संदिप पाटलांच्या 'व्हिजिबल पोलिसिंग'ने वाचविले एका तरुणाचे प्राण

संदिप पाटलांच्या 'व्हिजिबल पोलिसिंग'ने वाचविले एका तरुणाचे प्राण

खेड-शिवापूर : बहिणीला फोन करतो या संशयावरून एका तरुणाला गाडीत बसवून मारहाण करत पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या तरुणांना राजगड पोलिसांनी शनिवारी (ता.3) रात्री पाठलाग करुन मोठ्या शिताफीने पकडले. राजगड पोलिसांच्या या कामगिरीमुळे विशाल विट्ठल इंगळे या तरुणाचे प्राण वाचले. 

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर टोल नाक्यावर राजगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. यावेळी त्यांना माहिती समजली की एका स्कोर्पिओ गाडीत एका तरुणाला काचेच्या बाटल्यांनी मारहाण करत चार-पाच युवक साताऱ्याच्या दिशेने गेले आहेत. ही माहिती मिळताच राजगड पोलिस त्या गाडीच्या शोधात साताऱ्याच्या दिशेने निघाले. खेड-शिवापूर टोल नाक्यापासून काही अंतर पुढे गेल्यावर पोलिसांना ती गाडी दिसली. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र त्यांनी आपले वाहन केळवडे गावाच्या दिशेने वळवून ते बनेश्वरच्या दिशेने जावू लागले.

यावेळी दराडे यांनी इतर पोलिस कर्मचाऱ्यांना ही कल्पना देऊन बनेश्वर येथे नाकाबंदी करण्यास सांगितले. त्यानुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बनेश्वर येथे सदर तरुणांची गाडी पकडून या जखमी तरुणाची सुटका केली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी पळून गेले. तर इतर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पाच जणांनी मला आंबेगाव पठार येथून पळवून आणले असून मी त्यांच्या बहिणीला फोन करतो या संशयाने ते मला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करत असल्याचे इंगळे याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार राजगड पोलिसांनी तीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

'व्हिजिबल पोलिसिंग'चा फायदा

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांचा 'व्हिजिबल पोलिसिंग'वर भर आहे. त्यानुसार पोलिस आपापल्या कार्यक्षेत्रात रात्रं दिवस कायम गस्तीवर असतात. त्याचा परीणाम अशा प्रकारचे गुन्हेगार वेळीच पकडले जाऊन अनुचित प्रकारांना आळा बसतो आहे, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com