धक्कादायक : महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्र्यांविरोधात मेहुणीनेच केली बलात्काराची तक्रार - woman files sexual harassment complaint against mahrashtra cabinet minister | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्र्यांविरोधात मेहुणीनेच केली बलात्काराची तक्रार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 जानेवारी 2021

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याविरोधात मेहुणीनेच बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार देण्यात आली आहे. या मंत्र्याच्या मेहुणीनेच ही तक्रार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. तिने तिच्या जिवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. 

तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत हा प्रकार मांडला आहे. या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. यानंतर जागे झालेल्या मुंबई पोलिसांनी या तक्रारीची चौकशी करण्यास सुरवात केली आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला आहे. 

तक्रारदार तरुणी ही संबंधित मंत्र्याची मेहुणी आहे. बहिणीच्या लग्नात 1997 मध्ये तिचा या मंत्र्याशी परिचय झाला होता. तिने तक्रारीत म्हटले आहे की, बहीण गर्भवती असताना 2006 मध्ये हा मंत्री मी एकटीच घरी असताना आला होता. तो रात्री घरी आला आणि त्याने माझ्यावर बलात्कार केला. अशा प्रकार दर दोन-तीन दिवसांची येऊन तो लैंगिक शोषण करीत होता. याचबरोबर त्याने याचा व्हिडीओही तयार केला होता. 

हा मंत्री नंतर वारंवार मला फोन करुन माझ्यावर प्रेम असल्याचे सांगत होता. मला गायिका बनायचे असेल तर चित्रपट क्षेत्रात त्याच्या खूप ओळखी असल्याचे त्याने सांगितले होते. बडे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटून तुला लाँच करतो, असेही आश्वासन त्याने दिले होते. अशा प्रकारे तो माझ्याशी शारीरिक संबध ठेवत होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख