विठ्ठल तुपेंनी माझे तिकिट कापले...पण त्याचा फायदाच झाला : राजलक्ष्मी भोसलेंचा दावा

पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्याराजकीय-सामाजिक प्रवासाची आत्मकथा लिहिली आहे. पुण्याचे माजी खासदार दिवंगत विठ्ठल तुपे यांनी आपल्या कारकिर्दीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
विठ्ठल तुपेंनी माझे तिकिट कापले...पण त्याचा फायदाच झाला : राजलक्ष्मी भोसलेंचा दावा

पुणे : ``आधी माहेर आणि लग्नानंतर सासरच्या लोकांकडून मला राजकीय संस्कार मिळाले आणि पती मालोजी भोसले यांचे पाठिांब्याने मी कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले. जनसंपर्क वाढविला आणि पुणे महापालिकेच्या 1992 च्या निवडणुकीत तिकिट मागितले. पण ते माजी खासदार विठ्ठल तुपेंनी कापले. तुपेंमुळे तेव्हा माझे नुकसान झाले. मात्र पुढे तेवढाच फायदाच झाला...हडपसरमधील तुपे आणि भोसले घराण्यातील जुना राजकीय संघर्ष आता पुन्हा उघड झाला तो पुण्याच्या माजी महापौर राजकीय भोसले यांच्या "माझे जीवन, माझे व्हिजन' या आत्मकथेतून. 

हडपसर आणि पुढे शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या सामाजिक, राजकीय प्रवासाबाबत आत्मकथन केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
 
राजलक्ष्मी भोसले यांनी राजकीय वाटचाल प्राधान्याने मांडली आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यां, त्या काळात केलेले काम, पुढे नगरसेवक, महापौर आणि आता राष्ट्रवादीच्या नेत्यां म्हणून कशा प्रकारे जबादारी पार पाडली याचाही त्यात उल्लेख केला आहे. त्यापलीकडे जाऊन राजलक्ष्मी भोसले यांनी तुपे यांनी आपल्या राजकीय प्रवासात खोडा घातल्याचे एका लेखात म्हटले आहे. 

आधी तुपे घराण्याशी अतिशय चांगले संबंध होते. जेव्हा पती मालोजी यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तुपे यांनी मालोजी व त्यांच्या भावाला खूप जीव लावला होता, असेही भोसले यांनी म्हटले आहे. मात्र, त्यानंतर या दोन्ही घराण्यांत छुप्या राजकीय संघर्षाला तोंड फुटले. तुपे हे महापालिकेच्या 1992 च्या निवडणुकीच्या आधी काॅंग्रेसमध्ये आले. विठ्ठल तुपेंनी काॅंग्रेसमध्ये येताच पवार साहेबांकडून पुणे शहरातले फक्त माझे एकच तिकिट कापायला लावले, असा दावा भोसले यांनी केला आहे.

त्या वेळी माझे तिकिट कापू नये म्हणून बाळासाहेब शिवरकरांनी खूप शर्थीचे प्रयत्न केले; पण उपयोग झाला नाही. विठ्ठल तुपे यांना शिवाजीराव भोसल्यांची साथ मिळाली, अशी आठवण त्यांनी लिहिली आहे. 

तुपेंमुळे मिळालेले तिकिट कापले गेले तरी, तेव्हाचे कॉंग्रसचे "सबसे बडा खिलाडी' सुरेश कलमाडी यांचा विश्‍वास संपादन करीत, पक्ष संघटनेचे काम करीत राहिले. मी कष्टाळू कार्यकर्ती असल्याचे कलमाडींना पटले. त्यानंतर शहर कॉंग्रेस आणि कलमाडींकडे माझ्या शब्दाला महत्त्व राहिले, हेही भोसले यांनी सांगितले.

त्यानंतर 1997 च्या महापालिका निवडणुकीत त्या पहिल्यांदा निवडून आल्या. पुढे 2002 मध्ये आणि 2007 च्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. त्यानंतर 2007 मध्ये त्या महापौर झाल्या. 
1992 च्या महापालिका निवडणुकीपासून सुरू झालेली भोसले विरुध्द विठ्ठल ही राजकीय लढाई तुपे यांचे चिरंजीव आणि पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्यापर्यंत कायम आहे. जेव्हा राजलक्ष्मी भोसले महापौर होत्या. त्यावेळी चेतन यांना सभागृहात नेहमीच डावलण्यात आल्याचे सांगितले जाते.

शरद पवार यांनी या आत्मकथनाचे कौतुल केले आहे. `आत्मकथनात स्वयंस्तुतीचा मोह होत असतो पण त्यांनी तो टाळला आहे. इतर व्यक्तिरेखांना देखील न्याय दिला आहे. पुस्तकात प्रत्येक व्यक्तिरेखा खुलून समोर येतात. हेच पुस्तकाचे यश आहे. ‘आली बघा खाटकीन’ ह्या प्रकरणात पोल्ट्रीसारख्या नवख्या व्यवसायात पाऊल टाकताना, तो चालवताना आलेल्या अनुभवांचे बारकावे टिपले आहेत. त्यांना कोंबडी व्यवसाय चालवायचं गणित छान जमलं. ‘पुण्यात धो-धो पावसात हडपसरच्या ओढ्याला पूर आलेला, त्या पूरातून पल्याडच्या ट्रकमध्ये राजलक्ष्मी कोंबड्या चढवत आहेत’ हा मजेशीर प्रसंग करमणूक करतो. पण राजलक्ष्मी भोसलेंची चिकाटीही दर्शवतो. नवशिक्या पोल्ट्री व्यावसायिकांसाठी व्यवसाय नेटाने कसा करावा याचा मार्गदर्शक दाखला आहे,` असे पवार यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com