पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या भूमिपूजनातून राष्ट्रपतींना का वगळले?

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन झाले असले तरी यावरून वादंग सुरूच आहे. या कार्यक्रमातून भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांना वगळण्यात आल्याने गदारोळ उडाला होता. आता राष्ट्रपतींनाही या कार्यक्रमातूनडावलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
why president ramnath kovind not invited for ram mandir bhoomi pujan says mayawati
why president ramnath kovind not invited for ram mandir bhoomi pujan says mayawati

लखनौ : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन झाले असले तरी त्यावरुन सुरू असलेला वादंग संपण्याची चिन्हे नाहीत. अयोध्येतील भूमिपूजनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का बोलावले नाही? असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज केला. दलित समाजातील राष्ट्रपतींना सोबत घेऊन मोदींना अयोध्येला जायला हवे होते, असेही मायावती यांनी म्हटले आहे. 

मायावती यांनी म्हटले आहे की, दलित समाजातील संतांनी भूमिपूजनाला बोलाविण्यात आले नसल्याची तक्रार केली होती. त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. ते दलित संतांना बोलावू शकत नव्हते तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तरी बोलवायचे. राष्ट्रपतीही दलित समाजातील आहेत. अशा शुभ कार्यक्रमात राष्ट्रपतींना सहभागी करुन घेतले असते तर चांगला संदेश सर्वांपर्यंत पोचला असता. 

धर्माशी निगडित गोष्टींवर कोणीही राजकारण करु नये, असा टोलाही मायावती यांनी भाजपला लगावला. त्या म्हणाल्या की, केवळ राम राज्याची चर्चा करुन लोकांच्या आयुष्यात फरक पडणार नाही. रामाची शिकवणी सरकारने आचरणात आणण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली जंगलराज आहे. उत्तर प्रदेशात कुठेही रामराज्य दिसत नाही. राज्यात दररोज गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. 

मायावती या सातत्याने भाजप सरकारला लक्ष्य करीत आहेत. त्यांनी आज ट्‌विट करून ब्राह्मण समाजाचे आदर्शस्थान असलेल्या परशुरामासह सर्व जातीधर्मांतील संतांच्या नावाने राज्यात रुग्णालये उभी करण्यात येतील, असे जाहीर केले आहे. याचाच अर्थ मायावती या सर्व जातीपातींना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

चार वेळा मुख्यमंत्री बनलेल्या मायावतींनी आपल्या राजवटीत प्रत्येक जातींच्या प्रसिद्ध संताच्या नावाने अनेक योजना सुरू केल्या होत्या. तसेच, काही जिल्ह्यांना संतांची आणि समाजसुधारकांची नावेही दिली आहेत. त्यानंतर सत्तेवर आलेल्या समाजवादी पक्षाने मायावतींचे अनेक निर्णय रद्द केले होते. 

कोरोनोचे संकट हाताळण्यात उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीकाही मायावतींनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की प्रत्येक जातीचे जे आदर्श संत आहेत त्यांच्या नावाने राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णालये उभारण्यात येतील. अशा रुग्णालयातून लोकांना सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतील. ब्राह्मण समाजाचे आदर्शस्थान परशुरामाचाही त्यामध्ये समावेश असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com