कल्याण शहराची वाहतुकीची कोंडी फोडणार :  विश्वनाथ भोईर

vishwanth bhoir
vishwanth bhoir

कल्याण: मागील काही वर्षांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खालावत गेली. त्यामुळे येथील विकासाचा वेगही मंदावला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढत शहरातील विविध समस्या सोडवण्याचा विश्वास कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे.

शहरातील नागरिकांना मार्गक्रमण करण्यासाठी सुयोग्य असे रस्ते, शहरांना विविध भागाशी जोडणारे पूल तसेच शहरात पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर त्यांचा भर असेल. शहरातील विकासाच्या प्रकल्पांमधे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासन ,राज्य तसेच केंद्र सरकार यांच्यात समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण करण्याचा विश्वनाथ भोईर यांचा प्रयत्न असेल.

* शहरात सर्वात मोठी समस्या वाहतूक कोंडीची आहे त्यावर कशाप्रकारे उपाययोजना करणार? 

 * शहरातील लोकसंख्या वाढीचा वेग अधिक आहे. त्या तुलनेत येथील रस्त्यांचा विकास करणे आवश्यक आहे. मात्र या दोन्हींचा ताळमेळ न बसल्यामुळे शहरात आज आपल्याला वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मात्र या समस्येवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना प्रस्तावित आहेत. कल्याण शहराची रचना पाहिल्यास या शहरातून कोणत्याही दिशेला बाहेर पडताना आपल्याला पुल ओलांडावा लागतो. मात्र या पुलांना जोडणाऱ्या  रस्त्यांचे रुंदीकरण झाले नसल्यामुळे त्याठिकाणी बॉटलनेक तयार होऊन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते. 

त्यामुळेच पुलाच्या कामांना जसा वेग देण्याची आवश्यकता आहे; त्याच बरोबर त्यालगत असणाऱ्या रस्त्यावर रुंदीकरण करून तेथील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. मुंबईच्या दिशेने जाणारा कल्याण खाडीवरील पुल, कल्याण पूर्व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वेवरील पत्री पूल त्याचप्रमाणे शहाड स्टेशनलगतचा पुल, वालधुनी नदीवरील पूल या ठिकाणी प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. भवानी चौकापासून वालधुनी परिसराला जोडणारा एलिव्हेटेड मार्ग यापूर्वीच मंजूर करण्यात आला.

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात असलेल्या या मार्गासाठी येणाऱ्या अडचणी सोडून हा मार्ग विकसित करण्यासाठी विशेष लक्ष देणार आहे. भिवंडीलगतच्या रांजणोली येथून शीळ फाट्याला जोडणाऱ्या पुलाला राज्य सरकारकडून 660 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून हा मार्ग कॉन्क्रीटचा करण्यास मंजूरी मिळाली आहे. शहरातील जास्तीत जास्त रस्ते काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून पूर्ण करुन रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढण्याचा माझा प्रयत्न असेल. ठाणे शहरामध्ये पालिकेने ज्या पद्धतीने रस्त्यांची सुधारणा केली आहे त्याच धर्तीवर कल्याणातही रस्ते सुधारले जावेत यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत केले जाईल.

* कल्याण-डोंबिवली शहरांचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होऊन तीन वर्षे लोटली तरी अद्याप येथील कामांना सुरुवात झालेली नाही त्याबाबत आपली भूमिका काय असेल?

 * अनेकविध कारणांमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. या विलंबामागील नेमकी कारणे शोधून काढतात त्यांचे तिथल्यातिथे निराकरण करण्याचा माझा प्रयत्न असेल. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रेल्वे स्थानक परिसराचा विकास, खाडी किनारा सुशोभीकरण, सिटी पार्क यासारख्या प्रकल्पांचा प्रामुख्याने समावेश आहे. रेल्वे स्थानक परिसरामधील सुधारणेमुळे कल्याण रेल्वे स्थानकांमध्ये येणाऱ्या प्रवाशाला शहरात प्रवेश करताना एका चांगल्या वातावरणाचा अनुभव मिळेल हे निश्चित. 

आज फेरीवाले, वाहतूक कोंडी यामुळे रेल्वेस्थानक परिसरात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या प्रकल्पामुळे फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. त्याचप्रमाणे बस वाहतूक तसेच रिक्षा चालक आणि खाजगी वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. यामुळे या परिसराचा कायापालट झालेला पहायला मिळेल. कल्याण शहराला विस्तीर्ण असा खाडी किनारा लाभला आहे. मांडा टिटवाळ्यापासून वाडेघरपर्यंतचा खाडीचा पट्टा विकसित करण्यावर आपला भर असेल.

याच किनारी आपण आपले बालपण व्यतीत केले आहे. त्यामुळे येथे होणारी मासेमारी मी जवळून पाहिली आहे. परंतु मागील दहा पंधरा वर्षांमध्ये खाडीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे येथील मासेमारीचा व्यवसाय जवळजवळ बंद पडला आहे. याच्या परिणामी या परिसरातील ग्रामस्थांचे संसार अडचणीत आले आहेत. या किनाऱ्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच खाडीतील पाणी स्वच्छ करण्याकडेही आपले लक्ष राहील.

यासाठी खाडी स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेसाठी गरज भासल्यास पर्यावरण विषयात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे सहाय्य घेण्याचा मानस आहे. या सुशोभीकरणामुळे येथे रोजगार निर्मितीही होईल. याच जोडीला टिटवाळा आणि दुर्गाडी किल्ला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 

* शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. ती सुधारण्यासाठी नेमके काय प्रयत्न होतील? 

* शहरातील रुक्मिणीबाई रुग्णालय चालवण्यास पालिका सक्षम नाही. त्यामुळे या रुग्णालयाचा कारभार राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यावर माझा भर असेल. जर पालिकेसारखी संस्था या रुग्णालयांमध्ये सुधारणा करण्यास सक्षम नसेल तर रुग्णालयांच्या सुधारणेसाठी काम करणार्‍या संस्थेकडे ते वर्ग करणे अधिक उपयुक्त ठरेल. 

शहरातील या रुग्णालयात सुपर स्पेशलिटी दर्जाची सुविधा मिळावी यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या धर्तीवर येथील रुग्णालय सुसज्ज असावे यासाठी माझा प्रयत्न राहील. हे रुग्णालय सुसज्य झाल्यास मुंबईसारख्या सुविधा येथे मिळू लागल्यावर आज उपचारार्थ मुंबईला जाणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी होईल मुंबई सारख्याच सुविधा सर्व उपचार याठिकाणी या शहरात मिळावेत यासाठी माझा प्रयत्न असेल.

* मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र कल्याणात आहे मात्र आजही ते पूर्ण क्षमतेने चालवले जात नाही या उपकेंद्राचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी काय योजना असतील? 

* मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शिवसेना तसेच युवा सेनेने खूप प्रयत्न केले आहेत. कल्याण तसेच कर्जत-कसारा या परिसरातील विद्यार्थ्यांना या उपकेंद्राचा खूप मोठा आधार मिळणार आहे. या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यापीठाने या ठिकाणी काही अभ्यासक्रमांना सुरुवात केली आहे. परंतु या उपकेंद्राचे विस्तारीकरण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. 

या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून यासाठी आपण कटिबद्ध असून शहरातील शैक्षणिक वातावरणास पोषक असे प्रस्ताव, प्रकल्प मंजूर करून घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य असेल. कल्याण शहरातील बिर्ला महाविद्यालय ही एक महत्वाची शैक्षणिक संस्था आहे. विविध क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी या महाविद्यालयाने घडवले आहेत. नुकताच महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाला आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे अभ्यासक्रम सुरू होतील तसेच संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळेल यासाठी आपला प्रयत्न असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com