राजीनामा देताच येडियुरप्पांनी मानले भाजपच्या तीन बड्या नेत्यांचे विशेष आभार! - yediyurappa thanks narendra modi amit shah and j p nadda-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

राजीनामा देताच येडियुरप्पांनी मानले भाजपच्या तीन बड्या नेत्यांचे विशेष आभार!

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जुलै 2021

कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी राजीनामा  दिला आहे. तसेच, त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील भाजप (BJP) सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. यात तीन बड्या भाजप नेत्यांचे विशेष आभार मानले आहेत. 

येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर येडियुरप्पा तातडीने राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तिथे ते राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. आज सायंकाळी नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

येडियुरप्पांनी यांनी ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मागील दोन वर्षे राज्याची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मान होता. मी आता कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेने मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. 

येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. येडियुरप्पा यांना यासाठी मागील आठवड्यात दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : मी राजीनामा देतोय, असं म्हणत निरोप घेताना येडियुरप्पांना अश्रू अनावर 

ज्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या 16 टक्के असून, या समाजाचा भाजपला पाठिंबा आहे. याचवेळी येडियुरप्पांनाही या समाजातून अधिक मान्यता आहे. येडियुरप्पांना हटवून इतर समाजातील नेता मुख्यमंत्री बनवल्यास भाजपचा हा हक्काचा मतदार दुरावला जाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून लिंगायत नेताच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

येडियुरप्पांना हे राज्यातील लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. येडियुरप्पांना राजीनामा देण्यास भाग पाडू नये यासाठी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांनी केंद्रातील भाजप नेतृत्वाला उघड इशारा दिला होता. याचबरोबर लिंगायत समाजाच्या काँग्रेस आमदारांनाही भाजपला इशारा दिला होता. यामुळे येडियुरप्पांच्या जागी लिंगायत नेताच मुख्यमंत्री बनावा, असा आग्रह पक्ष नेतृत्वाकडे धरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हीच भूमिका घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख