जात पंचायतीचा जाच : पंधरा लाखांचा दंड न भरल्यानं तरूणाला केलं जातीतून बहिष्कृत - The youth was expelled from the caste for not paying the fine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

जात पंचायतीचा जाच : पंधरा लाखांचा दंड न भरल्यानं तरूणाला केलं जातीतून बहिष्कृत

उत्तम कुटे
रविवार, 18 जुलै 2021

आरोपींमध्ये पिंपरी पालिकेचा एक सेवानिवृत्त अधिकारी असल्याचे समजते.

पिंपरी : घरगुती वादात जात पंचायतीने परस्पर निर्णय घेत एका विवाहित तरुणाला १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तो न दिल्याने त्याला कंजारभाट जातीतून बहिष्कृत केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये मोशीत घडली आहे. याप्रकरणी जात पंचायतीतील पंच, अध्यक्षांसह दहाजणांविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलिसांनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (The youth was expelled from the caste for not paying the fine)

आरोपींमध्ये पिंपरी पालिकेचा एक सेवानिवृत्त अधिकारी असल्याचे समजते. यापूर्वीही अशा घटना शहरात व त्याही कंजारभाट समाजातच घडलेल्या आहेत. या घटनेतील जात पंचायतचा अध्यक्ष विजय गागडे व इतर दोन पंच हे येरवडा येथील रहिवासी असल्याने त्यांच्या शोधासाठी तपासाधिकारी अमरदीप पुजारी व पथक हे सायंकाळी येरवड्याला रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी या गुन्ह्यातील इतर पंच व आऱोपींचा कंजारभाट जमातीची मोठी वस्ती असलेल्या पिंपरीतील भाटनगर झोपडपट्टीत शोध घेतला. पण, ते मिळून आले नाहीत. 

हेही वाचा : आगाऊपणा नको, जेवढी स्क्रिप्ट तेवढेच बोला; आढळराव अन् अमोल कोल्हेंमध्ये जुंपली

ता. १ रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोशी उपबाजाराजवळ घडलेल्या या घटनेप्रकरणी शनिवारी (ता. १७) हा गुन्हा दाखल झाला. प्रशांत ऊर्फ विकी गागडे, संगीता गागडे, शुभम गागडे (तिघेही रा. मोशी), छोटू गागडे (रा. भाटनगर), गुल्या अबंगे, सुर्यकांत माचरे (दोघेही रा. येरवडा), शशिकांत गागडे (रा. आदर्शनगर, मोशी), बबलू तामचीकर आणि सुभाष माचरे (रा. पिंपरी) अशी इतर आरोपींची नावे आहेत. 

अबंगे, सुर्यकांत माचरे, शशिकांत गागडे, तामचीकर, सुभाष माचरे हे जात पंचायतीतील पंच आहेत. सुशांत सुनील नगरकर (वय २६, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नगरकर यांच्या पत्नीला नांदायला पाठवायचे की नाही यासंबंधी घरगुती चर्चा करण्यासाठी आरोपींनी त्यांना बोलावले होते. मात्र, यावेळी फिर्यादींचे कसलेही म्हणणे न ऐकून घेता जात पंचायतीने त्यांना १५ लाख रुपयांचा दंड केला. तो देण्यास नकार दिल्याने नगरकरांना कंजारभाट समाजातून बहिष्कृत केले.

कंजारभाट जमात ही मूळची राज्यस्थानची आहे. इतिहासात सैनिकांच्या शस्त्रांना धार लावण्याचे काम ही जमात करीत होती. राज्यस्थानमध्ये त्यांना सांसी असे संबोधले जाते. तर गुजरातमध्ये ते छारा किंवा सहसंमल या नावाने ओळखले जातात. या समाजाचे प्रतिसंविधान आहे.समाजातच लग्न झाल्यानंतर तरुणीची कौमार्य चाचणीची प्रथा त्यांच्यात आहे. ती धुडकावून १९९६ ला राज्य सरकारमध्ये  प्रथम श्रेणी अधिकारी असलेले कृष्णा इंद्रेकर यांनी अरुणा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर २०१८ला समाजातील तरुणांनी Stop the V ritual ही चळवळ सुरु केली. मात्र, ती सुरु करणाऱ्यांनाविरुद्धच समाजाला भडकावण्यात आले. त्यांच्याविरुद्ध मानहानी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना वाळीतही टाकण्यात आले. 

अशाच एका प्रकरणात पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व कंजारभाट पंचायतीचा महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशचा प्रमुख कवीचंद भाट याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली होती. तर, पिंपरीतीलच विवेक तमायचीकर या तरुणाने कौमार्य चाचणीला न जुमानता ऐश्वर्या भट या तरुणीशी मे २०१८ मध्ये विवाह केल्याने तो चर्चेचा विषय झाला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख