काँग्रेसचा 40 टक्क्यांचा फॉर्म्युला महाराष्ट्रासह इतर राज्यांतही चालणार का?

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 24 जागांवर महिला आमदार निवडून आल्या आहेत.
Congress
Congress File Photo

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election) काँग्रेसनं (Congress) कंबर कसली आहे. राज्यात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसकडून जोर लावण्यात आला असून सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या एकूण उमेदवारांपैकी 40 टक्के उमेदवार महिला असतील, अशी घोषणा केली आहे. हाच फॉर्म्यूला इतर राज्यांतही लागू होणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

प्रियांका गांधी यांनी नुकत्याच केलेल्या या घोषणेमागे उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुक आहे. पण आता त्यावरून राजकारण सुरू झालं आहे. हा फॉम्यूला केवळ उत्तर प्रदेशपुरता मर्यादीत न ठेवता सर्वच राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Congress
मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्ष भिडले; चन्नींची राजीनामा देण्याची तयारी...सिध्दूंना दिलं आव्हान

तृणमूल काँग्रेसने याबाबत काँग्रेस व प्रियांका गांधी यांना एकप्रकारे आव्हान दिलं आहे. महिलांना 40 टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वातआधी आपण घेतल्याचे ट्विट तृणमूलने केले आहे. 'ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलने राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवला आहे. लोकसभा निवडणुकीत 40 टक्के जागांवर महिलांना तिकीट देणारा आमचा पक्ष पहिला आहे. काँग्रेसकडून जाणीवपूर्वक त्याचं अनुकरण केलं जात आहे,' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

'हा निर्णय प्रामाणिकपणे घेतलेला असावा. तो दाखविण्यापुरता राहू नये. याबाबत काँग्रेस गंभीर असेल तर त्यांनी उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्येही महिलांना 40 टक्के जागांवर उमेदवारी द्यावी,' असं आव्हानही तृणमूलकडून देण्यात आलं आहे. तृणमूलच्या या आव्हानाला काँग्रेसकडून कसं उत्तर दिलं जाणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे. पण त्यानिमित्तानं खरंच काँग्रेस इतर राज्यांतही हा फॉर्म्यूला राबवू शकतं का, हा प्रश्नच आहे.

Congress
भावना गवळींना चिकुनगुन्या; ईडीसमोर आजही हजेरी नाहीच

सध्या महाराष्ट्रात केवळ 24 महिला आमदार

महाराष्ट्राचा विचार केल्यास विधानसभा व लोकसभेतील महिलांचा स्थान नगण्य आहे. राज्यात विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 24 जागांवर महिला आमदार निवडून आल्या आहेत. आजपर्यंतच्या विधानसभेच्या इतिहासातील ही विक्रमी संख्या आहे. त्यापैकी सर्वाधिक 12 आमदार भाजपच्या आहेत. तर काँग्रेसच्या पाच आमदार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 40 टक्के जागांवर महिलांना उमेदवारी देण्याचा फॉर्म्यूला सध्यातरी अशक्यप्राय वाटत आहे. इतर कोणत्याही पक्षाला हे शक्य होणार नाही, असंच चित्र आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यांतील महिला आमदारांच्या संख्येचं चित्रही फारसं आशादायी नाही. 40 टक्के जागांवर उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसला अनेक मातब्बर नेत्यांना दुखवावं लागेल. उत्तर प्रदेशातील स्थिती मात्र वेगळी आहे. तिथे आता काँग्रेसच्या केवळ सात जागा आहेे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील फॉर्म्यूला हा केवळ काँग्रेसचं तेथील अस्तित्व वाढवण्यासाठी असल्याची चर्चा आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठीच ही घोषणा कऱण्यात आल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. पण त्याचा परिणाम कितपत होईल, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com