भाजप नेत्याच्या छळामुळे मला अखेर आत्महत्या करावी लागेल; तरूणीचा जाहीर इशारा - women says she will commit suicide due to torture by bjp leader ramesh jarkiholi | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेत्याच्या छळामुळे मला अखेर आत्महत्या करावी लागेल; तरूणीचा जाहीर इशारा

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मार्च 2021

अश्लील व्हिडिओप्रकरणी अडचणीत आलेल्या भाजपच्या माजी मंत्र्याविरोधात तरुणीने खळबळजनक आरोप केले आहेत.

नवी दिल्ली : अश्लील व्हिडिओप्रकरणी कर्नाटकातील भाजपचे मंत्री रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता या व्हिडीओतील तरुणीने एक नवा व्हिडीओ जारी केला आहे. यात तिने जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, आत्महत्या करण्याचा इशाराही दिला आहे. 

कर्नाटकमधील भाजप नेते व माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे एका अश्लील व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या प्रकरणामुळे कर्नाटकमधील भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. विरोधकांनी यावरून रान उठवलं आहे. दाक्षिणात्य वृत्तवाहिन्यांवर जारकीहोळी यांचा हा व्हिडिओ दाखविला जात आहे. या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

या अश्लील व्हिडीओतील तरुणीने आणखी व्हिडीओ जारी केला आहे. यात तिने म्हटले आहे की, रमेश जारकीहोळी म्हणत आहेत की, ते एक दिवस सरकार पाडणार आहेत. सगळ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी हवा तेवढा पैसा खर्च करण्यास तयार असल्याचे ते म्हणत आहे. हवा तेवढा पैसा खर्च करण्यास, याचा नेमका अर्थ काय? लोकांनी तो समजून घ्यायला हवा. ते मला व माझ्या कुटुंबाला ठार मारू शकतात. मी जारकीहोळी यांच्याकडून सुरू असलेल्या छळामुळे त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार आहे. 

मी आणि माझ्या कुटुंबीयांत झालेल्या संभाषणाची सीडी 2 मार्चला जाहीर करण्यात आली. याचा मला धक्का बसला आहे. काय करावे हेच मला कळत नाही. कुठे जावे हे मला सुचत नाही. मी माझ्या ओळखीच्या एका प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. परंतु, त्याने काहीही करण्यास नकार दिला. त्याने मला काँग्रेसमधील सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यासारख्या नेत्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला. यानंतर मी शिवकुमार यांच्या निवासस्थानी गेले परंतु, ते घरी नव्हते. माझ्या कुटुंबीयांनी पोलिसांनी बंगळूरमध्ये आणून त्यांना सरंक्षण द्यावे, असे त्या तरुणीने म्हटले आहे. 

हेही वाचा : अश्लील व्हिडीओप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा दाखल 

जारकीहोळी यांनी एका तरुणीसोबत केलेले अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. जारकीहोळी यांनी धमकावून लैंगिक छळ केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील राजकारणामध्ये अशी सेक्स स्कँडल नवीन नाहीत. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 

भाजप नेते अरविंद लिंबावली यांचे प्रकरण 2019 मध्ये समोर आले होते. त्यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होते. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. लिंबावली हे सध्या येडियुरप्पा सरकारमध्ये मंत्री आहेत. अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. 

विधानसभेमध्ये आमदार मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याचा व्हिडिओही पुढे आला होता. यामध्ये लक्ष्मण सवदी, कृष्णा पालेमर आणि सी. सी. पाटील हे भाजपचे तीन आमदार अडकले होते. 2012 मध्ये हा प्रकार घडला होता. सध्या सवदी हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत. तर पाटीलही येडीयुरप्पा सरकारमध्ये मंत्री आहेत. 

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे एक आमदार विधासनभेत पॉर्न क्लीप पाहत असल्याचे समोर आले होते. काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड हे विधान परिषदेतच मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ आणि छायाचित्र पाहत असल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली होती. राठोड यांनी मात्र आपण कसलेही व्हिडिओ पाहिले नसल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे नेते एच. वाय. मेटी आणि भाजपचे आमदार रेणुकाचार्य यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने भाजपचेच आमदार अडकल्याचे दिसते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख