देगलूरमध्ये फडणवीसांनी 'चावी' तर फिरवलीय...'पंढरपूर इफेक्ट' दिसणार का?

तीन पक्षांची आघाडी असूनही पंढरपुरात राष्ट्रवादी एकाकी लढली होती.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama

नांदेड : देगलूर-बिलोली मतदारसंघात पंढरपूरची पुनरावृत्ती करण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधल्याचे दिसून येत आहे. त्या दृष्टीने पक्षाने विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

पंढरपूरमध्ये एकमेकांविरोधात लढणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक आणि संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना एकत्र आणत आवताडेंना उमेदवारी जाहीर केली होती. आवताडे पूर्वी भाजपत नव्हते. त्याच पद्धतीने शिवसेनेचे माजी आमदार असलेले सुभाष साबणे यांना भाजपत येण्यापूर्वीच फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर तातडीने या मतदारसंघात 'की फॅक्टर' असलेल्या भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांचे निवासस्थान गाठले. आता खतगावकर हे परिचारक यांच्याप्रमाणे साबणे यांच्या पाठीशी आपली ताकद लावून ही जागा भाजपला जिंकून देणार का, याकडे नांदेडवासियांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis
संजय राऊतांना मी उत्तर देणार नाही! फडणवीसांचा रोखठोक जबाब

ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि काँग्रेस नेते, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. कारण पंढरपुरात महाविकास आघाडी असूनही भाजपने अस्मान दाखवले होते. आता दुसरा पराभव आघाडीला परवडणार नसेल. साबणे यांनी शिवसेना सोडताना शिवसेनेवर राग नाही. मात्र, चव्हाण यांना कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले आहे. साबणे हे शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे साबणे यांनी भाजपमध्ये जाऊन काँग्रेस विरोधात निवडणूक लढविणे, हा महाआघाडी आणि शिवसेनेसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. साबणे उमेदवार असल्यामुळे चव्हाणांची मात्र, डोकेदुखी वाढणार आहे. कारण या मतदारसंघातून साबणे यांनी दोन वेळा विजय मिळविला आहे.

काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. साबणे हे दोनवेळा आमदार होते. त्यामुळे त्यांचा या मतदारसंघात चांगला दबदबा आहे. त्यातच फडणवीस यांनी रविवारी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या वेळी आमदार प्रशांत परिचारक आणि दोन वेळा अपक्ष लढलेले समाधान आवताडे यांनी एकत्रित येत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा पराभव केला. आयत्यावेळी आवताडे यांना उमेदवारी देत नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घातल फडणवीस यांनी विजय खेचून आणत महाआघाडीला मोठा धक्का दिला होता. त्यावेळीही शिवसेनेच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी केली होती.

Devendra Fadnavis
एकनाथ खडसे अडचणीत; आता महिला आयोगाच्या कारवाई करण्याच्या सूचना

बिलोली-देगलूरच्या पोटनिवडणुकीत तर थेट भाजपने शिवसेनेच्या माजी आमदारांनाच मैदानात उतरवले आहे. त्यामुळे फडणवीस हे माजी खासदार खतगावकर यांची नाराजी दूर करुन ठाकरे सरकारला पुन्हा आस्मान दाखवणार का अशी चर्चा रंगली आहे. रविवारी फडणवीस यांनी खतगावकरांशी बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली. देगलूर मतदारसंघाचे खतगावकर यांनी तीन वेळा नेतृत्व केले आहे. खतगावकर हे ज्या उमेदवाराच्या पाठीमागे आपली ताकद उभी करतील, तोच उमेदवार निवडून येतो. खतगावकरांचा दांडगा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची मोठी फळी या मतदारसंघात असल्यामुळे फडणवीस यांनी खतगावकरांची भेट घेऊन पंढरपूरची पुनरावृत्ती देगलूर-बिलोली मतदारसंघात कशी होईल, याचे डाव टाकल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.

खतगावकर हे अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे त्यांची ताकद या मतदार संघात म्हत्त्वाची समजली जात आहे. फडणवीसांच्या भेटीनंतर खतगावकरांची नाराजी दूर झाली तर चव्हाण आणि पर्यायाने काँग्रेसला परवडणारे नाही. तीन पक्षांची आघाडी असूनही पंढरपुरात राष्ट्रवादी एकाकी लढली होती. आता देगलूरमध्येही काँग्रेसची तशीच अवस्था झाली तर महाविकास आघाडीसाठी ती धोक्याची घंटा ठरेल. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र येवूनच भाजपला समर्थपणे तोंड द्यावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com