इंदापूरची जनता कोणाची झोप उडविणार...हर्षवर्धन पाटील की दत्तात्रेय भरणे?

भरणे व पाटील यांची ताकद खऱ्या अर्थाने या दोन वर्षांत कळालेली नाही.
इंदापूरची जनता कोणाची झोप उडविणार...हर्षवर्धन पाटील की दत्तात्रेय भरणे?
dattatray bharane-harshvardhan patilSarkarnama

शेटफळगढे (जि. पुणे) : ‘मी विकास कामे केल्यामुळे मला शांत झोप लागते,’ असे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणतात तर ‘मी भाजपत गेल्यामुळे मला शांत झोप लागते,’ असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणतात. मग आगामी इंदापूर नगरपालिका तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदापूरची जनता या दोघांपैकी कोणाची झोप उडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Whose sleep will the people of Indapur wake up in the upcoming elections)

विधानसभा निवडणुकीनंतर अल्प मताच्या भरणे व पाटील यांच्या जय- पराजयाच्या निकालानंतर तालुक्यातील सर्व मतदार मतदानातून कौल देतील, अशी एकही सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. त्यामुळे भरणे व पाटील यांची ताकद खऱ्या अर्थाने या दोन वर्षांत कळालेली नाही. अशातच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली होती. त्यामुळे कारखाना बिनविरोध होऊन पाटील यांचे या कारखान्यावर असणारे वर्चस्व कायम राहिले आहे. याशिवाय आगामी बाजार समिती, खरेदी विक्री संघ व जिल्हा बँकेची सोसायटी प्रवर्गातील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भाजप लढवणार की नाही. याची देखील उत्सुकता सर्वांना आहे, त्यामुळे सहकारातील निवडणुकांपेक्षा खऱ्या अर्थाने तालुक्यात आगामी चार महिन्यांत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून भरणे व पाटील यांची ताकद समजणार आहे.

dattatray bharane-harshvardhan patil
आमदार अशोक पवारांना धमकी : शिरूरमधील वातावरण तापलं; सर्वपक्षीयांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

सध्या इंदापूर नगरपालिका व पंचायत समितीवर हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व आहे. राज्यमंत्री भरणे यांनी या वर्चस्वाला शह देण्यासाठी इंदापूर शहरातील जनतेवर प्रभाव असणाऱ्या एका मोठ्या कुटुंबाला राष्ट्रवादीकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भरणे यांना यात अपयश आले. कारण पाटील यांच्याकडे मागील आठ वर्षांपासून सत्ता नसली तरी शहराबरोबरच ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्ता व त्यांना मानणारा मतदार अजूनही कायम आहे. याला पाटील यांनी वीस वर्षांच्या आपल्या मंत्रिपदाच्या काळात जनतेची केलेली कामे व कार्यकर्त्यांना दिलेली ताकद तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारातील विविध संस्थांच्या विविध पदावर काम करण्याची कार्यकर्त्यांना दिलेली संधी व अजूनही कायम ठेवलेला जनसंपर्क या बाबी कारणीभूत असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे याच ताकतीच्या आधारे पुन्हा नगरपालिका व पंचायत समिती पाटील यांच्याच ताब्यात राहिल. असे त्यांच्या समर्थकांकडून सध्या सांगण्यात येत आहे.

dattatray bharane-harshvardhan patil
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना ठार मारण्याची धमकी; शिरूरमध्ये खळबळ

भरणे यांना मंत्रीपद देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पाटील यांच्या विरोधातील मंत्री पदाचे स्वप्न पूर्ण केले आहे. परंतु अद्याप निवडणुकीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसची एकदाही पंचायत समितीवर सत्ता प्रस्थापित झालेली नाही. मात्र दोन वेळा फोडाफोडीचे राजकारण करून राष्ट्रवादीने पंचायत समितीवर सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र मागील दीड वर्षापासून भरणे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी गावोगावी विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. तसेच जनसंपर्कही कायम ठेवला आहे. त्यामुळे मोठे नेते विधानसभा निवडणुकीत भरणे यांना सोडून गेले तरी भरणे यांचा मतदार फुटलेला नाही. याच्याच जोरावर इंदापूर पंचायत समिती व नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात येईल आणि अजितदादांचे निवडणुकीद्वारे पंचायत समिती ताब्यात घेण्याची स्वप्न भरणे पूर्ण करतील, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

एकंदरीतच पाटील व भरणे यांच्या बरोबरच त्यांच्या समर्थकांना जरी विजयाची खात्री वाटत असली तरी भरणे व पाटील या दोघांनाही ही निवडणूक सोपी नाही. कारण कोणी कार्यकर्ता व मतदार या दोन्ही नेत्यांपुढे तोंडावर बोलायला तयार नसले तरी दोन्ही समर्थकांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी व मरगळ आहे. त्यामुळे याचा फटका मतदानातून कोणाला बसेल यावरच या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे इंदापूरचा मतदार राजा आगामी निवडणुकीत कोणाला शांत झोपविणार व कोणाची झोप उडविणार, या प्रश्नांच्या उत्तरासाठी आगामी निवडणुकीच्या निकालाची इंदापूरबरोबरच जिल्ह्यातील राजकीय जाणकारांना वाट पाहावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in