा हादरा
पालिकेतील सत्तेवर महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीची सत्ता होती. त्यामुळे या सत्तेलाही सुरुंग लावण्यासाठी सतेज पाटील यांनी कंबर कसली. ताराराणी आघाडी आणि महाडिक यांचा काहीही संबंध नाही असे सांगत तब्बल 20 हून अधिक नगरसेवकांना त्यांनी आपल्या गटाकडे घेतले. यातून विधान परिषदेच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांनी कॉंग्रेसने उमेदवारी देऊ नये म्हणून थेट जाहीर विरोध करून संघर्ष सुरू केला. गुरु-शिष्य असा संघर्ष त्यावेळी सुरू झाला. महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध त्यांनी विरोधकांची मोटही बांधली; परंतु अखेरीस महादेवराव महाडिक यांना उमेदवारी मिळाली आणि ते कॉंग्रेसतर्फे विजयीही झाले. त्या ठिकाणी महाडिकांनी सतेज पाटील यांच्यावर सरशी केली. राजकारणात आज होईल तसे उद्या होईल, अशी खात्री देता येत नाही, त्याप्रमाणे सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत गेला.

अमल महाडिकांना रोखले...
महाडिकांची सत्ता असलेल्या गोकुळ, कोल्हापूर जिल्हा बॅंक, महापालिका आणि जिल्हा परिषद अशा सर्वच ठिकाणी विरोध करण्यास सुरवात झाली. यातून महाडिक आणि पाटील गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रकार घडले. काही वेळा दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरुद्ध पोलिसांत दाद मागण्यापर्यंतच्या तक्रारी झाल्या. याच कालावधीत सतेज पाटील गृहराज्यमंत्री बनले आणि महाडिकांविरुद्ध अधिक तीव्र विरोध करण्यास सुरवात केली. ज्या ठिकाणी महाडिक त्या ठिकाणी पाटील यांचा विरोध; पण दुसरीकडे महाडिकांनीही पाटील यांच्याविरुद्ध जोरात टीका सुरू केली. त्यांच्याकडून होणाऱ्या काही गोष्टींचे जाहीर सभेत वाभाडे काढून बोलण्यास सुरवात केली. दोघांच्यातील राजकीय शत्रुत्व अधिकच धारधार होत चालले होते. यातून महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक जिल्हा परिषदेचे सदस्य असताना ते अध्यक्ष होणार होते. ही गोष्ट त्यांना समजल्यानंतर त्यांनी अमल महाडिक यांच्या अध्यक्षपदाला विरोध करत त्यांना अध्यक्ष होण्यापासून रोखले. यावरून महाडिक व पाटील गटांतील विरोधाने टोकच गाठल्याचे दिसत होते. प्रत्येक वेळी सतेज पाटील थेट महाडिकांना रोखण्यासाठी डाव टाकायचे आणि जिंकत होते; परंतु 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महाडिकांनी गुरूचा डाव टाकला.

मग महाडिकांनी चाल खेळली... 
2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरुद्ध महादेवराव महाडिक यांनी थेट आपला पुत्र अमल महाडिक यांना उतरवले. या विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. कॉंग्रेसशी युती होती. त्यामुळे साहजिकच सतेज पाटील बरोबर येणार काय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि धनंजय महाडिक यांना सतेज पाटील यांच्या बंगल्यावर घेऊन गेले. त्यावेळी त्यांच्यामध्ये समझोता झाला. 2004 साली जी जोडी एकत्र होती, ती दहा वर्षांनी म्हणजे 2014 ला एकत्र आली. सतेज पाटील यांनी यावेळीही कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे सांगत कार्यकर्त्यांशी संवाद साधून धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी सहभाग घेतला. या सगळ्यांपासून महादेवराव महाडिक यांना मात्र दूर ठेवण्यात आले होते. धनंजय महाडिक यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. त्यानंतर महाडिक व पाटील गट एकत्र आल्याचे चित्र तयार झाले; परंतु महादेवराव महाडिक यांनी आपल्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध समझोता केला नसल्याने त्यांनी थेट अमल महाडिक यांनाच विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपच्यावतीने मैदानात उतरवून सगळ्यांना धक्का दिला. त्यावेळी धनंजय महाडिक यांनी थेट अलिप्तपणाची भूमिका जाहीर केली; पण त्यांची यंत्रणा जे काय करायची ते काम करत होती. अखेर विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत सतेज पाटील यांना पराभव पत्करावा लागला आणि अमल विजयी झाले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यापासून रोखण्याचा वचपा विधानसभेतल्या निवडणुकीत महाडिकांनी काढून आपला हिशेब चुकता करून दाखविले.

सारी पदे महाडिकांकडे
विधानसभेला 2014 मध्ये सतेज पाटील पराभूत झाल्याने त्यांच्यामधील राजकीय शत्रुत्वाचा वणवा अधिकच जोरात पेटला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही महाडिक यांनी आपली सून शौमिका यांना उतरवले. त्या विजयी झाल्यावर त्यांच्या गळ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ घातली. त्यामुळे महाडिक यांनी आपल्या घराण्यातीलच व्यक्तीला अध्यक्ष करून सतेज पाटील यांना पुन्हा इशारा दिला. महाडिक गटाची ताकद त्यांनी दाखवून दिली. एकाच वेळी जिल्ह्यात खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष शौमिका महाडिक अशी स्थिती होती. 

महाडिकांना पालिकेत रोखले..
2015 च्या महापालिकेच्या निवडणुकीत महाडिकांना रोखण्यासाठी सतेज पाटील यांनी कंबर कसली. राज्यात भाजपची सत्ता असताना कोल्हापूर महापालिकेवर मात्र सतेज पाटील यांनी कॉंग्रेसचा झेंडा फडकवला. पहिल्यांदा पक्षीय पातळीवर निवडणूक लढवली व यामुळे चालणारा घोडेबाजारही रोखला. महाडिकांच्या सोयीच्या राजकाराणाला यामुळे ब्रेक लागला; मात्र विधानसभेच्या निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी नियोजन केले आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत थेट स्वतःच महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध रिंगणात उतरले. यावेळीही कॉंग्रेसने महाडिकांना तिकीट देऊ केले  होते; परंतु ऐनवळी सतेज पाटील यांनी महाडिकांचा पत्ता कट केला. त्यांना उमेदवारीपासून रोखल्यानंतर या निवडणुकीत टोकाचा संघर्ष जिल्ह्याच्या जनतेने पाहिला आणि अखेर या संघर्षात सतेज पाटील यांनी बाजी मारून महादेवराव महाडिक यांना पराभूत केले. आपल्या पराभवाचा पैरा फेडला.

तीनही महाडिक पराभूत
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला विरोध करण्यापासून त्यांच्याविरुद्ध कै. खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक यांच्या पाठीमागे पाटील यांनी आपली ताकद उभी केली. मंडलिक शिवसेनेतर्फे रिंगणात असले तरी पाटील यांनी आपली सगळी प्रचारयंत्रणेसकट सारी काही ताकद उभी केली. "आमचं ठरलंय' ही टॅग लाईन वापरून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेलाही हात घातला आणि महाडिकांविरुद्ध एक मोठे वातावरण करण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी आपला पुतण्या ऋतुराज पाटील यांना अमल महाडिक यांच्याविरुद्ध रिंगणात उतरवले. थेट न उतरता पुतण्याला रिंगणात उतरवण्याचे मुख्य कारण पडद्यामागे गनिमी काव्याने डाव आखणे. कारण लोकसभेच्या मंडलिकांना ताकद देण्यात युतीची सारी यंत्रणा कळून चुकली होती. याचा फायदा व महाडिकांविरुद्ध वातावरण तयार करण्यात त्यांना यश आल्याने तिथे त्यांनी अमल महाडिक यांचा पराभव केला. म्हणजे महादेवराव यांचा विधान परिषदेत पराभव, लोकसभा निवडणुकीत धनंजय यांना धक्का आणि विधानसभा निवडणुकीत अमल यांना अस्मान दाखवणे असे सलग तीन पराभव सतेज यांनी घडवून आणले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच पक्षापेक्षा गटाच्या राजकारणालाच अधिक महत्त्व आहे. पूर्वीपासूनच गटा-तटाच्या राजकारणाभोवती येथील राजकारण फिरत राहिले. सहकार, गट-तट आणि त्यातून राजकारण असे सर्वसाधारण सूत्र राहिले. पूर्वीपासून पाहिले तर रत्नाप्पाअण्णा कुंभार-आवाडे, माने-आवाडे, मंडलिक-यड्रावकर, आवाडे- आवळे, मंडलिक- मुश्रीफ, कोरे-पाटील अशांमध्ये गटांमध्ये चालणारे राजकारण जिल्ह्याने पाहिले आहे. काळानुसार यामध्ये नंतर बदल होत गेले. सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील आणि महाडिक हे दोन गट कट्टर राजकीय शत्रुत्व असलेले आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख