दोन मंत्री असतानाही कोल्हापूरातील तिसरा मंत्री म्हणून पवार साहेबांनी संधी दिली... - Despite having two ministers, Pawar Saheb gave him a chance as the third minister in Kolhapur . | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

दोन मंत्री असतानाही कोल्हापूरातील तिसरा मंत्री म्हणून पवार साहेबांनी संधी दिली...

सुनील पाटील
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

आमचे नेते आमचे दैवत व देशाचे नेते शरद पवार यांचा शनिवार 12 डिसेंबर 2020 रोजी 80 वा वाढदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो व चांगलं आरोग्य लाभो हीच परमेश्वरचरणी अंतःकरणपूर्वक प्रार्थना आहे. यानिमित्त त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना आपला ऊर भरून येतो. - हसन मुश्रीफ

साल 2009. विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरु होते. राज्यात आणि देशात गणेशोत्सव साजरा केला जात होता. याच गणेशोत्सवाच्या काळात मिरजमध्ये प्रचंड जातीय दंगल उसळी. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अनेक दिग्गज मंडळी पराभूत झाले. मात्र, या निवडणुकीत मी मात्र 46 हजार 412 मतांनी विजयी झालो. त्यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची बहुमत होऊन सत्ता आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आमचै दैवत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया होती. ती म्हणजे, राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली. याचा आनंद होत आहे. परंतु एवढ्या मोठ्या जातीय दंगलीच्या आगडोंब झाला असतानाही माझा हसन मुश्रीफ हा कार्यकर्ता एवढ्या प्रचंड मतांनी निवडून आला. त्याचा आयुष्यात फार मोठा आनंद मला झाला आहे.`` त्यामुळे एखाद्या सामान्य कार्यकर्त्या बद्दल किती नेत्याची किती तळमळ असू शकते, याचीच ती प्रचिती आली असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

माध्यमिक शिक्षण घेत असतानाच शहर पवार यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाकडे चाहता झालो. श्री पवार 1979 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून श्री पवार यांचा लौकिक होता. ज्या तडफेने, हजरजबाबीपणा आणि कौशल्याने त्यांनी विधानसभेत कौशल्य दाखविले. त्यामुळे तर मी त्यांच्या प्रेमातच पडलो आणि एकलव्यासारखा त्यांच्यावर भक्ती आणि प्रेम करीतच राहीलो. 

त्यानंतर छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीच्या निमित्ताने आणि त्यानंतर आणि पुढे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पुणे, मुंबई मध्ये बैठका होऊ लागल्या. श्री पवार साहेबांनी राष्ट्रीय कॉंग्रेसपासून विभक्त होत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. त्या बैठकीलाही मी उपस्थित होतो. त्यांच्या नजरेत मी एक ध्येयवेडा आणि चुणचुणीत कार्यकर्ता अशी माझी ओळख होती. 10 जून 1999 रोजी शिवाजी पार्कवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेची घोषणा झाली. राज्यामध्ये पक्ष असल्यामुळे पवार साहेबांची सातत्याने गाठीभेटी होतच राहिल्या. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका असो मग अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद पासून महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माझा पवार साहेबांची घनिष्ठ संबंध वाढत गेला. 

दिवंगत खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यामुळे कागल विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्यावेळी कागल विधानसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून स्वर्गीय मंडलिक आणि श्री पवार या दोघांनीही माझी निवड केली. त्यावेळी माझ्या जातीमुळे पवार साहेबांना खरं तर भीती वाटत होती आणि झालेही तसेच. त्या पहिल्याच निवडणुकीत अगदी कमी मतांनी माझा पराभवही झाला. त्यावेळी पवार साहेबांनी सांगितले की पुन्हा हसन मुश्रीफ यांना आपल्याला विधानसभेची उमेदवारी द्यायची आहे. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी निवडून आलो आणि त्यांचा विश्वास सार्थ झाला. त्याचवेळी राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस असे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार झालं. त्या मंत्रिमंडळात माझाही समावेश होता. या मंत्रिमंडळात छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी जिल्ह्यातील स्वर्गीय दिग्विजय खानविलकर आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर या दिग्गजांना मंत्री म्हणून संधी मिळाली होती. नंतर सहा महिन्यानंतर शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तिसरा मंत्री म्हणून मला राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर पुढे मी सलग दहा वर्षे मंत्रीपदावर होतो आणि आता गेल्या वर्षी स्थापन झालेल्या सरकारमध्येही मला कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली. या पद्धतीने त्यांनी माझ्यावर गाढ विश्वास ठेवला. त्यानंतर अलीकडच्या काळातच माझ्या आईचं झालेलं निधन पवार साहेबांनी कागलमध्ये घरी येऊन भेटून माझं सांत्वन केले आणि आम्हां कुटुंबियांना धीर दिला. कोरोना संसर्गामुळे मी बाधित झालो होतो. त्यावेळी सातत्याने त्यांनी माझी फोनवरून विचारपूस केली.

या राज्यात आणि देशात शरद पवार हे एकमेव असे नेतृत्व आहे की, त्यांना सगळ्याच प्रश्नांची जाण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही शरद पवार साहेबांची दैवत आहेत. सर्वच धर्मियांवर प्रेम करतानाच त्यांनी पुरोगामी विचारांवर श्रद्धा ठेवूनच काम केलं. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ज्यावेळी प्रश्न आला, त्यावेळी या विरोधात मराठवाड्यात तर फार मोठे लोणच उठले. राज्यातील ही सत्ता जाणारच असेच वातावरण त्यावेळी तयार झाले, त्यावेळी त्यांनी छातीठोकपणे सांगितले की, ही सत्ता गेली तरी बेहतर परंतु विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणारच. समतेचा हा सामाजिक निर्णय मी घेणारच. अशा परिस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण त्यावेळी त्यांनी केले. परिणामी पुढे राज्यातील सत्ताही गेली, परंतु ते जराही डगमगले नाहीत. आज महाराष्ट्रात जी कृषिक्रांती दिसत आहे, ती शरद पवार यांनीच केलेली आहे. तसेच महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीही त्यांनीच घडवून आणली. एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना चालना दिली तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात फळबाग लागवडीची मोठी क्रांतीस त्यांनी घडवून आणली. नेदरलॅंड सारख्या फळबागा महाराष्ट्रातील झाल्या पाहिजेत हा त्यांचा ध्यास होता. देशाचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्यही उत्तमच आहे, त्याआधी आपला देश दुसऱ्या देशांकडून धान्य आयात करायचा. आत्ता आपण निर्यातदार देश बनला आहोत. ऊसकरी शेतकऱ्यांना चौदा दिवसात एफआरपी देण्याचा कायदाही त्यांनीच तयार केला आहे. 

शरद पवार आज 81 वर्षांचे झाले आहेत, आजही या राज्यासह सबंध देशात पवार साहेबांना वगळून कोणतेही राजकारण होऊ शकत नाही. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही मी पवार साहेबांच्यावर पीएचडी करणार, असे म्हणतात यावरूनच पवार साहेबांची मोठेपण सिद्ध होतो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख