voting | Sarkarnama

मतदानाच्या धामधुमीत दिव्यांग दुर्लक्षित 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

पुणे - नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी अतिशय कमी सुविधा होत्या, असा निष्कर्ष पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेने केलेल्या एका पाहणीतून समोर आला आहे. याच पाहणीनुसार उमेदवारांची माहिती मतदान केंद्रांवर लावण्याची योजना चांगली असली तरी हव्या त्या प्रमाणात तिचे उद्दीष्ट साध्य झालेले नाही. 

पुणे - नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी अतिशय कमी सुविधा होत्या, असा निष्कर्ष पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेने केलेल्या एका पाहणीतून समोर आला आहे. याच पाहणीनुसार उमेदवारांची माहिती मतदान केंद्रांवर लावण्याची योजना चांगली असली तरी हव्या त्या प्रमाणात तिचे उद्दीष्ट साध्य झालेले नाही. 
गोखले अर्थशास्त्र संस्थेने या वर्षीच्या मतदान प्रक्रियेची पाहणी केली. दहा पैकी पाच महापालिका आणि पाच जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये ही पाहणी करण्यात आली. महापालिका निवडणुकीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती ही शहरे निवडण्यात आली होती. तर रायगड, पुणे, अमरावती, नाशिक व नागपूर जिल्हा परिषद निवडणुकांतही ही पाहणी करण्यात आली. 
यंदाच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. उमेदवाराची पार्श्वभूमी मतदारांना समजावी व त्यांना योग्य उमेदवाराची निवड करता यावी यासाठीची ही योजना होती. या योजनेचा उद्देश साध्य झाला काय तसेच मतदान प्रक्रिया मतदारांच्या दृष्टीने सुलभ होती काय याची माहिती या सर्वेक्षणाद्वारे घेण्यात आली. या सर्वेक्षण्याच्या प्राथमिक अंदाजांची माहिती संस्थेच्या मानसी फडके यांनी आज पत्रकारांना दिली. 
या पाहणीनुसार मुंबईत मतदारांना सर्वात चांगला अनुभव आला. त्या खालोखाल पुणे व नंतर नागपूर यांचा क्रमांक आहे. मुंबईत मतदारांना सुविधांना 10 पैकी सरासरी 9.2 गुण दिले. पुण्यात 8.3 तर नागपूरमध्ये 7.71 गुण दिले. मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी केलेल्या सुविधांमध्ये नागपूर शहर सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. पुणे दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबईचा पहिला क्रमांक लागला आहे. मात्र, या तिन्ही शहरांच्या गुणांची सरासरी केवळ 5.56 एवढीच आहे. थोडक्‍यात ही तिन्ही शहरे दिव्यांगांना मतदान केंद्रांवर सुविधा पुरविण्यात कमी पडल्याचे दिसते आहे. 
उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरताना दिलेली माहिती केंद्राबाहेर लावण्याच्या योजनेबाबत या तिन्ही शहरांमधील मतदारांना विचारले असता सरासरी 69 टक्के मतदारांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर केवळ 31 टक्के मतदारांनी आपण ही माहिती वाचून मतदान केल्याचे सांगितले आहे. ही माहिती प्रभागांमध्ये मतदानाच्या तीन-चार दिवस आधी प्रसिद्ध करावी, अशीही मागणी अनेक मतदारांनी केल्याची माहिती श्रीमती फडके यांनी दिली. 
ही माहिती वाचल्यानंतर उमेदवार निवडीच्या निर्णयावर परिणाम झाला काय याचे होकारार्थी उत्तर केवळ 35 टक्के मतदारांनी दिले आहे. तर नकारार्थी उत्तर देणाऱ्यांची संख्या 65 टक्के आहे. ज्यांनी ही माहिती वाचली त्यापैकी मुंबईकरांनी आपल्याला चांगले उमेदवार निवडता आले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपणास गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार समजले अशी पुणेकरांची प्रक्रिया आहे तर शिकलेले उमेदवार कोण याची माहिती आम्हाला मिळाल्याचे नागपूरकरांनी सांगितले आहे. राज्य निवडणूक आयोगाची ही योजना योग्यच असल्याचे मत 83 टक्के मतदारांनी नोंदवले आहे. 
 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख