रूपानी यांनी तडकाफडकी राजीनामा देण्यामागील कारण आलं समोर

विजय रूपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
रूपानी यांनी तडकाफडकी राजीनामा देण्यामागील कारण आलं समोर
why vijay rupani resinged from gujarat chief minister post

गांधीनगर : विजय रूपानी (Vjay Rupani) यांनी गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे आले आहेत. आता रूपानी यांच्या राजीनाम्यामागील कारणे समोर येऊ लागली आहेत. भाजप नेतृत्वाने रूपानी यांना हटवून आगामी निवडणुकीचे राजकीय गणित साधले आहे. 

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन राजीनामा सोपवला होता. यानंतर भाजपच्या आमदारांची बैठक होऊन त्यात भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. असे असताना रूपानी यांच्या राजकीय एक्झिटच्या कारणांबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपानी यांना कोरोना संकट सर्वाधिक भोवले आहे. कोरोनाची हाताळणी करण्यात ते अपयशी ठरले होते. यामुळे भाजप सरकारची मोठी नाचक्की झाली होती. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये गुजरातचा समावेश होता. ऑक्सिजन व औषधांची टंचाई, रुग्णालयातील बेडची कमतरता आणि एकूणच महामारीचा सामना करण्यात आलेले अपयश यामुळे राज्यातील जनता सरकारवर नाराज आहे. याचबरोबर उच्च न्यायालयानेही सरकावर ताशेरे ओढले होते. या सर्व गोष्टींमुळे पक्ष नेतृत्वाने रूपानी यांना हटवून प्रतिमा बदलाचा प्रयत्न केला आहे. 

गुजरात हे भाजपसाठी अतिशय महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरातमधील आहे. या राज्यात पराभव होणे भाजपला परवडणारे नाही. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असताना रूपानी हे सक्षम मुख्यमंत्री असल्याचे चित्र जनतेत नव्हते. याचबरोबर रूपानी हे जैन समाजाचे आहेत. आगामी निवडणुकीआधी पटेल-पाटीदार समाजाच्या नेत्याला संधी देऊन या समाजाला खूष करण्याची खेळी भाजपने खेळली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

पटेल समाजाचे अनेक नेतेही रूपानी यांच्या विरोधात होते. या समाजात भाजपबद्दल नाराजी असून, तो दूर करण्याचा निवडणुकीच्या तोंडावर प्रयत्न करण्यात आला आहे. रूपानी यांच्या नेतृत्वाखाली मागील विधानसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी फारशी चांगली नव्हती. राज्यात विधानसभेचे संख्याबळ 182 असताना भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. भाजपला 1990 मध्ये एवढ्या कमी जागा मिळाल्या होत्या. 

याआधी भाजपशासित काही राज्यांमध्येही कार्यकाळ पूर्ण होण्याआधी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यात कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून बी.एस.येडियुरप्पा यांना तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदावरुन तिरथसिंह रावत यांना पायउतार व्हावे लागले होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in