बंगळूर : कर्नाटकातील सत्ताधारी भाजपचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.कुमारस्वामी हे पुन्हा एकत्र आले आहेत. येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी यांच्या एकत्र येण्याने राज्यात नवीन समीकरणे उदयास येऊ शकतात, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. याचबरोबर पुढील निवडणुका ते एकत्र लढू शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे.
कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतिपदी भाजपचे एम.के.प्राणेश यांनी निवड झाली आहे. जेडीएसच्या पाठिंब्यावर ही निवड झाली आहे. कारण विधान परिषदेत भाजप, जेडीएस अथवा काँग्रेस या तिन्हीपैकी एकाही पक्षाला बहुमत नाही. जेडीएस नेते एस.एल.धर्मेगौडा यांच्या संशयास्पद आत्महत्येमुळे ही जागा रिकामी झाली होती.
कर्नाटक विधान परिषदेचे सभापती व काँग्रेस नेते प्रभातचंद्र शेट्टी यांना भाजपने आक्षेप घेतला होता. त्यावेळी 15 डिसेंबरला उपसभापती असलेले धर्मेगौडा सभागृहाचे कामकाज सांभाळत होते. काँग्रेस सदस्यांनी त्यावेळी झालेल्या गोंधळात धर्मेगौडा यांना खुर्चीवरून खाली ओढले होते.
येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या एकत्र येण्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. येडीयुरप्पा आणि भाजप नेतृत्वाचे संबंध मागील काही काळापासून ताणलेले आहेत. मात्र, राज्यात येडीयुरप्पा यांना डावलणे शक्य नसल्याने भाजप नेतृत्वाची कोंडी झाली आहे. येडीयुरप्पा यांच्यावर पदावरुन पायउतार होण्यासाठी दबाव आणल्यास ते नवीन पक्ष स्थापन करु शकतात, अशी चर्चा मागील काही काळापासून सुरू आहे. यासाठी ते जेडीएसची मदत घेऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.
जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला दूषणे देत भाजपचे गोडवे गायले होते. मात्र, गोहत्या बंदी विधेयकावेळी त्यांनी भाजपला विरोध करीत काँग्रेसला साथ दिली. विधानसभेत हे विधेयक मांडण्यात आले त्यावेळी काँग्रेससोबत जेडीएस आणि इतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला होता. भाजपला विरोध करण्याची भूमिका कुमारस्वामी यांनी या विधेयकावरुन घेतली होती.
Edited by Sanjay Jadhav

