सुशांतसिंहला न्याय मिळण्यासाठी रामदेवबाबांनी केला यज्ञ - Yoga Guru Ramdevbaba Supports SSR Suicide Case Probe | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंहला न्याय मिळण्यासाठी रामदेवबाबांनी केला यज्ञ

वृत्तसंस्था
रविवार, 16 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या घटनेला जवळपास दोन महिन्यांचा काळ उलटतो आहे. या प्रकरणात आता रामदेवबाबाही उतरले आहेत. आपण सुशांतच्या कुटुंबियांशी चर्चा केली. त्यांची व्यथा ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. आम्ही पतंजलीमधील सर्वजण सुशांतला न्याय मिळावा, यासाठी प्रार्थना करत आहोत, असे रामदेवबाबांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात राजकारणी व्यक्ती, बाॅलीवूडचे कलाकार विविध विधाने करत आहेत. सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळण्यासाठी विविध पातळ्यांवर आवाज उठवला जात आहे. यात आता योगगुरु रामदेवबाबा यांनीही उडी घेतली आहे. सुशांतला न्याय मिळण्यासाठी आपण आपल्या आश्रमात यज्ञ केला असल्याचे ट्विट रामदेवबाबांनी केले आहे. 

सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या घटनेला जवळपास दोन महिन्यांचा काळ उलटतो आहे. आता या प्रकरणावरुन महाराष्ट्र व बिहार असे चित्र निर्माण झाले आहे. काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सुशांतला न्याय मिळावा म्हणून मोहिम सुरु केली आहे. अशातच विविध पातळ्यांवर केली जाणारी विधाने या संपूर्ण प्रकरणाताल संभ्रम वाढवत आहेत. सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांकडूनही केली जात आहे. यात आता रामदेवबाबाही उतरले आहेत. आपण सुशांतच्या कुटुंबियांशी चर्चा केली. त्यांची व्यथा ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. आम्ही पतंजलीमधील सर्वजण सुशांतला न्याय मिळावा, यासाठी प्रार्थना करत आहोत, असे रामदेवबाबांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपल्या ट्विटद्वारे त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यात रामदेवबाबा आपल्या आश्रमात यज्ञ करताना दिसत आहेत. 

१४ जून रोजी सुशांससिंह राजपूतने मुंबईतील बांद्रा येथील आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. दुसरीकडे सुशांतच्या कुटुंबियांनी पाटण्यातही एक तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुशांतच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याचा आरोप केला आहे. या वरुन राजकारणही तापले आहे. पाटण्याहून मुंबईला सुशांत प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले होते. त्यावरुनही राजकारण तापले होते. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या तपासासाठी सीबीआयच हवी यासाठी बॉलीवूड एकवटले आहे. यात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यासह वरुण धवन आणि सिद्धांत चतुर्वेदी आघाडीवर आहेत.    

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

सोशल मिडियावर मोहिम

सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी आधी कंगना राणावत, क्रिती सॅनॉन आणि अंकिता लोखंडे यांनी केली होती. आता अनुपम खेर, वरुण धवन आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर #CBIforSSR या हॅशटॅगखाली सुशांतच्या मृत्यूच्या तपासासाठी सीबीआयच हवी, अशी मोहीम सुरू केली आहे. 

वकिलांनी केला नवा आरोप

या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी या प्रकरणी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.  विकाससिंह यांनी म्हटले आहे की, सुशांतचे शवविच्छेदन मुंबईतील आर.एन.कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात करण्यात आले होते. या शवविच्छेदन अहवालानुसार, सुशांतचा मृत्यू गळफासाने गळा आवळल्यामुळे झाला होता. मात्र, या शवविच्छेदन अहवालात सुशांतच्या मृत्यूच्या वेळेचा अतिशय महत्वाचा असलेला उल्लेख करण्यात आलेला नाही.   
Edited BY - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख