पात्र असूनही मतदार नसलेले तरुण 62 टक्‍के!  - voter regestraion | Politics Marathi News - Sarkarnama

पात्र असूनही मतदार नसलेले तरुण 62 टक्‍के! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जून 2017

राज्य शासनाने 20 मे 2017 च्या आदेशान्वये राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर राज्यात 1 जुलै हा राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर प्रांताधिकारी तर तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या स्तरावर राज्य मतदार दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

कोल्हापूर : जिल्ह्यात वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले 62 टक्के तरूण मतदारच नाहीत. 18 ते 19 या वयोगटातील केवळ 38 टक्के तरूणांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. या तरूणांची प्रथम मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी 1 ते 31 जुलै या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. शिंदे म्हणाले,"सन 2015 साली 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांची जिल्ह्यातील लोकसंख्या 1 लाख 24 हजार आहे. यापैकी फक्त 47 हजार 317 तरूणांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. हे प्रमाण 38 टक्के आहे, अजूनही 62 टक्के या वयोगटातील तरूणांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने 18 ते 21 वयोगटातील मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी 1 जुलैपासन विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले आहेत.' 

ते म्हणाले,5 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. यात जिल्ह्यात एकूण 29 लाख 36 हजार 549 आहे. यापैकी 15 लाख 19 हजार 519 पुरूष 14 लाख 16 हजार 965 महिला तर 65 इतर मतदारांचा समावेश आहे. 8 व 22 जुलै या दोन दिवशी विशेष मोहिमेद्वारे 18 ते 21 वयोगटातील मतदार नोंदणी प्रत्येक मतदान केंद्रावर होणार आहे. याशिवाय इतर दिवशी महाविद्यालयातही या मतदार नोंदणीची मोहिम राबवण्यात येणार आहे.' 

श्री. शिंदे म्हणाले,"मतदार यादीत नांव नोंदवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची महाविद्यालयात प्रवेश घेतानाच प्रवेशपत्रासोबत मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी आवश्‍यक तो फॉर्म भरून घेतला जाईल. या कार्यक्रमाबरोबरच मयत मतदारांची नांवेही यादीतून कमी करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख